Parliament House : लोकसभा सचिवालयाने नव्या संसद भवनातील संकुलात आता राजकीय पक्षांना कार्यालये दिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नव्या संसद भवनातील संकुलामध्ये राजकीय पक्षांना कार्यालये देण्याची फाईल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे होती. अखेर ओम बिर्ला यांनी आता राजकीय पक्षांना कार्यालये देण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार कार्यालये देण्यात आले आहेत. नवीन संसद भवनात पक्ष कार्यालय मिळवणारा ‘टीडीपी’ हा पहिला पक्ष ठरला आहे.
तसेच आम आदमी पक्षाला (आप) पहिल्यांदाच संसदेच्या संकुलात एक कार्यालय मिळालं आहे. मात्र, ते कार्यालय संयुक्त सदन नावाच्या संसदेच्या जुन्या इमारतीत आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह प्रमुख पक्षही संविधान सदनमधील संसदीय कार्यालयातूनच काम सुरु ठेवणार आहेत. संसदेमधील पक्षाच्या खासदारांच्या संख्येनुसार कार्यालयाचं वाटप केलं जातं. त्यानुसार बुधवारी लोकसभा अध्यक्षांनी ११ कार्यालयाचं वाटप केलं आहे.
दरम्यान, संविधान सदनात वापरल्या जाणाऱ्या १३५ आणि १३६ या दोन कार्यालयाचं एनडीएचा मित्र पक्ष जेडी(यू) ला पुन्हा वाटप करण्यात आलं आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाला १२८ आणि शिवसेना ठाकरे गटाला १२८ -अ ही कार्यालये मिळाली आहेत. नवीन संसद भवनामध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्षांना कार्यालये मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, संविधान सभागृहात आधीच मोठी कार्यालये असल्याने भाजपा आणि काँग्रेस पक्ष त्यासाठी उत्सुक नाहीत.
तसेच ‘टीडीपी’ला नवीन इमारतीत पहिल्या मजल्यावर एफ ०९ ही एक कार्यालय मिळालं आहे. त्या ठिकाणी बहुतांश कॅबिनेट मंत्र्यांचीही कार्यालये आहेत. समाजवादी पक्षाने जुन्या इमारतीतील १३० आणि १२६-I आणि II ही कार्यालये कायम ठेवले आहेत. आता जुन्या इमारतीतील इतर पक्ष म्हणजे एनसीपी (१२६डी), आरजेडी (१२५-IIA), सीपीआय(एम) (१३८) आणि बीजेडी (४५-II) अशी आहेत.
दरम्यान, नवीन इमारतीमध्ये १२० कार्यालये आहेत. त्यापैकी ४९ वरिष्ठ मंत्र्यांसाठी आहेत, तर एक संपूर्ण विभाग पंतप्रधान कार्यालयासाठी राखीव आहे. लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपसभापती आणि विरोधी पक्षनेते यांची कार्यालये तळमजल्यावर आहेत. नवीन इमारतीत सध्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) हा एकमेव पक्ष आहे, ज्याला नवीन लोकसभेत कार्यालय मिळालं आहे. बाकीच्या सर्व पक्षांना जुन्या इमारतीत कार्यालये आहेत.