यावेळी लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत. एकीकडे ‘४०० पार’चा दावा करणाऱ्या एनडीएला ३०० ची संख्याही पारही करता आलेली नाही; तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या जागांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे यापूर्वी संसदेत असलेले पक्षीय बलाबल आता बरेच वेगळे असणार आहे आणि विरोधकांचा आवाज अधिक वाढणार आहे. एक्झिट पोल्समधील सगळे अंदाज खोटे ठरवीत इंडिया आघाडीने मुसंडी मारल्यामुळे भाजपाचे स्वबळावरील बहुमत गेले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपाला आता आपल्या सहकारी पक्षांच्या आधारावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामध्ये टीडीपी, जेडीयू, शिवसेना (शिंदे गट) व लोजपा या पक्षांचा प्रमुख समावेश असेल. त्यामुळे आतापर्यंत स्वबळावर सत्तेत असणाऱ्या भाजपाला या सहकारी पक्षांची सतत मर्जी सांभाळावी लागणार आहे. अशा अनेक धक्कादायक गोष्टी या निकालाने साध्य केल्या आहेत. या निवडणुकीतील अशाच काही धक्कादायक गोष्टींवर एक नजर टाकू या…
काँग्रेसला मिळालेल्या जागा
काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ९९ जागा प्राप्त झाल्या आहेत. हा आकडा काँग्रेस पक्षासाठी सुखद आहे. कारण- २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फक्त ४४; तर २०१९ च्या निवडणुकीमध्ये ५२ जागा प्राप्त झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये जागांची ही संख्या जवळपास दुप्पट करण्यामध्ये काँग्रेसला यश आले आहे. दुसरीकडे २०१९ मध्ये राजस्थान आणि गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये भाजपाने सगळ्या जागांवर विजय मिळवीत काँग्रेसचा धुव्वा उडवला होता. मात्र, आता या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकूणच आपली कामगिरी वाखाणण्याजोगी सुधारता आली आहे. राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये काँग्रेसला एकूण आठ जागा प्राप्त करता आल्या आहेत.
हेही वाचा : “…म्हणून आम्ही भाजपाला नाकारले”, अयोध्यावासियांची नाराजी ते दलित उमेदवाराची बाजी, अयोध्येत नक्की काय घडले?
केरळमध्ये भाजपाचा शिरकाव
भाजपा अनेक वर्षांपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, उत्तर भारतातील राज्यांमध्ये जो प्रभाव भाजपाने प्रस्थापित केला आहे; तसा प्रभाव दक्षिणेत जमवणे भाजपासाठी कठीण आहे. असे असले तरीही भाजपाने आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. त्याचेच फळ भाजपाला या निवडणुकीत मिळाल्याचे दिसून आले आहे. डाव्या पक्षांचा गड असलेल्या केरळसारख्या राज्यामध्ये भाजपाला आपले खाते उघडता आले आहे, ही मोठी गोष्ट आहे. भाजपाचे त्रिस्सुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश गोपी यांचा ७२ हजार मतांनी विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाला केरळमध्ये विजय प्राप्त करता आला आहे. मात्र, केरळमधील काँग्रेसची कामगिरी सुधारली आहे. लोकसभेच्या २० पैकी १४ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे; तर सत्ताधारी माकपला फक्त एक जागा मिळाली आहे.
स्मृती इराणींचा पराभव
स्मृती इराणी या मागील १० वर्षांमध्ये भाजपाच्या एक प्रमुख नेत्या म्हणून पुढे आल्या. विशेषत: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींना पराभूत केल्यानंतर त्यांच्याबद्दल अधिकच चर्चा झाली. अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याऐवजी रायबरेली या दुसऱ्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढविणे पसंत केले. त्यामुळे अगदी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे किशोरी लाल शर्मा यांनी प्रचंड मताधिक्याने स्मृती इराणी यांचा पराभव करून राहुल गांधी यांच्या पराभवाचा वचपा काढला आहे. त्यांचा पराभव हादेखील भाजपासाठी धक्का आहे.
ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्तींचा पराभव
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे राज्यातील हे दोन्हीही मोठे नेते असून त्यांचा पराभव फारशा प्रसिद्ध नसलेल्या उमेदवारांनी केला आहे. अनंतनाग-राजौरी मतदारसंघामध्ये गुज्जर नेते व नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार मियां अल्ताफ अहमद यांनी मेहबूबा मुफ्ती यांचा पराभव केला आहे. तर, बारामुल्ला मतदारसंघामध्ये शेख अब्दुल रशीद यांनी ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला आहे.
इंदूरमधील भाजपा उमेदवाराचा १० लाख मतांनी विजय
मध्य प्रदेशमधील इंदूर मतदारसंघामधील भाजपाचे उमेदवार शंकर ललवाणी तब्बल १० लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे संजय सोळंकी दुसऱ्या स्थानी आहेत. मध्य प्रदेशमध्ये लोकसभेचे २९ मतदारसंघ असून, या सगळ्याच मतदारसंघांमध्ये भाजपाने विजय मिळविला आहे. भाजपाचे उमेदवार शंकर ललवाणी यांना १२ लाख ६७ हजारहून अधिक मते मिळाली आहेत.
अयोध्येमध्ये भाजपाचा पराभव
या निवडणुकीमध्ये भाजपाची भिस्त ‘राम मंदिरा’च्या मुद्द्यावर होती. निवडणुकीच्या आधी मंदिराचे बांधकाम अपूर्ण असतानाही भाजपाने राम मंदिराचे उद्घाटन करण्याचा घाट घातला. या सगळ्याचा राजकीय फायदा आपल्याला होईल, अशी भाजपाची धारणा होती. मात्र, संपूर्ण देशभरात हा मुद्दा फारसा प्रभावी ठरला नाही. इतकेच काय, अयोध्या मतदारसंघातही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागणे धक्कादायक होते. भाजपाचे उमेदवार लल्लू सिंह यांचा फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला. याच मतदारसंघामध्ये अयोध्येचा समावेश होतो. भाजपाचे उमेदवार या मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. असे असूनही राम मंदिराचा मुद्दा विशेष चालला नसल्याचे हे द्योतक आहे.
हेही वाचा : तिहार तुरुंगातून ओमर अब्दुल्लांचा पराभव करणारे राशिद शेख कोण आहेत?
अन्नामलाईंचा पराभव
भाजपाचे उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी के. अन्नमलाई यांचा कोईम्बतूर मतदारसंघात झालेला पराभवही धक्कादायक होता. तमिळनाडूमध्ये अन्नामलाई जिंकतील, अशी शक्यता होती. मात्र, द्रमुकच्या गणपती राजकुमार पी. यांनी त्यांचा पराभव केला.
तब्बल १० वर्षांनंतर काँग्रेसने गुजरातमध्ये उघडले खाते
एकेकाळी गुजरातमध्ये वर्चस्व असलेल्या काँग्रेस पक्षाने आपला संपूर्ण प्रभाव गमावला होता. गुजरात हे भाजपाच्या विकासाचे प्रारूप म्हणूनही पुढे आणले गेले होते. २०१४ व २०१९ अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वच २६ जागांवर विजय मिळविला होता. परंतु, या निवडणुकीमध्ये भाजपाच्या प्रभावाला खिंडार पाडण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. गुजरातमधील बनासकांठा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार गेनीबेन ठाकूर यांनी भाजपाच्या रेखा चौधरी यांचा ३० हजार मतांनी पराभव केला आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये एकही विजय प्राप्त न करू शकलेल्या काँग्रेससाठी हादेखील एक मोठा विजय आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचे वाढते प्रभुत्व
या निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीने अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. एकूण ८० मतदारसंघांपैकी ३७ जागांवर सपाने विजय मिळवला असून, त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला सहा जागा प्राप्त करता आल्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपाला ७१; तर २०१९ च्या निवडणुकीत ६२ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे समाजवादी पार्टीला २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही निवडणुकांत फक्त पाच जागा मिळाल्या होत्या. पाच जागांवरून ३७ जागा मिळवणे, ही दमदार कामगिरी असून, भाजपाच्या उत्तर प्रदेशातील निर्विवाद प्रभुत्वाला सुरुंग लावणारी आहे.