वाय एस शर्मिला यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसने त्यांच्यावर थेट आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र काँग्रेसचे नेतृत्व करणे शर्मिला यांच्यासाठी म्हणावे तेवढे सोपे नाही. कारण आंध्र प्रदेशमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्या या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसला २०१४ आणि २०१९ सालच्या निवडणुकीत एकही खासदार तसेच आमदार निवडून आणता आलेला नाही. असे असताना आता या राज्यात काँग्रेसचा प्रचार-प्रसार करण्याचे आव्हान शर्मिला यांच्यापुढे असणार आहे.
पक्षातील नेत्यांकडून सहकार्य, पाठिंबा मिळेल का?
शर्मिला यांच्या या नियुक्तीवर आंध्र प्रदेशमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आमच्या पक्षात एक नवा चेहरा आला, ही चांगली बाब आहे. शर्मिला या दिवंगत नेते वाय एस आर रेड्डी यांच्या मुलगी आहेत. असे असले तरी प्रदेश काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून त्यांना तेवढेच सहकार्य आणि पाठिंबा मिळेल का? हा एक प्रश्नच आहे,” असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले.
“पक्षाची मते २ ते ३ टक्क्यांनी वाढू शकतात”
सध्या शर्मिला आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांनी अद्याप अधिकृतपणे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अधिकृतपणे स्वीकारलेली नाही. शर्मिला यांच्या या नियुक्तीवर आंध्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष साके शैलजानाथ यांनी प्रतिक्रिया दिली. “शैलजा यांचे प्रत्येकजण पक्षात स्वागत करत आहे. मात्र त्यांच्या येण्याने पक्षाच्या नशिबात काही बदल होईल का? हा बदल फार होणार नाही, असे मला वाटते. शर्मिला यांच्या येण्यामुळे पक्षाची मते २ ते ३ टक्क्यांनी वाढू शकतात. मात्र पक्ष विजयापर्यंत पोहोचेल, असा विचार करणे जरा अधिक धाडसाचे होईल. पण काहीही असो शैलजा यांच्या काँग्रेस प्रेवशामुळे कमीत कमी पक्षाची चर्चातरी होत आहे. अगोदर काँग्रेसबद्दल कोणीही काहीही बोलात नव्हते,” असे साके शैलजानाथ म्हणाले.
शर्मिला यांना थेट विरोध
काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार जी व्ही हर्षकुमार यांनी तर शैलजा यांच्या नेमणुकीवर थेट आक्षेप व्यक्त केला. “शर्मिला यांनी स्वत:च सांगितले आहे की त्या तेलंगणाच्या आहेत. मग त्या आंध्र प्रदेशमध्ये काय करू शकतील? आंध्र प्रदेशमधील काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी त्यांना विरोध करावा, अशी माझी विनंती आहे. शर्मिला यांना आंध्र प्रदेशमध्ये कसलेही स्थान नाही,” अशी भूमिका हर्षकुमार यांनी घेतली.
शर्मिला यशस्वी होणार का?
दरम्यान, सत्तेत असताना गेल्या पाच वर्षांत जगनमोहन रेड्डी यांनी आपणच वाय एस आर रेड्डी यांचे वारसदार आहोत, असे जनतेच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी बहुसंख्य योजनांची नावे त्यांचे वडील वाय एस आर रेड्डी यांचे नाव दिलेले आहे. त्यामुळे आगामी काळात शर्मिला यांच्यापुढे जगनमोहन रेड्डी यांचा सामना करण्याचे आव्हान असेल. तसेच अंतर्गत विरोधाला सांभाळून काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्याचेही आव्हान त्यांच्यापुढे असेल. यामध्ये त्या किती यशस्वी होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.