पिंपरी : भाजप प्रवेशाची आणि प्रारंभी निवडणूक लढविण्यास नकाराची चर्चा झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले विद्यमान खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि उमेदवारीसाठी अजित पवारांशी जुळवून घेत राष्ट्रवादीत प्रवेश केलेले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. ग्रामीण भागातील शरद पवारांबाबत सहानुभूती आणि महायुतीसोबत आमदारांची असलेली शक्ती, कोल्हेंना पाडणारच हा शब्द खरा करण्यासाठी अजित पवारांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. पक्षात फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांपैकी खासदार कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले, तर आमदारांपैकी शिरूरचे अशोक पवार वगळता इतर आमदारांनी अजित पवारांची साथ देणे पसंत केले. असे असतानाही अजित पवार यांनी स्वपक्षातील शिलेदारांऐवजी शिवसेनेच्या आढळराव यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. दांडगा जनसंपर्क, अनुभवी असलेल्या आढळराव यांनी डॉ. कोल्हे यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात आणला. पाच वर्षांत कोल्हे मतदारसंघात फिरले नसल्याचे ठासून सांगितले. तर संसदेतील शेतकऱ्यांसाठी, बैलगाडा शर्यतीसाठी भाषणे आणि कामगिरी याचा दाखला देत कोल्हे यांच्या बाजूने समाजमाध्यमांवरून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
हेही वाचा : “तुम्हाला जामीन मिळाला तर तुम्ही फाइल्सवर सही…”; केजरीवालांच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
या मतदारसंघातील ग्रामीणमधील खेड-आळंदी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर-हवेलीत शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीचे वातावरण आहे. शेतकरी नाराज असून, त्याचा फायदा कोल्हे यांना होईल, असा अंदाज आहे. मात्र, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची साथ आढळराव यांना मिळेल. त्यामुळे तिन्ही मतदारसंघांतून दोघांनाही साथ मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परिणामी, शहरी मतदार आणि मागील वेळी आढळरावांना मताधिक्य दिलेले भोसरी, हडपसर विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिकेत असणार आहेत.
भोसरी, हडपसरवर लक्ष!
शिरूरमध्ये भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ निर्णायक आहेत. मागील वेळी आढळरावांना केवळ भोसरीतून ३७ हजार आणि हडपसरमधून साडेपाच हजार मतांची आघाडी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही डॉ. कोल्हे यांना भोसरी, हडपसरमधून मताधिक्य मिळू शकले नव्हते. आता भोसरी, हडपसरचे आजी-माजी आमदार महायुतीसोबत आहेत. भोसरीतून एक लाखाचे मताधिक्य देण्याचा भाजपने दावा केला आहे. त्यामुळे भोसरी, हडपसरमधील मतदार कोणाच्या बाजूने झुकणार, यावर शिरूरचा निकाल अवलंबून असणार आहे.
हेही वाचा : भाजपाला गुजरातमधली लढाई का झाली अवघड?
कोल्हेंना सहानुभूतीचा आधार
मतदारसंघात पाच वर्षे जनसंपर्क न ठेवल्याने आणि सहज उपलब्ध होत नसल्याने कोल्हे यांच्याबाबत ग्रामीण भागात नाराजी आहे. मात्र, शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती आहे. पवार यांच्यामुळे त्यांना ग्रामीण भागातून मतदान होईल, अशी शक्यता वर्तविली जाते. महायुतीतील अनेक दिग्गजांच्या विरोधात डॉ. कोल्हे यांच्यासाठी पवारांबाबतची सहानुभूती आणि निष्ठेचा आधार दिसत आहे. राष्ट्रवादीचे जास्त आमदार असतानाही लोकसभेला शिरूरमधून उमेदवार निवडून येत नसल्याचे मागील निवडणुकीपर्यंत दिसून आले होते. त्यामुळे आमदारांच्या भूमिकेविषयीही शंका घेतली जात होती. आता एके काळी विरोध आणि तीव्र संघर्ष केलेल्या आढळराव यांना निवडून आणण्यासाठी मंत्री वळसे-पाटील, आमदार मोहिते, बेनके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
या मतदारसंघात जातीय समीकरणांचे गणित प्रभावी ठरल्याचे गेल्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. मराठा आरक्षणामुळे काही प्रमाणात जागी झालेली या समाजाची अस्मिता आढळरावांच्या पथ्यावर पडेल असे वाटत असले, तरी मराठेतर ओबीसींसह इतर समाजघटक गळण्याची धास्तीही महायुतीला आहे. माळी समाजाचे दोन लाखांहून अधिक मतदार आहेत. जुन्नर भागात आदिवासींची मतेही मोठ्या प्रमाणात असून, ती कोल्हे यांच्या पारड्यात जाऊ शकतील, असा महाविकास आघाडीचा अंदाज आहे.
हेही वाचा : मुंबईची धुरा अमराठी नेत्यांच्या हाती; पहिल्या निवडणुकीपासूनचे निकाल काय सांगतात?
अजित पवारांसमोर शब्द खरा ठरविण्याचे आव्हान?
मागील वेळी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अजित पवार यांनी निवडणुका आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच कोल्हे यांना या वेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असे म्हणत थेट आव्हान दिले. मी एखाद्याला पाडणार म्हटले की पाडतोच, असेही ते छातीठोकपणे म्हणाले आहेत. त्यामुळे पुरंदरप्रमाणे शिरूरमध्ये शब्द खरा करून दाखविण्याचे आव्हान पवार यांच्यासमोर असणार आहे.