अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून गेले दोन ते तीन महिने सातत्याने दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांमुळे चर्चेत आलेल्या अकोला मतदारसंघात आंबेडकर विरोधकांचे संयुक्त उमेदवार असणार की नेहमीप्रमाणे तिरंगी लढतीत भाजपचा फायदा होणार याचीच उत्सुकता यंदा आहे. पश्चिम विदर्भात अभेद्य गड निर्माण केलेला अकोला लोकसभा मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपपुढे वंचित व ‘मविआ’चे मोठे आव्हान असेल. वंचित ‘मविआ’ व इंडिया आघाडीचा भाग होणार का? हा सध्या कळीचा मुद्दा आहे. या आघाडीच्या निर्णयानंतरच मतदारसंघातील लढतीचे समीकरण स्पष्ट होईल.पश्चिम विदर्भात अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे हे एकमेव खासदार आहेत. साडेतीन दशकांमध्ये लोकसभेच्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता भाजपने या मतदारसंघावर आपले वर्चस्व राखले. लोकसभेच्या मागील चार निवडणुकांत तिरंगी लढतीचा फायदा संजय धोत्रेंना मिळत आला. त्याचे बक्षीस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, २६ महिन्यांच्या कार्यकाळातच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून संजय धोत्रे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ते लढणार नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपला नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागेल. लोकसभेची उमेदवारी धोत्रे कुटुंबात दिली जाते की इतर दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो, यावरून काथ्याकूट सुरू आहे. खासदारपुत्र अनुप धोत्रे यांच्यावर लोकसभाप्रमुख पदाची जबाबदारी देऊन त्यांना पुढे करण्यात आले. ऐनवेळी एखादे अनपेक्षित नाव देखील समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जातीय समीकरण लक्षात घेता भाजपकडून वरिष्ठस्तरावर सर्वेक्षण देखील केल्याची माहिती आहे.
हेही वाचा : इंडिया आघाडीत नितीश कुमार यांना महत्त्वाची जबाबदारी मिळणार? मल्लिकार्जुन खरगे अध्यक्षपदी?
अकोला मतदारसंघात स्वबळावर काँग्रेस किंवा प्रकाश आंबेडकर यांना गेल्या तीन दशकांत यश मिळवता आलेले नाही. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्याशिवाय भाजपचा पराभव शक्य नसल्याचे लोकसभेच्या गेल्या नऊ निवडणुकांतील आकडेवारीतून स्पष्ट होते. वंचित आघाडीने ठाकरे गटासोबत युती केली असली तरी ते अद्याप ‘मविआ’ किंवा इंडिया आघाडीचा घटक नाही. गेल्या चार निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस एकत्र येण्याचे प्रयत्न झाले. शेवटपर्यंत हा मुद्दा ताणला गेला आणि बोलणी फिस्कटली. स्वबळावर दोन्ही पक्षांना सलग पराभवाचा सामना करावा लागला. यावेळेस देखील वंचितने इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. मात्र, काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.अकोला मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. १९८४ पासून ते येथून सातत्याने लढत आहेत. ‘मविआ’मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने अकोला मतदारसंघावर दावा केला. अकोल्यात काँग्रेसने विविध प्रयोग केले आहेत. वेगवेगळ्या जाती, धर्माचे उमेदवार दिले; परंतु काँग्रेसची खेळी अपयशी ठरली.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी भाजपाकडून दिल्लीत बैठकांचे सत्र, ३०३ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य!
प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाला काँग्रेस व राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आंबेडकर यांचा पूर्वानुभव लक्षात घेता आघाडीने सावध पावले टाकली आहेत. यामुळेच आंबेडकर स्वतंत्र लढणार की इंडिया आघाडीचे उमेदवार असणार याची उत्सुकता कायम असेल. तसेच आघाडी होऊ शकली नाही तर पुन्हा तिरंगी लढत अपेक्षित आहे. त्याचा कोणाला फायदा होतो यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत. राष्ट्रवादी सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कमकुवत असल्याने त्याच्या फाटाफुटीचा मतदारसंघात फारसा परिणाम होणार नाही. शिवसेना शिंदे गटापुढे अस्तित्वाचे आव्हान आहे, तर ठाकरे गटाकडून लोकसभा लढण्याची चाचपणी करण्यात आली. सध्या भाजप, वंचित आघाडीसह काँग्रेसच्या इच्छुकांकडून लोकसभेची तयारी सुरू आहे. यावेळेस तुल्यबळ लढत होण्याचे संकेत आहेत.
हेही वाचा : जयंत पाटील यांच्याबद्दल सतत उलटसुलट चर्चा का ?
खा. धोत्रेंच्या नावावर मताधिक्याचा विक्रम
२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत संजय धोत्रेंनी विदर्भात सर्वाधिक मताधिक्य घेत विक्रम रचला होता. त्यांनी दोन लाख ७५ हजार ५९६ मतांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पराभव केला.
ॲड. आंबेडकर व काँग्रेसमध्ये २००४ पासून दुरावा
लोकसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा असते. मात्र, २००४ पासून त्यांच्यात दुरावा कायम आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केवळ प्रसारमाध्यमांमधूनच चर्चा रंगते. प्रत्यक्षात तडजोड होत नसल्याने ते स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरतात. त्यांच्यात पाडापाडीचे राजकारण देखील चालते. आगामी निवणुकीत तरी काँग्रेस व ॲड. आंबेडकर हे एकत्र येतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे……………….
२०१९ मधील निकाल
संजय धोत्रे (भाजप) – ५ लाख ५४ हजार
प्रकाश आंबेडकर (वंचित) – २ लाख ७८ हजार
हिदायत पटेल (काँग्रेस) – २ लाख ५४ हजार