कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात तगड्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निकालाबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, वंचितचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. सी. पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यातील लढतीत कोण कोणाची किती मते खेचतात हे निकालाला कलाटणी देणारी ठरू शकते. अखेरच्या टप्प्यातील बड्या नेत्यांच्या सभांमुळे कुंपणावरील मतदार कोणाकडे वळणार हे परिणामकारक ठरेल.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीचे निश्चितीचे मानापमान नाट्य भलतेच ताणले गेले. महायुती मध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने पेच वाढला. त्यावर मात करीत खासदार धैर्यशील माने हे पुन्हा उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरले. त्यानंतरही अपक्ष आमदारांचे नाराजीचे प्रकरण पुढे आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या दोन दौऱ्यांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे, इचलकरंजीचे ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे आणि शिरोळचे शिंदेसेनेचेच राजेंद्र पाटील यड्रावकर या अपक्ष आमदारांची नाराजी दूर केली. आता तिघांनीही प्रचारामध्ये जोमाने उडी घेतली आहे.भाजप, शिंदे शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी यांचा संयुक्त प्रचार गतीने सुरू झाला आहे. उमेदवाराच्या नाराजीचा मुद्दा पुसून काढून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यावर भर दिला जात आहे. धैर्यशील माने यांनी ८२०० कोटी रुपयांच्या कामांचा तपशील द्यायला सुरुवात केली आहे. या साऱ्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा फंडा वापरला गेला आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना रसद पुरवून प्रचारात उतरवले गेले असल्याने त्याचाही फायदा होईल असे दिसत आहे.
हेही वाचा : भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीपासूनच राजू शेट्टी हे निवडणुकीला उभे राहणार हे निश्चित होते. त्यांची महाविकास आघाडीशी चर्चा सुरू होती. पण केवळ पाठिंबा देण्यास महाविकास आघाडीने नकार दिल्यावर ते स्वाभिमानीच्या ताकदीवर आखाड्यात उतरले आहेत. इचलकरंजीतील पाणी प्रश्न, वस्त्रोद्योग या दोन मुद्द्यांमुळे गतवेळी शेट्टी यांची संसदेत जाण्याची वाट रोखली गेली. या प्रश्नाबाबत आपण नेमके काय केले यावर त्यांनी प्रचारात भर दिला असला तरी तो शहरी मतदारांना किती भावतो यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. याच्या जोडीला ग्रामीण भागातील जनता, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर त्यांची मुख्य मदार आहे. साखर कारखानदार विरोधातील लढाई असे स्वरूप त्यांनी यावेळच्या निवडणुकीला देऊन हक्काचा मतदार जवळ करण्यावर भर दिला आहे.
राजू शेट्टी हेच महा विकासा आघाडीचे उमेदवार असतील असा शेवटपर्यंत अंदाज होता. अखेरच्या टप्प्यात समीकरण बिघडले. शिवसेनेकडे आलेल्या या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी दिली. आजी-माजी खासदारांतील दोष मतदारांसमोर दाखवत चांगला पर्याय समोर येत असल्याचा मुद्दा ते ठसवत आहेत. पश्चिमेकडील भागाला पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व मिळाले ही त्यांची जमेची बाजू. तुलनेने पूर्वेकडील भागाचा कमी अभ्यास ही कमतरता. आश्वासक, तरुण चेहरा असल्याने सर्व विधानसभा क्षेत्रात मिळणार प्रतिसाद हुरूप आणणारा आहे. शिराळा, वाळवा मतदार संघातून जयंत पाटील, मानसिंग नाईक या आमदारांची सरुडकरांना चांगली मदत होत आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये काही प्रमाणात मरगळ असली तरी तळातील शिवसैनिक यावेळी जिद्दीने काम करत आहे. बाकी या मतदारसंघात शेतकरी प्रतिनिधी असलेले रघुनाथ पाटील आणि वंचितचे जैन समाजाचे डी. सी. पाटील हे कोणाचे किती मते खाणार यावर निकालाचा कौल बराच अवलंबून आहे.
हेही वाचा : “तुमच्या आजीनेच आम्हाला तुरुंगात टाकलं”; डाव्यांची राहुल गांधींवर टीका
मतदारसंघातील जातीय समीकरणे परिणामकारक ठरू शकतात. सर्वात मोठा मराठा समाज माने- सरुडकर यांच्यात विभागाला जाईल. जैन समाजाची दोन लाखापर्यंतची मते ही शेट्टींना तारण्यास उपयुक्त ठरतील. गेल्यावेळी वंचितच्या उमेदवारास सव्वा लाखाची मते मिळाली होती. आता वंचितांचा उमेदवार मुस्लिम नसल्याने या समाजाने जिंकणाऱ्या उमेदवारास मत असा सूर लावला आहे. दलित, ओबीसी मतांवर सर्व पक्षीयांनी जाळे फेकले असले तरी या वर्गाने समोरचा प्रचारक पाहून सोयीचे गणित मांडायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा : गोव्यावर भारताचं संविधान लादण्यात आलं? काँग्रेस उमेदवाराच्या वक्तव्यावरून वादाला फुटलं तोंड
शेवटच्या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या सभा असल्याने त्या वातावरण निर्मितीचा महायुती कसा लाभ उठवते हेही महत्त्वाचे ठरले आहे. त्यास उतारा म्हणून आयोजित केल्या जाणाऱ्या शरद पवार, उद्धव ठाकरे, वरिष्ठ काँग्रेस नेते यांच्या सभा आधीचे वातावरण कितपत बदलणार याला महत्व आहे. एकंदरीत पंचरंगी लढत असली तरी माने, शेट्टी, सरूडकर यांच्यात मुख्य स्पर्धा आहे. तिघेही मताचा तीन लाखाचा टप्पा गाठतील असा अंदाज आहे. खरी स्पर्धा असेल ती पुढील एकेक मत मिळवण्याची. त्यात पुढे सरकेल त्याच्या गळ्यात असेल यशोमाला !