नागपूर : अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे श्रेय घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील श्रीरामाच्या रामटेकवरही दावा करणे सुरू केले आहे. शिंदे गटाचे खासदार असतानाही भाजपने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा शिंदे गट लढवणार की भाजपसाठी सोडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रामटेक हे विदर्भातील पौराणिक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला आध्यात्मिक महत्त्वही आहे. वनवासाच्या काळात श्रीरामाचे येथे वास्तव्य असल्याने या शहराला रामटेक असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. रामटेक हा नागपूर ग्रामीणमधील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला लोकसभा मतदारसंघ आहे. तो पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.
माजी पंतप्रधान नरसिंहराव येथून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले. मात्र नंतरच्या काळात शिवसेनेने या मतदारसंघावर जम बसवला. १९९९ पासून या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. त्याला अपवाद फक्त २००९चा होता. यावेळी येथून काँग्रेसचे मुकुल वासिनक विजयी झाले होते. २०१४ मध्ये सेनेचे कृपाल तुमाने यांनी ही जागा परत काँग्रेसकडून हिसकावून घेतली. २०१९ मध्ये तुमाने दुसऱ्यांदा येथून विजयी झाले. शिवसेनेत फूट पडल्यावर त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता २०२४ च्या निवडणुकीची त्यांनी तयारी सुरू केली असली तरी सेनेतील फूट भाजपच्या पत्थ्यावर पडणारी ठरली आहे. आतापर्यत भाजपच्या मदतीने सेनेने येथे विजय मिळवला. आता चित्र वेगळे आहे. सहापैकी फक्त एका विधानसभा मतदारसंघात (रामटेक) शिंदे गटाचा आमदार (आशीष जयस्वाल ) आहे. दोन मतदारसंघात भाजपचे (हिंगणा आणि कामठी) व दोन मतदारसंघात काँग्रेस (सावनेर आणि उमरेड)चे आमदार आहेत. एक विधानसभा मतदारसंघ (काटोल) राष्ट्रवादीकडे आहे. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व आहे. भाजप-शिवसेना युती असल्यानेच तुमाने यांचा दोन वेळा येथून विजय सुकर झाला. भाजपशिवाय जिंकून येणे अवघड असल्याची जाणीव झाल्यावरच तुमाने यांनी शेवटच्या टप्प्यात ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या गटात जाणे पसंत केले.
शिंदे सेनेचे जिल्ह्यात फारसे वर्चस्व नसल्यानेच भाजप सक्रिय झाली आहे. भाजपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. रामटेकची जागा त्यांच्या अजेंड्यावर आहे. तुमाने विजयी होणार असतील तरच त्यांना उमेदवारी द्या, अन्यथा आमच्यासाठी सोडा, अशी मागणी भाजपने केली आहे. मात्र शिंदे सेना सहजासहजी आपली लोकसभेची जागा सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नेते नसले तरी कट्टर शिवसैनिक अजूनही किल्ला लढवत आहे. महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या मदतीने ठाकरे गट येथे पुन्हा चमत्कार घडवू शकतो. पण त्यांच्याकडे उमेदवाराचा वाणवा आहे. माजी खासदार प्रकाश जाधव यांचे नाव सोडले तर अद्याप नवा चेहरा पुढे आला नाही. दुसरीकडे सेनेतील फुटीचे कारण देऊन काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. कारण येथे सेना विरुद्ध काँग्रेस अशीच पारंपरिक लढत होत आली आहे यंदा युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी तसा अर्जही पक्षाकडे केला आहे. कुणाल यांचे वडील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत हे मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत राऊत यांचे संबंध लक्षात घेतले तर कुणाल राऊत यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होऊ शकतात. मात्र काँग्रेसचे दुसरे वरिष्ठ नेते व रामटेकचे माजी खासदार मुकुल वासनिक यांची भूमिका याबाबत निर्णायक ठरू शकते. कुणाल यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या एका गटाचा विरोध आहे. काँग्रेसला ही जागा सुटल्यास उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांचेही नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते. बहुजन समाज पक्षाची ताकद या मतदारसंघात होती. आता तसे चित्र नाही.
हेही वाचा : भंडाऱ्यातून परिणय फुकेंना लोकसभा उमेदवारीचे डोहाळे! ‘ट्विट’मुळे चर्चा
सुरूवातीपासूनच भाजपचा रामटेकवर डोळा आहे. पण सेनेशी युती असल्याने त्यांची डाळ शिजली नाही. पण आता पक्षाने ही जागा सुटावी म्हणून पूर्ण तागद पणाला लावली आहे. आतापर्यंत शिवसेनेला भाजपची मदत होत आली आता सेनेने मदत करावी, असा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे शिंदे गट ही जागा लढवणार की भाजपसाठी सोडून विदर्भाबाहेरील जागेसाठी तडजोड करणार हे पाहावे लागणार आहे. चौकट शिवसंकल्पमधून रामटेक वगळल्याने चर्चेला ऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानातून रामटेक वगळण्यात आल्याने शिवसैनिक अस्वस्थ झाले. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पहिल्या यादीत रामटेकचे नाव होते. ही जागा भाजपला सोडण्यात येत तर नाही ना, या शंकेने शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. खासदार तुमाने यांनी मात्र रामटेकचा समावेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.