छत्रपती संभाजीनगर : उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतील प्रचार आता ‘राष्ट्रीय मुद्दे’ विरुद्ध ‘स्थानिक संपर्क’ या पातळीवर पोहोचला आहे. उमेदवार निवडीची मोठी कसरत पूर्ण झाल्यानंतर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या अर्चना पाटील यांच्या पाठीशी त्यांचे पती भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील उभे आहेत. त्यांच्या बाजूने महायुतीची मोठी यंत्रणा उभी आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मंत्री तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, नव्याने भाजपामध्ये आलेले बसवराज पाटील, भाजपचे कार्यकर्ते, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाशी ओम राजेनिंबाळकर यांचा असणारा संपर्क आणि शिवसेना फुटीनंतर निर्माण झालेली सहानुभूती अटीतटीच्या वळणावर येऊन थांबली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना फुटीनंतर खासदार ओम राजेनिंबाळकर आणि कैलास पाटील हे धाराशिवचे आमदार आणि खासदार दोघेही जण उद्धव ठाकरे यांना साथ दिली. त्यामुळे त्यांचे मतदारसंघात ‘निष्ठावान’ म्हणून कौतुक सुरू होतेच. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून अन्य कोणाची दावेदारी नव्हती. त्यामुळे ओम राजे यांनी लोकसभा मतदारसंघातील संपर्क पूर्वीपासून वाढवायला सुरुवात केली होती. ते जाहीर सभेत सांगतात, ‘जेवढ्या व्यक्तींबराेबर ‘सेल्फी’ घेतली आहे, तेवढ्यांनी मतदान केले तरी मी निवडून येईन. एस.टी. बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही तर लोक खासदारांना फोन करतात आणि त्यांची अडचण सोडवणुकीसाठी आपण शब्द टाकतो.’ त्यांच्या या संपर्काच्या जोरावर आणि उद्धव ठाकरे यांच्या विषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे मशाल चिन्हाचा प्रचार करणाऱ्यांची संख्या जास्त दिसून येते.

हेही वाचा : १९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास

अजित पवार यांनी उस्मानाबादची जागा प्रतिष्ठेची केल्याने अर्चना पाटील यांना ‘राष्ट्रवादी’त प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली. ही उमेदवारी देताना उस्मानाबाद मतदारसंघात असणाऱ्या औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेतला होता. अर्चना पाटील यांच्या काही वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. राष्ट्रवादीच्या वतीने लढत असल्या तरी पक्षाच्या वाढीसाठी का प्रयत्न करू, या त्यांच्या विधानाची चांगलीच खिल्ली उडविली गेली. ‘मोदींनी ३९९ जागांचा जुगाड लावला आहे. ४०० वी जागा माझी आहे’ हे विधान ऐकून शेजारी उभे असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काय बोलावे हेच सुचेनासे झाले.

महायुतीमध्ये नेत्यांची फौज आहे तर ओम राजेनिंबाळकर यांचा सर्वसामांन्याशी संपर्क आहे. असेच विरोधाभासी चित्र प्रचाराच्या मुद्द्यातही दिसून येते. ‘टेक्सटाईल पार्क’, ‘कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पा’साठी लागणारी तरतूद, सोलापूर- तुळजापूर- धाराशिव असा रेल्वेमार्ग असे विकास मुद्दे राणाजगजीतसिंह पाटील मांडत आहेत. अर्चना पाटील यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत असाही प्रचार सुरू आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उस्मानाबादला सभा घेतली. पण विरोधक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असताना टीकेच्या केंद्रस्थानी मा़त्र काँग्रेस होती. राममंदिर, ३७० कलम या राष्ट्रीय मुद्द्यावर महायुतीची भिस्त आहे. त्याला स्थानिक मुद्यांनी उत्तर दिले जात आहे. ओम राजेनिंबाळकर हे आक्रमक नेते मानले जातात. वडील पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येनंतर डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीतसिंह पाटील यांच्या विरोधातील राजकारण करणाऱ्या ओम राजेनिंबाळकर हे शरद पवार यांच्या गाडीत आता बसू शकतात, हे दृश्यही लोकांनी पाहिलेले आहे. पण तेरणा कारखाना ताब्यात दिल्यानंतरही तो ओम राजेनिंबाळकरांना नीट चालवता आला नाही. त्याचे अगदी भंगारही विकल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांकडून केला जातो. यात आता तानाजी सावंत यांनीही आघाडी घेतली आहे. त्यामुळे एका शक्तिशाली यंत्रणेपुढे ओम राजेनिंबाळकर यांचे उभे ठाकणे आव्हानात्मक आहे. लढा अटीतटीचा आहे, हे महायुतीच्या नेत्यांनाही मान्य असल्याने नव्या घड्याळाचे काटे वेळ पाळतील का, याची उत्सुकता सर्वत्र आहे.

हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील भावनिक मुद्दे या दोन मतदारसंघात फारसे प्रभावी ठरत नाहीत. या दोन मतदारसंघातून मिळणारा मतदारांचा कौल उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदार ठरविण्यात अधिक महत्त्वपूर्ण राहील, असे सांगण्यात येते. बार्शी व औसा या दोन्ही मतदारसंघात लिंगायत आणि मराठा मतदारांची संख्या अधिक आहे. तसेच उमरगा मतदारसंघातही लिंगायत मतांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे या समाजाचे नेतृत्व करणारे बसवराज पाटील यांना नुकतेच भाजपने प्रवेश दिला होता. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल असे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of usmanabad omprakash raje nimbalkar vs archana patil print politics news css