पुणे : भाजपने राज्यसभेसाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संधी देऊन पुणे लोकसभा मतदार संघातील अवघड झालेली राजकीय समीकरणे एकाच निर्णयाने सोडविली आहेत. मात्र, तरीही लोकसभेसाठी ब्राह्मण उमेदवार द्यायचा की ब्राह्मणेतर, हे भाजपपुढील कोडे सुटलेले नाही. काँग्रेसमधील गटबाजी ऐन निवडणुकीत उफाळून आली असल्याने कोणताही उमेदवार असला, तरी त्याला मतदारांना मते देण्यासाठी भुलविण्यापेक्षा स्थानिक नेत्यांना बरोबर घेण्यासाठी शक्ती पणाला लावावी लागणार आहे. जुन्यांनाच पुन्हा रणांगणात लढायला लावायचे की, नवीन चेहऱ्याला संधी द्यायची, हा काँग्रेसपुढील यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा उमेदवार कोण, यावर काँग्रेसची खेळी अवलंबून असणार आहे.
मेधा कुलकर्णी यांना खासदारकी बहाल करून भाजपने पुण्यातील उमेदवारीची चुरस थोडी कमी केली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण उमेदवार न दिल्यामुळे भाजपला फटका बसल्याचे बोलले जाते. त्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर पुण्यातील काँग्रेसमध्ये जिवंतपणा आला आहे. मरणासन्न अवस्थेतील पुण्यातील काँग्रेसला पुन्हा जुने दिवस येतील, असे वाटू लागले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने का होईना, पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये माणसांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, भाजप ही ब्राह्मण की ब्राह्मणेतर उमेदवार, यामध्ये अडकून पडली आहे.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर होणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण, यावर काँग्रेसचे आराखडे अवलंबून आहेत. भाजपकडून माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार जगदीश मुळीक हे दोन ब्राह्मणेतर उमेदवार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर हेदेखील सध्या पुण्यात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तिघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची, या कोंडीत भाजप सापडली आहे.
देवधर उमेदवार असतील तर…
कसब्याच्या निकालाची पुनरावृत्ती नको म्हणून भाजपने सुनील देवधर यांना उमेदवारी दिल्यास भाजपला ब्राह्मणेतर मतदारांचा रोष पत्करावा लागणार आहे. राज्यसभेवर मेधा कुलकर्णी आणि लोकसभेवर देवधर असे दोन्ही ब्राह्मण उमेदवार देणे भाजपला अडचणीत आणणारे ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.
देवधर हे पुण्याचे असले, तरी ते पुण्याच्या सक्रिय राजकारणात यापूर्वी नव्हते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी कार्यक्रमांचा आणि गाठीभेटींचा सपाटा लावला आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारात परिचयाचे असले, तरी सामान्य पुणेकरांना नवखे आहेत. त्यांचा सध्याचा वेळ हा स्वत:ची ओळख करून देण्यात जात आहे. त्यामुळे देवधर यांना उमेदवारी दिल्यास भाजपला पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याबरोबरच बहुजन मतांसाठी जोर लावला लागणार आहे.
हेही वाचा : सोनिया गांधींनी रायबरेली लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडला, काँग्रेस जागा गमावणार का?
मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे पेच?
मोहोळ यांनी महापौरपदाच्या काळात केलेल्या कामांमुळे ते पुणेकरांच्या चांगलेच परिचित आहेत. मात्र, भाजपने ब्राह्मण उमेदवार द्यायाचे ठरविल्यास मोहोळ यांची संधी जाण्याची शक्यता आहे. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर खासदारकीची, ही मोहोळ यांच्यासाठी डोकेदुखी झाली आहे. मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या माजी आमदार असून, मोहोळ यांचे कार्यक्षेत्रही कोथरुड आहे. त्यामुळे दोन्ही खासदार हे कोथरुडचे करण्याचे भाजपने ठरविल्यास अन्य भागातील मतदार हे नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्यातरी मोहोळ यांची उमेदवारी अडचणीत येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मोहोळ हे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विश्वासातील आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, लोकसभेसाठी तिकीट न मिळाल्यास त्यांच्याकडून कोथरुडमधून विधानसभेसाठी दावा केला जाऊ शकतो. अशी वेळ आल्यास चंद्रकांत पाटील यांच्यापुढे प्रश्न निर्माण होऊ शकतो.
