सांंगली : सांगली लोकसभा मतदार संघातील यावेळची निवडणुक तिरंगी होत असली तरी खरी चुरस महायुतीतील भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील व अपक्ष विशाल पाटील यांच्यात होत आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कोणाला तारक ठरते आणि कोणाला मारक ठरते यावर निवडणूक निकालाचे भवितव्य ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारीमुळे प्रारंभी झालेला गोंधळ भाजपला प्र्रचाराच्या पातळीवर लाभदायी ठरला असला तरी त्या मिळालेल्या अतिरिक्त वेळेचे मतामध्ये कितपत रूपांतरित होते हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. ही निवडणूक येत्या चार-सहा महिन्यात होणार्या विधानसभेची रंगीत तालीम असल्याने विधानसभा इच्छुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणीसाठी महत्व पूर्ण ठरणार आहे.
सांगली हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असून आतापर्यंत झालेल्या १२ लोकसभा निवडणुकीत या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व स्व. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यानेच केले आहे. १९६२ ते २०१४ या काळात सांगलीतून काँग्रेसचाच खासदार निवडून आला होता. मात्र, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये काँग्रेसचे प्रतिक पाटील या वसंतदादांच्या नातवाचा पराभव करून संजयकाका पाटील यांच्या रूपाने कमळ फुलले. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीने स्वाभिमानीच्या उमेदवारीवर मैदानात उतरलेले विशाल पाटील पराभूत झाले. या सलग दोन पराभवामुळे सांगलीच्या जागेवरील काँग्रेसचा दावा काहींसा दोलायमान झाला. कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना देण्यात आल्याने शिवसेनेने या जागेवर हक्क सांगत मविआच्या जागा वाटपात ही जागा पदरात पाडून घेतली. नव्याने पक्षात आलेल्या पैलवान पाटील यांना उमेदवारी देउन मैदानात उतरविले. या दरम्यान, जिल्ह्यात एकसंघ झालेल्या काँग्रेसने विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी दावा सांगत अगदी दिल्लीपर्यंत धडक दिली. मात्र, अखेर आघाडीत सर्वसहमती झाली असल्याने काँग्रेसला सांगलीवरचा हक्क गमवावा लागला.
हेही वाचा : लिंगायत समाज प्रल्हाद जोशींवर नाराज, धारवाडमध्ये भाजपा अडचणीत?
महाविकास आघाडीतून काँग्रेसला उमेदवारी डावलण्यामागे सूत्रबध्द राजकीय डावपेच असल्याची शंका व्यक्त होत असून यामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची कूटनीती कारणीभूत असल्याचा आरोप होत असून हा दादा घराण्यावर एकप्रकारे अन्याय झाल्याची भावना मतदार संघात जाणीवपूर्वक पेरली गेली. यातूनच सहानभुतीची लाट निर्माण करून या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न सध्या विशाल पाटील करत असून याला बर्यापैकी साथ काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मूळच्या दादा गटातील कार्यकर्त्यांची दिसून येत आहे. दुसर्या बाजूला सलग तिसर्यांदा निवडणुकीला सामोरे जात असलेले खासदार पाटील यांच्याबाबत भाजपअंतर्गत मोठा असंतोष आहे. यातून त्यांच्या उमेदवारीला विरोधही झाला होता. मात्र, पहिल्या टप्प्यातच त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षांतर्गत विरोध जतचा अपवाद वगळता सुप्तावस्थेतच राहिला आहे. हा असंतोष मतदानावेळी कसा व्यक्त होतो हे निकालानंतर कळेलच पण, पक्षांतर्गत डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्नही फारसे ताकदीने झालेले नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे.
हेही वाचा : मोदींच्या मायभूमीत क्षत्रिय समाजाच्या नाराजीमुळे भाजपाचा विजय कठीण?
सध्या वरकरणी सांगलीतील निवडणूक महायुती विरूध्द महाआघाडी अशी दिसत असली तरी खरी लढत अपक्ष विरूध्द भाजप अशीच असल्याचे जाणवत आहे. कारण अपक्ष असले तरी ते काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व असल्याने अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते अपक्षाच्या दिमतीला आहेत. तर आघाडी धर्माचे पालन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट या पक्षाचे नेते महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर दिसतात. शिवसेना ठाकरे गटाची मुळात ताकदच तोळामासा असल्याने त्यांना आघाडीतील मित्र पक्षाची मदत घेतल्याविना मतदान केंद्रावर बूथ लावण्यासाठी कार्यकर्ते शोधावे लागणार आहेत. यामुळे जी काही मते मिळतील ती दोन्ही काँग्रेसचीच प्रामुख्याने असतील.
हेही वाचा : बीजेडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने उचलला ‘ओडिया अस्मिते’चा मुद्दा; निवडणुकीत काय होणार?
मतदार संघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघातील जत, पलूस-कडेगाव हे दोन विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे, तासगाव-कवठेमहांकाळ राष्ट्रवादी शरद पवार गट असे एकूण तीन मतदार संघ आहेत. तर भाजपकडे मिरज, सांगली आणि शिवसेना शिंदे गटाकडील खानापूर-आटपाडी हे तीन मतदार संघ आहेत. कागदावर महायुती आणि महाआघाडीची ताकद समान दिसत असली तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झालेली फूटही बर्याचअंशी मतविभाजनाला कारणीभूत ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीने अपक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या निवडणुकीत या पक्षाचे मतदार तीन लाखावर होते. यावेळी हे मतदान अपक्षाच्या पारड्यातच पडेल असे नसले तर विजयाचा लंबक दोलायमान करू शकते.