मुंबई: राज्यातील अनेक मतदार संघात प्रचारसभा व प्रचारफेरींसाठी सातशे ते आठशे रुपये प्रतिदिन मजुरीवर आयोजकांनी कार्यकर्ते बोलविल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात हा दर पाचशे ते सातशे रुपये होता तर शहरी भागात एक हजार रुपये पर्यंत प्रतिदिन मजुरी दिली जात होती. ठरलेले पैसे न मिळाल्याने तथाकथित कार्यकर्त्यांनी राडा केल्याच्या अनेक चित्रफिती प्रसारीत झालेल्या आहेत. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मतदार संघात तर तासाला २५० रुपये देतो म्हणून प्रचारासाठी महिलांना बोलविण्यात आले होते. लहान मुलांना सोबत घेऊन आलेल्या महिलांनी उमेदवाराच्या कार्यालयासमोर तांडव केला होता.
बारामती मध्ये एका जाहीर सभेसाठीएका पक्षाने जाहीर सभेसाठी सातशे रुपये मजुरीवर निमगावातून कार्यकर्ते आणले, असा आरोप एका चित्रफिती द्वारे केला जात आहे. त्यांना ठरलेली मजूरी न मिळाल्याने त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांना घेऊन येणाऱ्या वाहनचालकांनी आयोजकांना तावातावाने जाब विचारला. वाहनांसाठी साडेतीन हजार रुपये ठरले होते. या संतप्त कार्यकर्त्यांपैकी काही जणांनी हा सर्व प्रकार समाजमाध्यमांवर प्रसारीत केला. छत्रपती संभाजी नगर मतदार संघातील एका उमेदवाराच्या पदाधिकाऱ्यांनी शहरी भागातून महिलांना आमंत्रित केले होते. त्यासाठी तासाला २५० रुपये ठरवण्यात आले होते. चार पाच तासांचे एक हजार ते दीड हजार रुपये ह्या महिला उमेदवाराच्या खास माणसाकडे मागत होत्या. ठाण्यातील एका उमेदवाराच्या प्रचारफेरीसाठी गृहनिर्माण सोसायटीतील सुरक्षा रक्षकांना एक हजार रुपये देण्यात आले होते.
हेही वाचा : “तुम्हाला जामीन मिळाला तर तुम्ही फाइल्सवर सही…”; केजरीवालांच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
जाहीर सभांसाठी कार्यकर्ते जमा करण्याची मोठी जबाबदारी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर सोपवली जात आहे. गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत प्रमुख पदाधिकारी जाहीर सभा व प्रचार फेरींसाठी कार्यकर्ते जमा करण्यासाठी जीवाचे रान करीत असल्याचे दिसून येते. कार्यकर्त्यांच्या प्रवासासाठी वाहने, नाश्ता, पाणी, जेवण याची सर्व व्यवस्था हे पदाधिकारी करीत असल्याने उमेदवार किंवा पक्षाचे नेते खर्चासाठी एक भत्ता या पदाधिकाऱ्यांकडे सोपवून मोकळे होतात. सभा, प्रचारासाठी मानसी मजूरीचे अमिष दाखवले जाते. त्यानंतर हे ग्रामस्थ, कार्यकर्ते सभांना येतात. तरीही सभांना लागणारी संख्या पूर्ण होत नसल्याने भाड्याने कार्यकर्ते घेण्याची एक पध्दत प्रचलित झाली आहे. याच संधीचे सोने करताना काही मनुष्यबळ पुरवठादार प्रती मानसी सातशे ते आठशे रुपये घेऊन हे मजुर पुरवठा करीत असल्याचे आढळून आले आहे. या मजूरांच्या प्रवासाठीसाठी बस, ट्रक, टेम्पो, छोटे वाहने पुरवठा केली जातात. पनवेल येथील एका बस कंत्राटदाराने काही दिवसापूर्वी १४०० बसेस पुरवठा केल्या होत्या. निवडणूक काळात सुट्टी घेऊन पक्षांच्या सभांना हजेरी लावणारे कामगार आहेत. नोकरीतील कमाई पेक्षा या काळात एका दिवसात दोन सभांना हजेरी लावल्याने अधिक कमाई होत आहे. त्यामुळे काही अस्थापनांना सध्या कामगार तुटवड्याची समस्या भेडसावू लागली आहे. सभांना दिसणारी तुडुंब गर्दी ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे असे म्हणता येणार नाही. यातील काही गर्दी ही मजुरी देऊन आणलेल्या तथाकथित कार्यकर्त्यांची आहे. अलीकडे हा एक पध्दत वाढू लागली आहे. या मनुष्यबळ पुरवठ्या मध्ये अनेक कामगार पुरवठादार कंत्राटदार सहभागी होत आहेत. या संर्दभात पुण्यातील एका मोठ्या मनुष्यबळ पुरवठादार कंपनीच्या व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या कंपनीच्या वतीने अशा प्रकारे मनुष्यबळ पुरवठा केला जात नाही, कारण तो कायमस्वरुपी कामगार आहे असे सांगितले मात्र अनेक उमेदवार,नेते हे बड्या कामगार कंपन्यांकडून कार्यालयासाठी लागणारे सुरक्षा रक्षक, डेटा ऑपरेटर, सहाय्यक यांची मागणी करीत असल्याचे सांगितले.