राहाता: शिर्डी लोकसभा मतदारसंघात (राखीव) दोनवेळा मोदी लाटेत खासदार होणारे सदाशिव लोखंडे (शिवसेना-शिंदे गट), माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना-ठाकरे गट) व काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उत्कर्षा रूपवते अशी तिरंगी लढत होत आहे. ‘वंचित’च्या व नाराज बौध्द समाजाच्या मतांचा फटका कोणाला, किती बसणार यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव फारसा जाणवत नसल्याचे दिसते. सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब वाकचौरे या दोघांकडे संस्थात्मक ताकद आणि स्वतःची यंत्रणा नाही, त्यामुळे लोखंडे यांना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर तर वाकचौरे यांना काँग्रेसचे माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे मतदारसंघातील लढत थेटपणे विखे विरुद्ध थोरात अशीच रंगली आहे. शिंदे गटाला ही जागा कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत.

हेही वाचा : अखिलेश यादवांच्या मुलीने प्रचारसभांमध्ये वेधले लक्ष; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अदिती?

महायुतीचे लोखंडे यांच्या प्रचारात अजितदादा गटाचे आमदार किरण लहामटे सक्रिय ह़ोताच त्यांचे विरोधक माजीमंत्री मधुकर पिचड व त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड यांनी संयमाची भुमिका घेतल्याचे दिसते. आमदार आशुतोष काळे हे लोखंडेंच्या प्रचारात सुरुवातीपासून आहेत. मात्र काळे विरोधक भाजपच्या नाराज माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा करुनही त्या सक्रिय झालेल्या नाहीत. माजी आमदार नरेंद्र घुले यांचा नेवाशातील गट अद्याप लोखंडेंच्या प्रचारात सक्रिय नाही. तेथे आमदार शंकरराव गडाख यांचा भक्कम पाठिबा भाऊसाहेब वाकचौरे यांना आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा दिला आहे.

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते आमदार थोरात यांनी प्रचार यंत्रणा कामाला लावली असली तर त्यांची निम्मी यंत्रणा नगर मतदारसंघात सुजय विखे यांच्या पराभवासाठी पाठवल्याची चर्चा आहे. ‘वंचित’च्या उमेदवार उत्कर्षा रुपवते मूळ थोरात गटाच्या. आमदार सत्यजित तांबे व रुपवते यांनी युवक काँग्रेसमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे थोरात गटाच्या सहानुभूतीचा त्या किती लाभ उचलतात, हे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा : जातीय हिंसाचारामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला; कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत?

महायुतीकडून खासदार लोखंडे हे तिसऱ्यांदा तर वाकचौरे हे १० वर्षाच्या खंडानंतर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खा. लोखंडे यांच्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आ. आशुतोष काळे, माजी आमदार वैभव पिचड आमदार किरण लहामटे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व आदिक गट हे प्रचारात सक्रिय आहेत तर ‘मविआ’चे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे हे प्रचारात सक्रिय आहेत. उत्कर्षा रुपवते शिर्डीतील पहिल्या महिला उमेदवार आहेत. नाराज मते खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

वाकचौरे व लोखंडे यांचा प्रचार वैयक्तिक आरोप- प्रत्यारोपावर रंगला आहे. लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा शिर्डी संस्थानमधील तुप घोटाळा बाहेर काढला तर वाकचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांच्या सॅनिटरी नॅपकिन घोटाळा बाहेर काढला. दोघेही विकास कामावर चर्चा करत नाहीत. शिर्डी मतदारसंघात शेती पाणी प्रश्न गंभीर आहे. निळवंड्याच्या पाण्याची संगमनेर, कोपरगाव व राहाता भागातील शेतकऱ्यांना अद्यापि प्रतिक्षा असल्याने जिरायती टापूत नाराजी आहे.

हेही वाचा : “आम्हाला संपवण्यासाठी RSS ने तृणमूल काँग्रेसची निर्मिती केली”; डाव्यांचा आरोप

सिंचनाचा प्रश्न गंभीर

गोदावरी खोऱ्यातील पाण्यावर सिंचनापेक्षा औद्योगिक वापराचे अधिक आरक्षण झाल्याने कोपरगाव, राहात्यातील शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सह्याद्रीच्या पश्चिमवाहिन्यांचे पाणी पर्वेकडे वळवण्याची सर्वचजण घोषणा करतात, परंतु प्रत्यक्षात कुठलीच हालचाल दिसत नाही. या प्रश्नावर अनेक पंचवार्षिक निवडणुका लढल्या गेल्या. संगमनेर, श्रीरामपूर व नेवाशाला मिळणारे भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी भविष्यात कमी होण्याची शक्यता आहे. या प्रश्नावर कोणीही बोलत नाही.

रस्त्याचा प्रलंबित प्रश्न

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक तीर्थक्षेत्र. या भागातून जाणारा नगर-मनमाड महामार्गाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न कसा सोडणार याबद्दलही आजी-माजी लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. यापूर्वीच्या निवडणुकीतही या रस्त्याच्या प्रश्नावर आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of shirdi challenge for eknath shinde to retain shirdi lok sabha print politics news css