पिंपरी : निर्मितीपासून शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या वेळी दोन्ही शिवसेनेतच लढत होत आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रारंभी महायुतीसाठी सोपी वाटणारी निवडणूक वाघेरे यांच्यामुळे चुरशीची झाली आहे. या मतदारसंघातील सहापैकी भाजपचे तीन, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. शिवसेनेच्या मतांची दोन गटांत विभागणी झाल्याने बारणे यांची भिस्त भाजप, राष्ट्रवादीवर असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शहरी, निमशहरी, ग्रामीण भाग येतो. पनवेल, उरण, कर्जत, पिंपरी, चिंचवड आणि मावळ या सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीमधील घटक पक्षांचे आमदार असतानाही महायुतीसमोर आव्हान निर्माण झाल्याचे दिसते. मोठी राजकीय ताकत असलेले भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव करून दोन वेळा सहजपणे दिल्ली गाठणाऱ्या बारणे यांच्या समोर तिसऱ्या वेळी आव्हान असल्याचे दिसते. मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे कर्जतचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे बारणे यांची भिस्त भाजप, राष्ट्रवादीवर दिसून येत आहे. पनवेलला प्रशांत ठाकूर, चिंचवडला अश्विनी जगताप या भाजपच्या आमदार असून, उरणचे महेश बालदी हे भाजप संलग्न आहेत. मावळला सुनील शेळके, पिंपरीत अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

हेही वाचा : भाजपाला समर्थन देणारे आणखी १० आमदार काँग्रेसच्या संपर्कात? हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

कागदावर महायुतीची ताकत असल्याने सुरुवातीला बारणे यांच्यासाठी निवडणूक सोपी वाटत होती. परंतु, महायुतीसोबत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय वाघेरे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंगत आली. वाघेरेंनी पिंपरी-चिंचवड, मावळमध्ये नात्यागोत्यांचा आधार, जुन्या पक्षातील सहकाऱ्यांची मदत घेत प्रचार सुरू केला. महाविकास आघाडीला सहानुभूती असल्याचे काही ठिकाणी जाणवते, परंतु नेते-कार्यकर्ते आघाडी म्हणून लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे, तसेच सहानुभूती, दहा वर्षांतील नाराजीचा फायदा घेण्यात कमी पडल्याचे निरीक्षण आहे. वाघेरेंकडे समयसूचकता, आक्रमकतेचा अभाव असल्याचेही दिसून आले. शेवटच्या आठवड्यात बारणे यांच्या प्रचारासाठी मोठे नेते मैदानात उतरल्याने महायुतीला फायदा होईल असा अंदाज लावला जात आहे. बारणे आणि वाघेरे हे दोघेही नातलग असून, एकमेकांवर टीका-टिप्पणी टाळत असल्याचे दिसते.

चिंचवड, पनवेल निर्णायक

या मतदारसंघातील २५ लाख मतदारांपैकी केवळ चिंचवड आणि पनवेल या दोन मतदारसंघांत ११ लाख ६१ हजार मतदार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ शहरी असून, त्यावर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून, मावळचा खासदार ठरविणार आहेत.

हेही वाचा : हरियाणात सरकार अल्पमतात येऊनही भाजपा एवढी निर्धास्त का?

नात्यागोत्यांच्या मतांची विभागणी

मावळात पहिल्यांदाच स्थानिक उमेदवारांमध्ये लढत होत आहे. बारणे आणि वाघेरे हे दोघेही पिंपरी-चिंचवडमधील आहेत. शहरात गावकी-भावकी, नात्यागोत्यांचे राजकारण चालत असून, दोघांचीही मोठी नातीगोती आहेत. त्यामुळे नात्यागोत्यांच्या मतांची विभागणी होऊ शकते. ती मते कोणाच्या पारड्यात जातात, यावर बरीच गणिते अवलंबून असतील.

संभ्रम वाढला

या मतदारसंघात महायुतीत खदखद असल्याचे सातत्याने दिसून आले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी प्रचारात सक्रिय होत नसल्याने प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याची बारकाईने माहिती घेण्याकरिता सहा जणांचे खास पथक दिल्लीहून दाखल झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात कोणतेही पथक आले नव्हते. मात्र, पथकाच्या चर्चेने महायुतीत संभ्रम वाढला. पथकाची क्लृप्ती फायद्याची की अडचणीची ठरते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.

हेही वाचा : गांधी घराण्याचे सेवक ते सोनिया गांधींचे स्वीय सहाय्यक; स्मृती इराणींना अमेठीतील काँग्रेस उमेदवाराने दिले उत्तर

स्थलांतरित उद्योगाचा प्रश्न गंभीर

रेल्वे रुंदीकरण, वाहतूक समस्येचा प्रश्न गंभीर असून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांमुळे बेरोजगारीत मोठी वाढ झाली. तळेगाव एमआयडीसीमध्ये येणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने लघुउद्योजक, स्थानिक बेरोजगार तरुण, छोटे-मोठे व्यावसायिक, स्थानिक मालमत्ताधारक आदींनी संताप व्यक्त केला असून, त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. जनरल मोटर्स कंपनी बंद पडल्याने एक हजार कामगार बेरोजगार झाले. तसेच रेडझोन, अनधिकृत बांधकामे, नदीसुधार, पवना बंदिस्त जलवाहिनी, नियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of maval a difficult challenge to win for shinde faction print politics news css