अठराव्या लोकसभेमध्ये अध्यक्षाबरोबरच उपाध्यक्षही असणार आहे, अशी माहिती गुरुवारी (२७ जून) सरकारमधील काही सूत्रांनी दिली. “सभागृहामध्ये उपाध्यक्षपदही असेल. मात्र, हे पद विरोधकांना दिले जाईल की एनडीए आघाडीकडेच राहील की भाजपा स्वत:कडे हे पद ठेवेल याबाबत अद्याप पुरेशी स्पष्टता नाही. याविषयी चर्चा होईल”, असे एका सूत्राने सांगितले. सभागृहातील उपाध्यक्षपद विरोधकांना दिले जावे, अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून केली जात आहे.

मागील लोकसभेमध्ये उपाध्यक्षपद रिक्त

१७ व्या लोकसभेमध्ये उपाध्यक्ष हे पद रिक्त ठेवण्यात आले होते. तर, २०१४ मध्ये एआयएडीएमके पक्षाचे सदस्य थंबी दुराई यांना उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या यूपीएच्या सत्ताकाळात उपाध्यक्षपद भाजपाला देण्याची दानत काँग्रेसने दाखवली होती. २००४ साली या पदावर खासदार चरणजित सिंह अटवाल यांची, तर २००९ साली करिया मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी भाजपाचे एनडीए आघाडीतील प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयूकडून या पदाची मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हे पद आपल्याला नको असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : ना कुणाशी मैत्री, ना शत्रुत्व; राजकीय विजनवासात गेलेल्या रालोद पक्षाने कशी घेतली उभारी?

टीडीपीला उपाध्यक्षपदात रस नाही

बुधवारी टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभी राम कोम्मारेड्डी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले, “आम्हाला या पदाची अपेक्षा नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे.” दुसऱ्या बाजूला भाजपानेही असे म्हटले आहे की, या पदासाठी आपण टीडीपीला विचारणा केलेली नाही. टीडीपीच्या आणखी एका वरिष्ठ नेत्याने म्हटले, “सुरुवातीपासूनच टीडीपीने लोकसभेच्या अध्यक्ष, तसेच उपाध्यक्ष या पदांसाठी इच्छा व्यक्त केलेली नाही. एनडीए आघाडीतील इतर कोणत्याही पक्षाला स्वारस्य असेल, तर त्यांच्याासाठी आम्ही ही जागा खुली केली आहे.”

विरोधकांना अद्याप तरी प्रस्ताव नाही

दुसऱ्या बाजूला विरोधकांमधील सूत्रांनी असे सांगितले की, या पदाबाबत अद्याप तरी सरकारने त्यांच्याशी कोणताही वार्तालाप केलेला नाही. जर विरोधकांना हे पद देण्याचा प्रस्ताव सरकारने दिला, तर पक्षाच्या एखाद्या खासदाराला ते देण्याचा विचार काँग्रेसकडून केला जाईल, असे काहींना वाटते; तर दुसऱ्या बाजूला काहींना असे वाटते की, काँग्रेसने हे पद इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांना द्यावे आणि आघाडीमधील सकारात्मक वातावरण अधिक वाढवून एकजूट वाढवावी.

हेही वाचा : ‘आता पाठिंबा नाही’ म्हणणाऱ्या बिजू जनता दलाने गेल्या दशकभरात कशाप्रकारे निभावली आहे भाजपाशी दोस्ती?

अध्यक्षपदासाठी निवडणूक

लोकसभेमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्याचे दिसून आले. शक्यतो लोकसभेच्या अध्यक्षांची नियुक्ती सत्ताधारी आणि विरोधक संगनमताने करण्याचा प्रघात आहे. निवडणूक टाळून एकमताने अध्यक्षांची नेमणूक केली जाते. मात्र, आजवर इतिहासात तीन वेळा या पदासाठी निवडणूक झाली आहे. त्यानंतर आता १८ व्या लोकसभेतील अध्यक्षपदासाठी चौथ्यांदा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये एनडीएकडून ओम बिर्ला हे उमेदवार होते; तर इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे खासदार के. सुरेश हे उमेदवार होते. लोकसभेमध्ये २६ जून रोजी आवाजी मतदानाद्वारे ही निवडणूक पार पडली. त्यामध्ये ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. लोकसभेच्या १५ व्या अध्यक्ष मीरा कुमार या होत्या. त्यांनी ३० मे २००९ ते ४ जून २०१४ या कालावधीत लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले. लोकसभेच्या १६ व्या अध्यक्ष सुमित्रा महाजन या होत्या. ६ जून २०१४ ते १६ जून २०१९ या कालावधीत सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर लोकसभेचे १७ वे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी काम पाहिले होते. आता पुन्हा एकदा १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे.