पिंपरी : मोदी लाटेचा फायदा उठवत, पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी यांचा पराभव करत सलग दोन वेळा दिल्ली गाठल्यानंतर आता तिसऱ्यावेळी दिल्लीचा मार्ग गाठणे मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना खडतर दिसत आहे. महायुतीतील अजित पवार गटाच्या आमदारांचा वाढता विरोध, दहा वर्षांतील विरोधी वातावरण, शिवसेनेतील फूट, समोर संभाव्य तगडा उमेदवार असल्याने यावेळी दिल्लीचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थचा मागीलवेळी पराभव केल्याने देशभरात चर्चेत आलेल्या बारणे यांना आता अजितदादा सोबत असणेही अडचणीचे दिसत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. या मतदारसंघावर २००९ पासून शिवसेनेचे आणि पिंपरी-चिंचवडमधील उमेदवाराचे वर्चस्व राहिले. पहिल्यांदा गजानन बाबर आणि मागील सलग दोन वेळा श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून खासदार आहेत. २०१४ मध्ये विद्यमान खासदार असलेल्या बाबर यांचे तिकीट कापून बारणे यांना उमेदवारी मिळाली आणि नगरसेवक असलेले बारणे संसदेत पोहोचले. २०१४ मध्ये बारणे यांनी पारंपरिक राजकीय विरोधक, शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर लढलेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला. तर, २०१९ मध्ये पवार घराण्यातील पार्थ यांना दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पराभवाची धूळ चारली. बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ यांच्याविरोधात आक्रमकपणे प्रचार केला होता. बाहेरचा, घराणेशाहीतील, लादलेला उमेदवार यावर प्रचाराचा भर होता.
आता परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत बारणे आहेत. तर, अजित पवारही महायुतीसोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेला जागा सुटणार असल्याचे निश्चित आहे. महायुतीचा मीच उमेदवार असणार हे ठामपणे सांगताना धनुष्यबाणावर लढणार की कमळावर हे मात्र सांगण्याचे बारणे खुबीने टाळत आहेत. चिन्ह कोणते असणार यावरही बरीच गणिते अवलंबून असतील. खासदार बारणे यांचे राजकारण लक्ष्मण जगताप, अजित पवारांविरोधात राहिले. त्यांच्या विरोधात आक्रमक बोलत होते. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य जनता बारणे यांच्या बाजूने वळली. २०१९ मध्ये आढेवेढे घेतल्यानंतर भाजपचे आमदार असलेले लक्ष्मण जगताप हे बारणे यांच्या प्रचाराला तयार झाले होते. आता अजित पवार महायुतीसोबत असल्याने बारणे यांच्या प्रचाराची धार बोधट होईल. अजित पवार गट मन लावून काम करेल का याची चिंता राहील.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी बारणे यांना थेट विरोध केला असून गृहीत धरू नका असा इशारा दिला. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही पार्थ यांना उमेदवारी दिल्यास ते निवडून येतील असा दावा केला आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांनी एकेकाळचे आपले कट्टर समर्थक आणि निवडणुकीसाठी ठाकरे गटात गेलेल्या संजोग वाघेरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वाघेरे यांच्याविरोधात मुद्दा दिसत नाही. दोघांचीही मोठी नातीगोती आहेत. महापालिकेत नगरसेवक नाहीत, महापालिका निवडणूक कधी होईल सांगता येत नाही. त्यामुळे पक्षाचे बंधन नसेल, कोण कोणत्या पक्षाचे काम करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे बारणे यांच्यापुढील अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, लोकसंपर्क, नम्र, सतत लोकांना भेटणे या त्यांच्या जमेच्या बाजू दिसतात.
कोकणापेक्षा मावळमधील मतदार जास्त
शहरी, ग्रामीण मतदार मावळमध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यातील तीन-तीन असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात पिंपरी-चिंचवड, पनवेल हा शहरी भाग आहे. तर, मावळ, कर्जत-खालापूर, उरण हा ग्रामीण भाग येतो. मतदारसंघात शहरी, ग्रामीण असे संमिश्र मतदार आहेत. रायगडपेक्षा पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील मतदारसंख्या दीड लाखाने जास्त आहे.
२०१९ मध्ये मिळालेली मते
श्रीरंग बारणे (शिवसेना)
७,१८,९५०
पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
५,०३,३७५