अमरावती: गेल्‍या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आलेल्‍या अपक्ष खासदार नवनीत राणा यावेळी भाजपच्‍या पाठिंब्‍याच्‍या प्रतीक्षेत आहेत. जात प्रमाणपत्राचे न्‍यायप्रविष्‍ट प्रकरण, भाजपमधील एका गटाचा विरोध, सहयोगी शिवसेना शिंदे गटातून स्‍पर्धा, अशा प्रतिकूल परिस्थितीत नवनीत राणा यांच्‍या विरूद्ध लढा देण्‍यासाठी सक्षम उमेदवाराच्‍या शोधात विरोधकांची आघाडी आहे. भाजपकडेही नवनीत राणा यांच्‍याशिवाय पर्याय नसल्‍याने त्‍या दुसऱ्यांदा निवडून येणार का, याची उत्‍सुकता आहे.

अमरावती हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदार संघ. राखीव मतदार संघ होऊन १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७ वेळा अमरावती लोकसभा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात होता. नंतर २५ वर्षे या मतदार संघात शिवसेनेने आपले पाय बऱ्यापैकी रोवले. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ २००९ आणि २०१४ मध्‍ये निवडून आले होते. पण, २०१९ च्‍या निवडणुकीत शिवसेनेच्‍या हातून हा मतदार संघ निसटला.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असताना नवनीत राणा यांचा विजय हा लक्षवेधी ठरला होता. पण, नवनीत राणा यांनी निवडणूक निकालानंतर लगेच केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला, हा राष्‍ट्रवादी आणि काँग्रेससाठी मोठा धक्‍का होता.

राज्‍यात महाविकास आघाडी सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर नवनीत राणा आणि त्‍यांचे पती आमदार रवी राणा यांनी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या विरोधात उघड भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांच्‍या निवासस्‍थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा हट्ट राणा दाम्‍पत्‍याला भोवला आणि त्‍यावेळी त्‍यांना १४ दिवसांची तुरूंगवारी घडली. या घटनेची मोठी चर्चा झाली. जनतेची सहानुभूती मिळवण्‍यात राणा दाम्‍पत्‍याला यश मिळाले, सोबतच भाजपच्‍या वरिष्‍ठ वर्तुळात राणा दाम्‍पत्‍याने आपले स्‍थान अधिक भक्‍कम केले. नवनीत राणा यांनी गेल्‍या पाच वर्षांत हिंदुत्‍ववादी भूमिका प्रकर्षाने मांडली आहे.

नवनीत राणा यांना भाजपच्‍या पाठिंब्‍याची अपेक्षा आहे. भाजपने अजूनपर्यंत त्‍यांच्‍या उमेदवारीला हिरवा कंदिल दिला नसला, तरी भाजपकडे पर्यायी चेहरा नाही. दुसरीकडे, नवनीत राणा यांनी अमरावतीतून भाजपच्‍या उमेदवारीवर निवडणूक लढवावी, असा सल्‍ला देण्‍यात आला आहे. यावेळी त्‍या भाजपच्‍या उमेदवार राहणार की अपक्ष याची चर्चा सुरू झाली आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्‍च न्‍यायालयाने रद्द केले आहे. या प्रकरणी त्‍यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात दाद मागितली आहे. सध्‍या या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. ही एक डोकेदुखी नवनीत राणा यांच्‍यासमोर आहे.

गेल्‍या निवडणुकीत महाविकास आघाडीत अमरावतीची जागा ही राष्‍ट्रवादीच्‍या वाट्याला होती. काँग्रेसने यावेळी या मतदार संघावर दावा केला आहे. दुसरीकडे, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्‍ट्रवादी पवार गटातर्फेही इच्‍छूक उमेदवार रांगेत आहेत. राणा दाम्‍पत्‍याचे जिल्‍ह्यातील बहुतांश नेत्‍यांशी असलेले वैर, पाच वर्षांत बदललेली भूमिका यामुळे विरोधकांची एकजूट ही राणा यांच्‍यासाठी अडचणीची ठरू शकते. भाजपमधील एक गट देखील त्‍यांच्‍या विरोधात आहे.

नवनीत राणा यांचे गेल्‍यावेळचे प्रतिस्‍पर्धी आनंदराव अडसूळ हे आता मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या गटात आहेत. त्‍यांनीही निवडणूक लढण्‍याचा दावा केला आहे. राष्‍ट्रवादी अजित पवार गटातर्फे अजूनपर्यंत दावा करण्‍यात आलेला नाही. सत्‍तारूढ आघाडीतील अडसूळ हे नवनीत राणांना पाठिंबा देतील, असा विश्‍वास राणा समर्थक व्‍यक्‍त करीत आहेत, पण विरोधकांची एकजूट रोखण्‍याचे आव्‍हान त्‍यांच्‍या समोर आहे.

अमरावती जिल्‍ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदार संघाचा समावेश अमरावती लोकसभा मतदारसंघात आहे. सध्‍या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विधानसभा मतदारसंघांपैकी सध्‍या बडनेरामध्‍ये रवी राणा (अपक्ष), अमरावतीत सुलभा खोडके (काँग्रेस), तिवसामध्‍ये यशोमती ठाकूर (काँग्रेस), दर्यापूरमध्‍ये बळवंत वानखडे (काँग्रेस), अचलपूरमध्‍ये बच्‍चू कडू (प्रहार जनशक्‍ती पक्ष) आणि मेळघाटमध्‍ये राजकुमार पटेल (प्रहार जनशक्‍ती पक्ष) असे बलाबल आहे.

२०१९ मध्‍ये प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

नवनीत राणा (अपक्ष)- ५,१०,९४७
आनंदराव अडसूळ (शिवसेना)- ४,७३,९९६

Story img Loader