ईशान्य मुंबई हा मतदारसंघ तसा भाजपचा बालेकिल्ला. पण २००९ मध्ये भाजपचा फाजील आत्मविश्वास नडला आणि किरीट सोमय्या पराभूत झाले होते. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणी लढवावा यावरून अद्यापही सहमती झालेली नाही. पण संजय राऊत रिंगणात उतरल्यास लढत चुरशीची होऊ शकते. यामुळेच भाजपसाठी ईशान्य मुंबई मतदारसंघ आव्हानात्मक ठरू शकतो.
मुलुंड ते मानखुर्द शिवाजीनगर अशा विस्तीर्ण पसरलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात संमिश्र वस्ती आहे. मराठी, गुजराती, दलित, मुस्लीम, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य असे मतदार या मतदारसंघात आहेत. ईशान्य मुंबई मतदारसंघाचा कौल हा पारंपारिकदृष्ट्या केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असतो. स. गो. बर्वे, ताराबाई सप्रे, सुब्रमण्यम स्वामी, प्रमोद महाजन, गुरुदास कामत आदी राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जनता लाटेत सुब्रमण्यम स्वामी निवडून आले होते. १९८० मध्येही स्वामी यांनी पुन्हा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१४ पासून ईशान्य मुंबईवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
हेही वाचा – रामजन्मभूमीचा स्वातंत्र्यपूर्व काळातील रक्तरंजित इतिहास
२००९ मध्ये भाजपचे किरीट सोमय्या यांना फाजील आत्मविश्वास नडला. मनसेच्या शिशिर शिंदे यांना मिळालेल्या सुमारे दोन लाख मतांमुळे सोमय्या हे चार हजार मतांनी पराभूत झाले. तेव्हा राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील हे निवडून येतील, असे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही वाटले नव्हते. २०१४ मध्ये सोमय्या निवडून आले. २०१९ मध्ये भाजपच्या नेतृत्वाने किरीट सोमय्या यांचा पत्ता कापला. त्यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. पक्षाने उमेदवारी नाकारली तरी किरीट सोमय्या हे गेली पाच वर्षे सक्रिय होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची प्रकरणे बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. पण पक्ष नेतृत्व त्याची दखल घेण्याची शक्यता नाही. सोमय्या यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. तसेच त्यांचा राज्यसभेसाठीही विचार केला नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सोमय्या यांच्या नावार फुल्ली मारल्याचेच बोलले जाते. यामुळे कोटक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल, अशी चिन्हे आहेत. अर्थात, भाजपचे नेतृत्व कोणता निर्णय घेईल याबाबत पक्षात कोणीच खात्री देऊ शकत नाही.
मुलुंडमध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावरून कोटक यांच्याबद्दल नाराजीची भावना ऐकू येते. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चाचपणी करून मगच भाजप निर्णय घेईल, असे सांगण्यात येते. मुलुंड, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघातील गुजराती, जैन, मारवाडी समाजाच्या मतांवर भाजपची अधिक मदार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार याबाबत अद्याप सहमती झालेली नाही. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. कारण २००९ मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले खासदार संजय राऊत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा मतप्रवाह आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे विक्रोळी मतदारसंघाचे आमदार आहेत. ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाची चांगली ताकद आहे. संजय राऊत हे उमेदवार असल्यास ईशान्य मुंबईत चुरशीची लढत होऊ शकते. तसेच राष्ट्रीय पातळीवर या लढतीकडे लक्ष वेधले जाईल. कारण राऊत यांनी राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतले आहे. काँग्रेसकडे लढत देऊ शकेल असा ताकदीचा उमेदवार नाही. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दावा केला असला तरी पक्षाची ताकद नगण्य आहे. संजय पाटील हेच आता राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत.
संजय राऊत यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी महाविकास आघाडीत केली जात आहे. राऊत उमेदवार असल्यास भाजपकडून सारी ताकद पणाला लावली जाऊ शकते. वंचित बहुजन आघाडी कोणती भूमिका घेते यावरही बरेच अवलंबून असेल. कारण या मतदारसंघातील सुमारे लाखभर मते वंचित किंवा रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मिळतात, असा इतिहास आहे. अगदी गेल्या निवडणुकीतही वंचितच्या उमेदवाराला सुमारे ७५ हजार मते मिळाली होती. वंचितची मते भाजपला मिळणे कठीण असते. वंचित स्वतंत्र लढल्यास त्याचा महाविकास आघाडीलाच फटका बसू शकतो. ईशान्य मुंबई मतदारसंघातील रेल्वे, झोपडपट्य्यांचा विकास, वाहतूक हे प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत. मानखुर्द शिवाजीनगरमधील झोपडपट्टीतील प्रश्न सुटलेले नाहीत. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील बाधितांना मुलुंडमध्ये पर्यायी घरे देण्याचा मुद्दाही तापला आहे. हा मुद्दा भाजपलाच त्रासदायक ठरू शकतो. कारण धारावी पुनर्विकासाचे काम अदानी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. अदानीच्या हिताला बाधा येईल असा निर्णय घेणे भाजप किंवा महायुती सरकारला सध्या तरी शक्य दिसत नाही. मुलुंडमध्ये हा विषय अधिक तापू शकतो. किरीट सोमय्या यांनी आधीच प्रकल्पग्रस्तांना घरे देण्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
२०१९ मध्ये उमेदवारांना मिळालेली मते :
मनोज कोटक (भाजप) : ५,१४,५९९
संजय पाटील (राष्ट्रवादी) : २,८८,११३