जळगाव: विविध कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी, अंतर राखून असलेले मित्रपक्ष, यामुळे संकटात सापडलेल्या लोकसभेच्या रावेर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या मदतीला त्यांचे सासरे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे धावून आल्याने प्रचारात रंगत आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपला हा मतदारसंघ कायम राखण्यात फारसे जड जाईल, असे चित्र दिसत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपचा गड म्हटल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघातून भाजपने खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे, तर विरोधी महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील हा नवीन चेहरा मैदानात उतरविला आहे. लेवा समाजबहुल या मतदारसंघावर २००९ पासून भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे आणि खडसे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. पाटील यांची ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढल्याने प्रचारात त्यांचे योगदान दिसू लागले आहे. एकनाथ खडसे यांच्याविरोधात कायमच भूमिका घेणारे भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठाही या निवडणुकीत पणास लागली आहे. महाविकास आघाडीलाही भुसावळचे संतोष चौधरी यांच्या माघारीमुळे बळ मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने प्रचारात रंग भरला आहे.

हेही वाचा : ५,७०५ कोटींची संपत्ती, ब्रँडेड गाड्या अन् बरंच काही! कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांची स्नुषा रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पण रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली तेव्हाच एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ भाजपमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली. खडसे यांनी दिल्लीत भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. ही घोषणा करून तीन आठवडे उलटले तरी खडसे यांचा भाजपमध्ये अद्यापही अधिकृतपणे प्रवेश झालेला नाही. खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे.

एकाच कुटुंबात दोन पक्ष

राष्ट्रवादीतील फुटीनंतरही एकनाथ खडसे हे शरद पवारांबरोबर राहिले. त्यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे मात्र भाजपबरोबरच राहिल्या. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन सदस्य सत्ताधारी आणि विरोधी पक्षात असल्याचे चित्र तयार झाले. आताही खडसेंनी भाजपप्रवेश जाहीर करताना, त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेत, भावजयी रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आता वडील विरुद्ध कन्या असे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा : यंदा काँग्रेस लढवतेय सर्वात कमी जागा; ‘इतक्या’ जागा दिल्या मित्र पक्षांना

प्रचारातील निर्णायक मुद्दे

केळी हे या भागातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे अल्प दर, केळी पीकविमा आणि प्रक्रिया उद्योगांकडे दुर्लक्ष हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मतदारसंघातील सर्वाधिक मतदार ग्रामीण भागात असल्याने हे विषय रक्षा खडसे यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहेत. शेतकऱ्यांची नाराजी मतांमध्ये रुपांतरीत झाल्यास खडसे यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरु शकेल. लेवा पाटील समाजाची मतेही या मतदारसंघात महत्त्वाची ठरतात. या समाजाने कायमच खडसेंना साथ दिली आहे. सध्या मात्र हा समाज विखुरला असल्याचे सांगितले जात असल्यानेच महाविकास आघाडीने खडसे यांच्याविरोधात श्रीराम पाटील यांच्या रुपात मराठा उमेदवार देण्याची चाल खेळली. पाटील यांना राजकारणात अवघे चार महिने झाले असल्याने त्यांच्यावर टीका करण्यासारखे मुद्दे सत्ताधाऱ्यांकडे नाहीत. त्यामुळे खडसे यांचा प्रचार प्रामुख्याने मोदी गुणगान भोवतीच घुटमळत आहे.

हेही वाचा : बसपा अध्यक्ष मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद नेमका कोण?

रावेर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात रावेर-यावलमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी, मुक्ताईनगर-बोदवडमध्ये शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील व चोपड्यात लता सोनवणे, भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे व जामनेरमध्ये गिरीश महाजन आणि मलकापूर-नांदुरा मतदारसंघात काँग्रेसचे राजेश एकाडे हे आमदार आहेत. मतदारसंघातील चोपडा, जामनेर वगळता जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात लेवा पाटीदार समुदाय निर्णायक अवस्थेत आहे. मराठा समाजदेखील मोठी ताकद आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of raver will bjp raksha khadse and eknath khadse retain seat again print politics news css