जळगाव – सतत भाजपला साथ देणारा अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी मात्र प्रारंभी भाजपसाठी सहजसोपी वाटणारी निवडणूक शिवसेना ठाकरे गटाने करण पवार-पाटील यांना उमेदवारी दिल्याने अवघड झाली आहे. मराठा समाजबहुल मतदारसंघ असल्याने आघाडी आणि महायुती या दोघांनी मराठा समाजाचे उमेदवार दिले असल्याने ओबीसी मतदारांवर जय-पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपसाठी प्रारंभी अनुकूल वाटणाऱ्या या मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मित्र करण पवार- पाटील यांच्यासह ठाकरे गटात प्रवेश करुन भाजपला आव्हान दिले आहे. त्यामुळे स्वत: उमेदवार नसले तरी खरी लढत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन विरुध्द उन्मेष पाटील यांच्यातच आहे. भाजपचे आमदार आणि महाजन यांचे कट्टर समर्थक मंगेश चव्हाण यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पहिल्या लोकसभेपासून अर्थात १९५२ पासून काँग्रेसचा गड राहिलेला एरंडोल अर्थात आताचा जळगाव मतदारसंघ तीन ते साडेतीन दशकांत १९९१ पासून अपवाद वगळता भाजपचा गड राहिला आहे. मतदारसंघात मागील सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला आहे.

हेही वाचा : अखिलेश यादवांच्या मुलीने प्रचारसभांमध्ये वेधले लक्ष; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अदिती?

भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यामागे पक्षसंघटन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ असून, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार- पाटील यांंना जनसंपर्कासह मित्रपरिवार, नातेसंबंधांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यांना त्यांचे काका आणि एकेकाळचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनीही पाठबळ दिले आहे. भाजपमधूनच ठाकरे गटात आल्यामुळे उन्मेष पाटील आणि करण पवार यांना भाजप विजयासाठी कोणकोणत्या प्रकारची व्यूहरचना आखतो, याची जाणीव आहे. भाजपसाठी तीच मोठी डोकेदुखी आहे. यामुळे भाजपसाठी एकतर्फी वाटणार्या या निवडणुकीत ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील व करण पवार-पाटील यांनी आव्हान निर्माण केले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून युवराज जाधव यांची उमेदवारी असली तरी, त्यांचा फारसा फरक ठाकरे गट आणि भाजप या लढतीवर होण्याची शक्यता नसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

हेही वाचा : जातीय हिंसाचारामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला; कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत?

भाजप मोदींवर अवलंबून तर, ठाकरे गटाचा शेतकऱ्यांच्या समस्यांवर भर

भाजपकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी याच मुद्यावर प्रामुख्याने प्रचाराचा भर ठेवण्यात आला आहे. याशिवाय राममंदिराचाही विषय वापरला जात आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक भर देण्यात येत आहे. अल्प दरामुळे हैराण झालेले दूध उत्पादक, पीकविमा काढलेला असतानाही हजारो केळी उत्पादकांना त्याचा लाभ न मिळणे, कापूस उत्पादकांच्या समस्या, या प्रश्नांभोवती प्रचार फिरता ठेवण्याचे काम ठाकरे गटाने केले आहे. कापूस उत्पादकांसाठी याआधी भाजपचे गिरीश महाजन, शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंगाडे मोर्चे काढले होते. परंतु, सत्ता हाती असतानाही शेतकऱ्यांना हे दोन्ही नेते न्याय देऊ शकले नसल्याचा प्रचार ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : “आम्हाला संपवण्यासाठी RSS ने तृणमूल काँग्रेसची निर्मिती केली”; डाव्यांचा आरोप

जळगाव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमधील सध्याची स्थिती – जळगाव शहर- भाजप, जळगाव ग्रामीण – शिंदे गट, अमळनेर – अजित पवार गट, एरंडोल-पारोळा – शिंदे गट, चाळीसगाव- भाजप, पाचोरा-भडगाव- शिंदे गट

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of jalgaon mahavikas aghadi mahayuti victory depends on obc voters print politics news css