अलिबाग : गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना पराभूत करीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून आले. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्याचे परिणाम रायगड जिल्ह्यात चांगलेच जाणवले आहेत. सुनील तटकरे विद्यमान खासदार असले तरी त्यांना पुन्हा उमेदवारी नकोच, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. शिंदे गटाची पडद्यामागून हीच भूमिका आहे. परिणामी महायुतीतच तिढा सुटलेला नाही. तर गेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ठाकरे गटाचे अनंत गीते यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदारसंघातील अकार्यक्षमता आणि पक्षाअंतर्गत नाराजी यामुळे गेल्या निवडणुकीत अनंत गीते यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. दुसऱ्या बाजूला महायुतीचा उमेदवार कोण असावा यावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खल सुरू आहे. सुनील तटकरे यांना उमेदवारी नकोच असा सूर भाजपने लावला असला तरी, भाजपचे धैर्यशील पाटील हे तटकरेंना पर्यायी उमेदवार ठरू शकतील का, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

हेही वाचा – काँग्रेसचे असे आमदार ज्यांनी रामलल्लाच्या मूर्तीसाठी नेहरूंना केला होता विरोध, राघव दास कोण होते?

कुठल्याच लाटेचा परिमाम होत नाही असा रायगड लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभर पसरलेल्या सहानुभीतीच्या लाटेत काँग्रेसने देशभर घवघवीत यश मिळविले होते. पण रायगडमध्ये शेकापचे दि. बा. पाटील यांनी काँग्रेसचा पराभव केला होता. २०१४ ची निवडणूक असो अथवा २०१९ ची निवडणूक असो, पुन्हा याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यात आला. २०१४ च्या मोदी लाटेतही अनंत गीते यांना सुनील तटकरे यांनी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत झुंज दिली होती. तटकरे नामसाध्यर्मामुळे सुनील तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. अटीतटीच्या लढतीत अनंत गीते अवघ्या दोन हजार मतांनी निवडून आले होते. २०१९ जेव्हा देशभरात पुन्हा एकदा भाजप आणि मोदींचा करिष्मा दिसून आला होता. पण त्याही वेळी शिवसेनेच्या अनंत गीते यांचा पराभव करून सुनील तटकरे विजयी झाले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगडचा कल कोणाच्या बाजूने जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रायगड जिल्ह्यातील चार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघानी मिळून रायगड लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. यात रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड या चार, तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. २००८ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत निर्माण झालेल्या या मतदारसंघातून आत्तापर्यंत दोन वेळा शिवसेनेचे अनंत गीते तर एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत.

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. महाविकास आघाडीची स्थापना त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर अस्तित्वात आलेली महायुती यामुळे जिल्ह्याचे राजकारण वरपासून खालपर्यंत ढवळून निघाले आहे. युत्या आघाड्यांची नवी समीकरणे जुळली आहेत. जुनी लोप पावली आहेत. त्यामुळे कार्यकर्तेही गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांनी जुळवून घ्यायचे कसे, हा प्रश्न सर्वपक्षीयांना पडला आहे.

हेही वाचा – नेहरूंचा आदेश झुगारून रामलल्लाची मूर्ती हटविण्यास विरोध; निलंबनाविरोधात कायदेशीर लढा देणारे ‘नायर साहेब’ कोण होते?

इंडिया आघाडीच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गीते यांनी आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. श्रीवर्धन येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत शेकापनेही त्यांना पाठींबा जाहीर करून टाकला आहे. त्यामुळे गीते यांनी तालुका निहाय कार्यकर्ता मेळावे घेण्याचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे महायुतीत मात्र उमेदवारीवरून बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना उमेदवारी नकोच असा सूर भाजपने लावला आहे. भाजपच्या धैर्यशील पाटील यांनाच उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे. तर अजित पवार यांनी रायगड लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे की भाजपचे धैर्यशील पाटील मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत संभ्रम कायम आहे. मतदारसंघ वाट्याला आला तरी सुनील तटकरे पुन्हा लोकसभा लढणार का, अशीही चर्चा आहे. तटकरे यांचा विधानसभा लढण्याकडे कल असल्याचे समजते. मग उमेदवार कोण, अशीही चर्चा सुरू झाली होती.

असे असले तरी, येत्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध इंडीया आघाडी अशी थेट लढत पहायला मिळेल हे निश्चित आहे. वरवर पाहता महायुतीचे पारडे जड वाटत असले तरी, घटक पक्षात आंतर्गत बेबनाव आणि कुरघोड्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी घटक पक्षातील हे बनाव दूर होणार की आंतर्गत कुरघोड्या सुरूच राहणार यावर महायुतीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

२०१९ मधील उमेदवारांना मिळालेली मते :

सुनील तटकरे (राष्ट्रवादी) : ४,८६,९६८

अनंत गीते (शिवसेना) : ४,५५,५३०

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review raigad anant geete or sunil tatkare which party will be successful in raigad lok sabha elections print politics news ssb