संजय मोहिते, लोकसत्ता

बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात गेल्याने ही जागा शिंदे गटालाच मिळेल हे अपेक्षित असले तरी भाजपने या जागेसाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे असली तरी काँग्रेसनेही त्यावर दावा केल्याने महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असतील याबाबत अनिश्चितता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचीही भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.

Opposition of Mahavikas Aghadi to development works in Naina area
नैना क्षेत्रातील विकसकामांना महाविकास आघाडीचा विरोध
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
man suicide due to father-in-laws troubles Crime against six people
सासरच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
himanta Biswa Sarma
Assam : ‘खतं जिहाद’ अन् ‘जमीन जिहाद’नंतर आता आसामध्ये ‘पूर जिहाद’ होत असल्याचा आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप, नेमकं काय म्हणाले?
Involved Jai Malokar in car vandalism cases for no reason alleged Amol Mitkari
“जय मालोकारला विनाकारण गुंतवले कारण…”, अमोल मिटकरींचा आरोप; म्हणाले, “अमेय खोपकरांनी माझ्या शर्टाच्या बटनाला…”
Offense against the oppressor of the widowed wife of a friend solhapur
मित्राच्या विधवा पत्नीवर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
hyderabad woman rape case
चालत्या बसमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; पीडितेनं वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने आरोपी पोलिसांच्या तावडीत!

बुलढाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. १९९६ पासून ते २०१९ पर्यंत एकमेव (१९९८ चा) अपवाद वगळता येथून शिवसेना विजयी होत आली. मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना तीनवेळा आनंदराव अडसूळ विजयी झाले. २००९ मध्ये खुला झाल्यावर प्रतापराव जाधव सलग तीनदा विजयी झाले.

आणखी वाचा-नगरमध्ये विखे-पाटील यांच्या साम्राज्याला आव्हान मिळणार का ? 

शिवसेना व भाजप युती असताना त्यात भाजप ‘लहान भावाच्या’ भूमिकेत होता. आता सेनेत फूट पडल्यानंतर पक्षाची भूमिका ‘मोठ्या भावा’ची आहे. याच कारणामुळे भाजपने ‘मिशन-४५’ मध्ये बुलढाण्याचा समावेश केला. या मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आतापर्यंत मतदारसंघाला पाच वेळा भेट दिली. सेनेमध्ये फूट पडल्याने बुलढाण्यात संधी आहे हे लक्षात घेऊन भाजपने सर्वेक्षणात शिंदे गटाचे खासदार जाधव यांच्याप्रती प्रतिकूल मत असल्याच्या चर्चेला बळ दिले. निवडणूक तोंडावर आली असतानाही महायुतीचे उमेदवार जाधवच असतील हे भाजपकडून सांगणे टाळले जात आहे. अलीकडेच चिखलीत झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा प्रतापराव जाधव हे विरोधी उमेदवारांची अनामत जप्त करतील, असे जाहीर केले. मात्र दुसऱ्याच दिवशी शेगावात झालेल्या मित्र पक्षांच्या बैठकीत ‘नेते जो उमेदवार देतील, त्याच्या पाठीशी एकजुटीने उभे राहू’ असे सूचक विधान मित्रपक्ष समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार संजय कुटे (भाजप) यांनी केले. बैठकीनंतर, सलग तीनवेळा खासदार झालेल्या जाधवांचे नाव का घेतले नाही? असा सवाल जाधव समर्थकांनी उपस्थित केला. यावरून भाजपच्या मनात, ‘काही तरी वेगळेच आहे’ का ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

भाजपकडूनही चाचपणी

भाजपने पक्षांतर्गत उमेदवारीची चाचपणी देखील केली. आमदार कुटे, आकाश फुंडकर, श्वेता महाले यांना विचारणा करण्यात आली. भूपेंद्र यादवांच्या प्रवासात चिखलीच्या आमदार महाले यांचा पूर्णवेळ सहभाग होता. लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजयराज शिंदे यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजप ऐनवेळी काय करते यावर चित्र अवलंबून आहे. तूर्तास तरी युतीच्या उमेदवारीचा संभ्रम कायम आहे. दुसरीकडे खासदार जाधव यांनी आपली उमेदवारी निश्चित असे समजून कामाला सुरूवात केली आहे. सर्वेक्षणाचे प्रतिकूल अहवाल आणि जिल्हा भाजप सुकाणू समितीचा विरोध या केवळ अफवा असून आपली उमेदवारी व विजय निश्चित असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. ‘आणीबाणीच्या प्रसंगात’ बुलढाणा आमदार संजय गायकवाड हे पर्याय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी वाचा-फुटीनंतरही उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहिलेल्या परभणीत भगवा पुन्हा फडकणार ?

ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची जागा

मतदारसंघात सेनेला आतापर्यंत मिळत आलेला सलग विजय लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याची जागा प्रतिष्ठेची केली आहे. मात्र त्यांच्याकडे सक्षम उमेदवाराची वानवा आहे. तूर्तास संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जोमाने कामाला लागले आहे.मात्र अजून उमेदवार ठरला नसल्याचे पक्षनेत्यांनी स्पष्ट केले आहे. ऐनवेळी आघाडीतील मित्रपक्षाचा सक्षम नेता ठाकरे गटाचा उमेदवार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसकडे दहा अर्ज

बुलढाण्यावर जोरदारपणे दावा करणाऱ्या काँग्रेसकडे दहा जणांनी अर्ज केले आहे. जयश्री शेळके, श्याम उमाळकर, हर्षवर्धन सपकाळ, ज्ञानेश्वर पाटील वगळता तुल्यबळ उमेदवार पक्षाकडे नाही. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची ताकद असतानाही त्यांनी या शर्यतीतून माघार घेतल्याने पक्षातूनच आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र ठाकरे गट ही जागा सोडणार काय व सोडलीच तर गटबाजीचे ग्रहण लागलेली काँग्रेस एकमताने उमेदवार सुचवेल काय? हा कळीचा मुद्दा आहे.

आणखी वाचा-नाशिक शिवसेनेच्या ठाकरे की शिंदे गटाचे ? 

राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ घटले

बुलढाण्यात चारदा अपयशी झुंज देणाऱ्या राष्ट्रवादीची देखील दोन शकले झाली आहेत. यामुळे दोन्ही गट बुलढाण्यात दावा करण्याची शक्यता जवळपास नाही. तसे झालेच तर शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर तर अजितदादा गटाकडून माजीमंत्री राजेंद्र शिंगणे ही नावेच पुढे येऊ शकतात. राजकीय तडजोडीत शिंगणे हे युतीचे उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा आहे. मनसेने देखील बुलढाण्यात लढण्याची तयारी चालवली आहे. मात्र उमेदवारीचे चित्र अस्पष्ट आहे. फारकतीच्या उंबरठ्यावर असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर व वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके हे यंदाची निवडणूक लढणार हे उघड आहे. तुपकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले. शाहू परिवाराचे संदीप शेळके हे निवडणूक लढवायचीच या जिद्दीने इरेला पेटले आहेत.