जालना : मागील सलग सात निवडणुकांत जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय झालेला आहे. त्यापैकी सलग पाच निवडणुकांत भाजपचे रावसाहेब दानवे निवडून आलेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतही दानवे हेच भाजपाचे उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण असेल याचा अद्यापही शोध सुरू आहे.
१९९१ मध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले कै. अंकुशराव टोपे हे या मतदारसंघातील शेवटचे बिगर भाजपचे खासदार. त्यानंतरच्या सात निवडणुकांत काँग्रेसला या मतदारसंघात विजयाची वाट सापडू शकली नाही. लोकसभेवर निवडून येण्यापूर्वी दानवे सलग दोन वेळेस भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले होते. विधानसभेचा दहा वर्षे आणि लोकसभेचा २५ वर्षांचा कार्यकाळ असणाऱ्या दानवेंचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारसंघाशी त्यातही ग्रामीण भागाशी असलेली नाळ त्यांनी सोडली नाही. ग्रामपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विविध सहकारी संस्थांच्या पातळीवरील निवडणुकांवर लक्ष ठेवून असणारे ते नेते आहेत. या सर्व राजकारणात फुटीपूर्वीच्या शिवसेनेचे पाठबळ त्यांच्या मागे असायचे. आता २०२४ ची निवडणूक त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेऐवजी एकनाथ शिंदे यांच्या पाठबळावर लढायची आहे.
हेही वाचा – उत्तर प्रदेशच्या मोठ्या नेत्याने राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले, काँग्रेसची अडचण!
अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावेळेस भाजपसोबत असणार आहे. या नवीन राजकीय समीकरणात दानवे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत लढत होणार आहे. आतापर्यंत मिळणारी शिवसेनेची मते २०२४ मध्ये कशी मिळतील, असा प्रश्न आता भाजपासमोर आहे. २०१९च्या निवडणुकीत दानवे यांच्या विजयात त्यावेळच्या शिवसेनेचा मोठा वाटा होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतांची गोळाबेरीज करताना ही बाब दुर्लक्षून चालणार नाही याची जाणीव भाजपलाही आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपची शिवसेनेच्या शिंदे गटाशी जवळीक अधिक वाढली आहे. अनेक निवडणुकांचा अनुभव असणारे रावसाहेब दानवे हे जनतेच्या संपर्कात असणारे नेते आहेत. कुणाला जवळ करायचे, कुणाकडे दुर्लक्ष करायचे यासाठी दक्ष असलेले दानवे सामान्य मतदारांवरील आपला प्रभाव वाढविण्यासाठी मात्र कायम प्रयत्नशील असतात. भाजप विरोधी पक्षांतही त्यांचा असलेला संपर्क अनेक निवडणुकांत दिसून आलेला आहे. मतदानाच्या वेळी विरोधी पक्षांतील कुणाच्या हातात ते कमळ देतील हे सांगता येणार नाही, असा याआधीचा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. मतदारसंघात झालेल्या आणि सुरू असलेल्या विकासकामांचा तपशील विविध कार्यक्रमांमध्ये देऊन नवीन मतदार जोडण्याच्या प्रयत्नांना रावसाहेब दानवे असतात. जिल्ह्यातील भाजपचे दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्तेही विकासकामांचा पाढा वाचत असतात. मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची नियुक्ती आणि त्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे नियोजन आहे.
एकीकडे ‘महायुती’मधील भाजपची लोकसभेची तयारी सुरू असताना ‘महाविकास’ आघाडीतल काँग्रेस पक्षाची उमेदवाराची चाचपणी अद्याप सुरू आहे. सलग सात वेळेस पराभव झाला असला तरी महाविकास आघाडीत या मतदारसंघाच्या उमेदवारीवर काँग्रेसचा दावा कायम आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत असल्याने काँग्रेसच्या आशा उंचावल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली असली तरी शरद पवार यांना मानणारा गट काँग्रेसच्या सोबत असणार आहे. महाविकास आघाडीने या वेळेस काँग्रेसऐवजी शिवसेनेस (उद्धव ठाकरे) लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा एक मतप्रवाह आहे. या पक्षाच्या जिल्हापातळीवरील बैठकांमध्ये ही मागणी चर्चेस आलेली आहे. या लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे अस्तित्व आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याचे कारण यासाठी सांगण्यात येते.
मागील पाच निवडणुकांत भाजपचे दानवे विजयी झालेले असले तरी २००९ मध्ये काँग्रेसचे कल्याण काळे यांनी त्यांना जोरदार लढत दिली होती. याची आठवण राजकीय वर्तुळात नेहमी काढण्यात येते. कारण या निवडणुकीत काळे यांचा फार कमी म्हणजे ८४८२ मतांनी पराभव झाला होता. २०२४ ची निवडणूक काँग्रेसला लढायची असून त्यांच्याकडे जवळपास अर्धा डझन इच्छुक उमेदवार आहेत. दानवेंच्या विरुद्ध सक्षम उमेदवाराचा शोध अद्यापही काँग्रेसमध्ये सुरू आहे.
पक्षनिहाय उमेदवार
जालना लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार पुढीलप्रमाणे आहेत. कैलास गोरंट्याल – काँग्रेस (जालना), नारायण कुचे – भाजप (बदनापूर), संतोष दानवे – भाजप (भोकरदन), अब्दुल सत्तार – सिल्लोड (शिवसेना शिंदे), संदीपान भूमरे – पैठण (शिवसेना-शिंदे), हरिभाऊ बागडे – फुलंब्री (भाजप)
२०१९च्या निवडणुकीतील मते
रावसाहेब दानवे (भाजप) ६, ८८, ०१९
विलास औताडे (काँग्रेस)- ३, ६५, २०४