एजाजहुसेन मुजावर
सोलापूर : मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या माळशिरस-अकलूज भागातून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या मोहिते-पाटील कुटुंबीयांनी यंदा लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी पुन्हा प्रयत्न चालवले आहेत. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असली, तरी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी टोकाला गेलेला संघर्ष भाजपसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. मोहिते-पाटील कुटुंबीयांतील धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी निश्चित मानून जोरदार तयारी सुरू केली आहे. तर खासदार निंबाळकर यांनीही आतापासूनच जोर लावला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा जागांपैकी माळशिरस आणि माण या दोन जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर सांगोल्याची जागा शिवसेनेची (सध्या शिवसेना शिंदे गट) आणि माढा, करमाळा आणि फलटण या तीन जागा राष्ट्रवादीच्या (सध्या तिन्ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गट) होत्या. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीमुळे आता विधानसभेच्या सर्व सहा जागांवर महायुतीचे आमदार आहेत. पूर्वीच्या पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघाची २००९ साली पुनर्रचना होऊन हा मतदारसंघ खुला झाला. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे याच मतदारसंघातून निवडून आले होते. नंतर २०१४ भाजपविरोधातील भलेभले पराभूत झाले, परंतु माढा मतदारसंघात तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे वैयक्तिक करिष्म्यावर निवडून आले होते. दरम्यान, पवार व मोहिते कुटुंबीयांत बेबनाव होऊन मोहिते-पाटील कुटुंबीयांनी थेट भाजपचा मार्ग पत्करला. मागील लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात प्रतिष्ठा पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूजमध्ये प्रचारसभा घेतली होती. तरीही त्यावेळी केवळ एकट्या मोहिते-पाटील यांनी ताकद लावल्यामुळे भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे ८४ हजार ९२८ मतांनी विजयी झाले होते.

Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम

हेही वाचा… महायुतीच्या उमेदवार निवडीवर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून

मोहिते-पाटील यांनी स्वतःच्या अकलूज-माळशिरस भागातून एक लाखाचे मताधिक्य निंबाळकरांना मिळवून देण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे त्यांना एक लाख १७ हजार ७४७ मतांची मोठी आघाडी माळशिरसमधून मिळाली होती. माण-खटावमधूनही २४ हजार मताधिक्य मिळाले होते. त्याच जोरावर निंबाळकर खासदार झाले होते.

समीकरणे बदलली

मागील पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मोहिते आणि निंबाळकर यांच्यात श्रेयवादावरून कटुता निर्माण झाली. निंबाळकर हे मोहितेविरोधकांशी उघडपणे सलगी करून त्यांना डिवचू लागले. यात मोहिते यांचे कट्टर वैरी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे खासदार निंबाळकरांचे मित्र बनले आहेत. शह-काटशहाच्या या राजकीय संघर्षात मोहिते-पाटील यांनीही माण-खटाव आणि फलटण भागात निंबाळकरांच्या पारंपरिक विरोधकांशी जवळीक वाढविली. फलटणचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर हे सध्या अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत असले तरी खासदार निंबाळकरांच्या विरोधात त्यांची भूमिका कायम आणि स्पष्ट आहे. त्यांची मोहिते-पाटील कुटुंबीयांशी पूर्वीपासून जवळीक आहे. तर इकडे आमदार शिंदे बंधूंनी खासदार निंबाळकरांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास त्यांना दोन लाखांचे मताधिक्य मिळवून देण्याचा विडा उचलला आहे. सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील आणि माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची खासदार निंबाळकरांबरोबर सौहार्दाचे संबंध आहेत.

हेही वाचा… गडकरींविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पूर्वी ते उपमुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतलेल्या आणि मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता मार्गी लागत असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून खासदार निंबाळकर व मोहिते-पाटील यांच्यात जुंपली आहे. मतदारसंघात मागील पाच वर्षात एक लाख कोटी रुपयांचा विकास निधी आणल्याचा दावाही निंबाळकर करतात. एवढेच नव्हे तर संसदेत पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट खासदारांमध्ये आपली गणना होत असल्याचाही त्यांचा दावा आहे. परंतु हे दोन्ही दावे खोटे ठरविण्यासाठी मोहिते-पाटील समर्थकांकडून प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माघारी फिरायचे नाही, या ईर्षेतून स्वतःची उमेदवारी पुढे आणली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार निंबाळकरांची स्तुती केल्यामुळे पुन्हा आपलीच उमेदवारी निश्चित असल्याचा विश्वास बाळगत निंबाळकर सक्रिय झाले आहेत.

जगताप यांना उमेदवारी?

राष्ट्रवादी शरद पवार गटाने माढ्यात जुळवाजुळव चालविली असून स्वतः शरद पवार यांनी माढा, पंढरपूर सांगोला भागात दौरे करून पक्षाची बांधणी हाती घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही माढ्यात टेंभुर्णीसह दहिगाव, वेळापूर आदी भागात पक्ष मेळावे घेऊन माढा लोकसभेसाठी फलटणचे अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे जगताप यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. इकडे भाजपमध्ये खासदार निंबाळकरांना पुन्हा संधी मिळाल्यास मोहिते-पाटील यांच्यासह रामराजे निंबाळकरांची भूमिका काय राहणार ? तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्यास खासदार निंबाळकरांसह आमदार शिंदे बंधूंसह आमदार ॲड. शहाजीबापू पाटील आदी मंडळी कोणता पवित्रा घेणार, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

हेही वाचा… तयार मल्लांचा शोध; उमेदवारीसाठी महायुती – ‘मविआ’त शह – काटशह

२०१९ मधील चित्र

१) रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप)-५ लाख ८३ हजार १९१ मते

२) संजय शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)-४ लाख ९८ हजार २६३ मते

Story img Loader