अमरावती : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवानंतर त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासमोरील अडचणी आता वाढू लागल्या आहेत. रवी राणा हे महायुतीचे घटक असताना भाजपमधूनच त्यांच्या बडनेरा मतदार संघातील दावेदारीवर उघड विरोधाचे सूर उमटले आहेत.
नवनीत राणा यांना बडनेरा मतदार संघातून २६ हजार ७६३ इतके मताधिक्य मिळाले. हे भाजपमुळेच मिळाले, असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपच्या बडनेरा मंडळाच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत आमदार रवी राणा यांच्याविषयीचा रोष व्यक्त झाला. या बैठकीला पक्ष निरीक्षक म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या किरणताई महल्ले उपस्थित होत्या. आम्ही आता दुसऱ्यांची पालखी वाहणार नाही. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा पक्षाने करू नये. लोकसभेत आम्ही पक्षश्रेष्ठींचे ऐकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही एकजूट दाखवून प्रचार केला. मात्र, आता भाजपा कार्यकर्ता असा लादलेला उमेदवार स्वीकारणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी एकसूरात मांडली.
हेही वाचा…कोल्हापूरमध्ये सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी
नवनीत राणा तीन लोकसभा निवडणूक लढल्या. त्यांचे पती आमदार असताना पूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये बडनेरा मतदार संघात त्या पिछाडीवर होत्या. यावेळी भाजपचे कमळ हे पक्षचिन्ह घेताच त्यांना बडनेरा मतदार संघात उल्लेखनीय मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य भाजपमुळे मिळाले. या मतदारसंघावर भाजपचा दावा आहे आणि यावेळी हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांकडे केली.
बडनेरा विधानसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत रवी राणा हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समर्थित उमेदवार होते, त्यांनी शिवसेनेच्या प्रिती संजय बंड यांचा १५ हजार ५४१ मतांनी पराभव केला होता. पण, निवडणुकीनंतर रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात रवी राणा यांना मानाचे स्थान असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र, त्यांना सातत्याने विरोध होताना दिसत आहे. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला देखील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शविला होता. विरोध दर्शविण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. पण, भाजपच्या कार्यकर्त्यांना तलवारी म्यान करण्याचा आदेश झाला. दुसऱ्याच दिवशी नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश, उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांचा नाईलाज झाला. पण, आता रवी राणा यांच्याविषयी विरोधाचा सूर अधिक आक्रमक झाला आहे.
बडनेरा मतदार संघातून माजी नगरसेवक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार भारतीय, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहनकर यांच्यासह अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. तुषार भारतीय यांनी तर नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, अशी उघड भूमिका घेतली होती. भाजपकडे सक्षम नेते असताना आम्ही राणांच्या दरबारात मुजरा करायला जाणार नाही. भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी कोणालाही उमेदवारी द्या. आम्ही विद्यमान आमदाराला हरवून भाजपचा उमेदवार निवडून आणू, अशी आग्रही मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, या भावनांकडे पक्षाने दुर्लक्ष केले तर लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठे अपयश पदरी येईल, असा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिला. वरिष्ठ भाजपा नेत्यांशी जवळीक आणि खालच्या कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा आम्हाला नको, असा सूर व्यक्त झाला.
हेही वाचा…कायदेशीर मत आजमावल्यावरच ‘सगेसोयरे’वर अंतिम अधिसूचना ; विरोधकांचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार
नवनीत राणा यांनी बडनेरा वगळता इतर पाच मतदार संघांमध्ये भाजप निवडणूक लढणार, अशी घोषणा त्यांनी भाजपच्या चिंतन बैठकीत केली होता. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना बडनेरा मतदार संघातील उमेदवारीविषयी निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.