पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांचेच लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल, यावरच या मतदार संघातील चुरस ठरणार आहे. अजित पवार यांनी ‘इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐका. शेवटची निवडणूक आहे, असे सांगून भावनिक केले जाईल; पण विकासकामे करायची असतील, तर माझ्या विचाराच्या उमेदवाराला निवडून द्या’ असे त्यांच्या खास शैलीत आवाहन केल्यामुळे बारामतीत मतदार भावनेला साद देणार की, विकासाला साथ, यावर या मतदार संघाचा निकाल अवलंबून असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार हे भाजपच्या संगतीला गेल्यानंतर बारामतीतील सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांना मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुळे यांच्यासमोर नवीन चिन्ह घेऊन लढण्याचे आव्हान उभे राहिले आहे. सुळे यांच्यासमोर उमेदवार कोण, यावर या मतदार संघाचा निकाल अवलंबून असणार आहे. अजित पवार हे सध्या भाजपच्या समावेत असल्याने भाजपचे नेते इशारा करतील त्या पद्दतीने त्यांना बारामती लोकसभेबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. यंदा बारामती जिंकणारच, असे भाजपचे नेते दावा करीत आहेत. तर ही जागा आपला पक्ष लढविणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा : पहाडी नेत्या शहनाज गनई यांचा भाजपात प्रवेश; लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधील राजकीय समीकरणं बदलणार?

सुनेत्रा पवार उमेदवार असतील तर…

सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप पवार यांच्याकडून जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. सुनेत्रा पवार या उमेदवार असतील तर सुळे यांना कडवी लढत द्यावी लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपकडून आग्रह धरला गेल्यास अजित पवार यांनाही ताकद पणाला लावावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून भावनिक प्रचार केला जाणार असल्याने अजित पवार यांना विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बारामतीतील मतदार हे भावनेला साद देणार की, विकासाला साथ देणार, यावरच निकाल चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या बारामतीतील सभांना आणि कार्यक्रमांना गर्दी होत आहे. मात्र, गेल्या महिन्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आक्रोश मोर्चा हा बारामतीमध्ये आला असता, बारामतीकरांना मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे बारामतीकरांना अंदाज सध्यातरी लागणे कठीण असल्याचे दिसून येत आहे.

सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेली नाही, तर पर्यायी उमेदवारांचीही चाचपणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या मतदार संघात बारामती, दौंड आणि इंदापूर या परिसरात धनगर समाजातील मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या समाजाला प्रतिनिधित्त्व देण्याचा पर्यायावर चर्चा सुरू आहे. यापूर्वी २०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना चार लाख ५२ हजार मते मिळाली होती. जानकर यांनीही भाजपने तिकीट दिल्यास बारामतीतून लढण्याची तयारी दर्शविली आहे. भाजपकडून इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील किंवा मागील निवडणुकीत लढत दिलेल्या भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी रंजना यांच्या नावाचाही पर्याय असल्याचे सांगण्यात येते

हेही वाचा : कधी भाजपा, कधी समजावादी पक्ष, तर कधी काँग्रेसशी युती; राष्ट्रीय लोक दल पक्षाचा राजकीय इतिहास काय? वाचा…

भाजपचे ‘मिशन बारामती’ थांबले?

अजित पवारांच्या भाजप मैत्रीने भाजपचीही कोंडी झाली आहे. भाजपने २०२१ मध्ये ‘मिशन बारामती’ मोहीम हाती घेतली होती. हे मिशन मागे पडले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे दौरे गेली दोन वर्षे सातत्याने सुरू होते. आता हे दौरे थांबले असल्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कोंडमारा झाला आहे.

विधानसभानिहाय बदलती समीकरणे

बारामती लोकसभा मतदार संघात बारामतीसह दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. बारामतीमध्ये भावनिक आणि विकासावर मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी मतांचे विभाजन होणार, हे स्पष्ट आहे. अजित पवार यांच्या भाजपमैत्रीमुळे राजकीय चित्र बदलले आहे. दौंड विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार राहुल कुल हे आहेत. तसेच या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवार यांच्या पक्षात सामील झाले आहेत. इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे हेदेखील अजित पवार यांच्याबरोबर आहेत. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आहेत. त्याचा फायदा अजित पवार यांना होण्याची शक्यता आहे. मात्र, दौंड आणि इंदापूरमध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

हेही वाचा : जया बच्चन राज्यसभेच्या पाचव्या कार्यकाळासाठी सज्ज; आतापर्यंत कशी राहिली संसदीय कारकीर्द?

पुरंदरमध्ये काँग्रेसचे आमदार संजय जगताप हे आहेत. गेल्या निवडणुकीत जगताप यांना अजित पवार यांनी साथ दिली होती. शिवसेनेचे तत्कालीन आमदार विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी ‘कसा निवडून येतो तेच बघतो’ असे जाहीर आव्हान दिले होते. आता शिवतारे यांनीही अजित पवार यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. भोरमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे आहेत. पवार कुटुंबीय आणि थोपटे यांच्यात आजवर फारसे सख्य राहिलेले नाही. आता मात्र सुळे यांना थोपटे यांच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

खडकवासला मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर हे उमेदवार आहेत. खडकवासला मतदार संघात शहरी भाग असल्याने मागील दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदार संघ धोका देत आला आहे. या मतदार संघात सुळे यांना कमी मते मिळत आहेत, ही त्यांच्यादृष्टीने डोकेदुखी असणार आहे. त्यामुळे या मतदार संघावर सुळे यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. दर रविवारी या मतदार संघात त्या वेगवेगळे कार्यक्रम घेऊन मतदारांच्या संपर्कात असतात. महापालिका प्रशासनाबरोबर बैठक घेऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील रहात आल्या आहेत.

हेही वाचा : उत्तर प्रदेशच्या दोन काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री योगींसोबत अयोध्या यात्रा; पक्षांतर्गत मतमतांतरं असण्यामागे कारण काय?

बारामती आणि पवार कुटुंबीय

बारामती आणि पवार कुटुंबीय हे नाते १९८४ मध्ये शरद पवार हे या मतदार संघातून पहिल्यांदा खासदार झाल्यापासून आहे. त्यांनी सहा वेळा या मतदार संघाचे नेतृत्त्व केले आहे. सुप्रिया सुळे या २००९ पासून सलग तीनवेळा या मतदार संघातून निवडून आल्या आहेत. यावेळी त्यांना स्वकियांशीच लढा द्यावा लागणार असल्याने त्यांच्यासमोर उमेदवार कोण आहे, यावरच निकाल अवलंबून आहे.

२०१९ मधील उमेदवार आणि मिळालेली मते

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) -६,८६,७१४
कांचन कुल (भाजप) – ५,३०,९४०

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of baramati will ajit pawar wife sunetra pawar contest against supriya sule print politics news css
Show comments