संतोष प्रधान
अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दिंडोशी असा विस्तारलेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील चित्र सारेच अस्पष्ट आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे महायुतीत कोण लढणार याबाबतही स्पष्टता नाही.
मराठी, उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लीम, दलित, ख्रिश्चन असे संमिश्र मतदार असलेल्या या उत्तर पश्चिम मतदारसंघावरून महाविकास आघाडी तसेच महायुतीतही वाद, अंतर्गत कुरघोड्या बघायला मिळतात. २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर निवडून आले होते. तब्येत साथ देत नसल्याने मध्यंतरी किर्तीकर फारसे सक्रिय नव्हते. पण शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात गेल्यावर किर्तीकर एकदमच सक्रिय झाले आहेत. त्यांची पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत. अमोल किर्तीकर हे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. तसे झाल्यास वडिल आणि मुलगा परस्परांच्या विरोधात उभे ठाकू शकतात.
आणखी वाचा-‘गांधी जिल्ह्या’वर भाजपचा पगडा
गजानन किर्तीकर यांना उमेदवारी हवी असतानाच मध्यंतरी शिंदे गटाचे दुसरे नेते रामदास कदम यांनी किर्तीकर यांच्यावर अत्यंत वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी केली होती. उभयतांमधील वाद चार-पाच दिवस सुरू होता. रामदास कदम यांना आपले दुसरे पुत्र सिद्देश यांच्यासाठी या मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. त्यातूनच रामदास कदम आणि किर्तीकर या जुन्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली. यामुळेच महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आल्यास उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप काहीच चित्र स्पष्ट नाही. शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्यास भाजपचा या मतदारसंघावर डोळा आहेच.
महाविकास आघाडीत काँग्रेसचे संजय निरुपम या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक आहेत. गेल्या वेळी त्यांनी किर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली असता त्यांना तीन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. पण शिवसेनेच्या ठाकरे गटाने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. ठाकरे गटाला किर्तीकर यांचे पुत्र अमोल यांच्यासाठी हा मतदारसंघ हवा आहे. उत्तर पश्चिम काँग्रेसने हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा, अशी मागणी लावून धरली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सध्या थंडावली आहे. यामुळे आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटतो यावर बरेच काही अवलंबून असेल. हा मतदारसंध काँग्रेसला मिळणार नसल्यास संजय निरुपम हे सुद्धा काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अमोल किर्तीकर यांना उमेदवारी नाकारली तर तेही पक्षात थांबतील का, याची ठाकरे गटाला भीती आहे.
आणखी वाचा-पुण्याचे कोडे कायम
मतदारसंघात मुस्लीम आणि उत्तर भारतीयांची सुमारे चार लाख मते आहेत. या मतांच्या आधारावर निरुपम यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. मुस्लीम एकगठ्ठा मते मिळू शकतात, असे निरुपम यांचे गणित आहे. अमोल किर्तीकर हे लोकसभेचे उमेदवार नाहीत, असे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. मतदारसंघातील काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी आग्रही मागणी केली आहे.
आरेचा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी महत्त्वाचा आहे. मेट्रो कारशेडला उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात परवानगी नाकारण्यात आली होती. पण सत्ताबदल होताच आरेमध्येच कारशेड उभारण्यात येत आहे. अंधेरी, गोरेगाव आदी परिसरात ठाकरे गटाचा प्रचाराचा हाच मुद्दा असेल. अंधेरीतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यात सरकारी यंत्रणांना आलेल्या अपयशाचा मुद्दाही प्रचारात गाजू शकतो. जोगेश्वरी मतदारसंधातील मुस्लीम एकगठ्ठा मतदान कोणाला होते हे सुद्धा महत्त्वाचे असेल. अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीनेच भाजपने माघार घेतली होती. यामुळेच ठाकरे गटाच्या आशा अधिक पल्लवीत झाल्या आहेत.
२०१९ मधील उमेदवारांना मिळालेली मते
गजानन किर्तीकर (शिवसेना) – ५,७०,०६३
संजय निरुपम (काँग्रेस) – ३,०९,७३५