जगदीश मुळीक यांना संधी
देवधर आणि मोहोळ या दोघांच्या जमेच्या आणि कवकूवत बाजू असताना माजी आमदार जगदीश मुळीक यांना संधी चालून आल्यासारखी स्थिती आहे. मुळीक यांनी भाजपच्या शहराध्यक्ष पदाच्या काळात पक्षांतर्गत संपर्क वाढवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते सतत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुण्यत चर्चेत आहेत. ब्राह्मणेतर उमेदवार म्हणून मोहोळ यांच्याबरोबरीने मुळीक हे दावेदार मानले जातात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांना खासदारकीसाठी उमेदवारी दिल्यास वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील आगामी निवडणुकीतील उमेदवारीचा प्रश्नही सुटणार आहे. या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील टिंगरे यांनी मुळीक यांचा पराभव केला होता. आता अजित पवार हे भाजपबरोबर आल्यामुळे दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुळीक यांना लोकसभेसाठी तिकीट मिळाल्यास विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसपुढील अडसर दूर होणार आहे. त्यामुळे मुळीक यांना लोकसभेसाठी उमेदवार म्हणून संधी चालून आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : Rajya Sabha Election: राज्यसभेत २८ पैकी २४ नव्या चेहर्यांना संधी; लोकसभेसाठी भाजपाची मोठी रणनीती
काँग्रेसचे आराखडे भाजपच्या उमेदवारावर
भाजपचा उमेदवार कोण, यावर काँग्रेस आराखडे बांधण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक अभय छाजेड हे उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार आहेत. काँग्रेसकडे आतापर्यंत २० जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव असलेले माजी आमदार मोहन जोशी हे एकमेव आहेत. त्यापूर्वी त्यांनी १९९९ मध्ये आणि २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली आहे.
भाजपने ब्राह्मण उमेदवार दिल्यास काँग्रेसकडून ब्राह्मणेतर उमेदवार दिली जाण्याची शक्यता आहे. अशावेळी आमदार धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. त्याद्वारे कसब्याच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. मात्र, भाजपने ब्राह्मणेतर उमेदवार दिला, तर काँग्रेसचा फारसा निभाव लागणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्व गटांना एकत्र घेऊन जाणाऱ्या उमेदवाराची काँग्रसकडे वानवा असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या शिर्डी दौऱ्यात गटबाजीचे दर्शन
पुण्याचे नेतृत्व कोणाकडे?
पुण्याचे खासदार हे आजवर पुणे शहराचे नेतृत्व करत आले आहेत. काकासाहेब गाडगीळ, ना.ग. गोरे, शंकराव मोरे, मोहन धारिया, विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, गिरीश बापट आदींनी पुण्याचे नेतृत्व केले आहे. विठ्ठलराव गाडगीळ हे १९८० ते १९९६ पर्यंत पुणाचे नेतृत्व करत होते. १९९६ ते २००४ पर्यंत सुरेश कलमाडी यांच्याकडे पुण्याची सूत्रे होती. मध्यंतरीच्या काळात पुण्याला नेतृत्वाचा अभाव होता. मात्र, गिरीश बापट हे खासदार झाल्यानंतर त्यांनी समर्थपणे पुण्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्यांच्या निधनामुळे आता आगामी निवडणुकीनंतर नवीन खासदार हे पुण्याचे नवे नेतृत्व असणार आहे.
२०१९ मधील निकाल
गिरीश बापट ६.३२,८३५
मोहन जोशी ३,०८,२०७