यवतमाळ : राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील येत्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे चित्र धुसर झाले आहे. या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट), भाजप, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस या सर्व पक्षांचे इच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे महायुतीतील भाजप व शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) या चारही मुख्य पक्षांपुढे उमेदवारी कोणाला द्यायची हाच पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ जिल्हा विकासात मागे असला तरी राज्य आणि केंद्रातील राजकीय वर्तुळात या जिल्ह्याचा कायम दबदबा राहिला आहे. कधी काळी यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व होते. लोकसभा आणि सर्व विधानसभा मतदारसंघ काँग्रेसमय होते. काँग्रेसचे निष्ठावंत उत्तमराव पाटील हे या मतदारसंघातून लोकसभेवर सातत्याने निवडून आले. मात्र २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत यवतमाळ जिल्ह्याचे राजकीयदृष्ट्या त्रिभाजन झाले. एक जिल्हा, १६ तालुके आणि तीन खासदार अशी राजकीय विभागणी झाली. जिल्ह्यात यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर-आर्णी व हिंगोली-उमरखेड हे तीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, राळेगाव, यवतमाळ हे चार, तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि वाशीम हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट झाले. उमरखेड मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात आणि वणी व केळापूर विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाला. या विभाजनामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना तीन खासदार लाभले. मात्र तिन्हींपैकी एकही खासदार मूळचा यवतमाळला राहत नसल्याने जिल्ह्याच्या वाट्याला विकासाच्या बाबतीत उपेक्षाच आली.

हेही वाचा – व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचा २० वर्षांचा प्रवास, मोदींनी आतापर्यंत काय मिळवले?

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात कुणबी, बंजारा, आदिवासी समाजाच्या मतांचे प्राबल्य आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे या मतदारसंघात पारंपरिक विरोधक राहिले आहेत. २००९ पासून या मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी निवडून येत आहेत. राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव गवळी यांनी केला आहे. २००९ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले हरिभाऊ राठोड यांचा ५६ हजार ९५१ मतांनी, २०१४ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचा ९३ हजार ८१६ मतांनी आणि २०१९ मध्ये काँग्रेसेच माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा एक लाख १७ हजार ९३९ इतक्या प्रचंड मतांनी गवळी यांनी पराभव केला. भावना गवळी यांचा मताधिक्याचा आलेख वाढता राहिला तरी या तिन्ही विजयानंतर गवळी मतदारांना गृहीत धरत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली. खासदार गवळी या एकदा निवडून आल्यानंतर मतदारांना सहज भेटत नसल्याची तक्रार आहे. जिल्ह्यात त्यांच्या कार्यकाळात विकासाची कोणतीही उपलब्धी नसल्याने आता नागरिकही नाराजी व्यक्त करत आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भावना गवळी यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यानंतर राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर भावना गवळी या शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्या आणि त्यांच्या ईडी चौकशीची फाईल बंद झाली. मात्र गेल्या आठवड्यात भावना गवळी यांना अनपेक्षितपणे त्यांच्या एका प्रतिष्ठानच्या संदर्भाने आयकर विभागाने नोटीस पाठवली. त्यानंतर या मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘शिवसंकल्प’ अभियान रद्द झाल्याने भावना गवळी यांना यावेळी उमेदवारी मिळेलच याबाबत आता शंका व्यक्त होत आहे. भाजपने केलेल्या विविध सर्वेक्षणातून भावना गवळी यांची निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे समोर आल्याने या जागेसाठी जोर लावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढेही पेच निर्माण झाला आहे. ही जागा शिंदे गटाच्या ताब्यात असल्याने आणि ती भाजपला द्यायची नाही, असे ठरले तर मतदारसंघातील बंजारा समाजाचे प्राबल्य बघता शिंदे गट विद्यमान मंत्री संजय राठोड यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – शरद मोहोळ यांच्या कुटुंबियांना राजकीय आश्रय?

दुसरीकडे काँग्रेसमधून या मतदारसंघात अद्यापही उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे या मतदारसंघातून पराभूत झाले असल्याने यावेळी त्यांच्याशिवाय अन्य नवा चेहरा देण्याची पक्षाची योजना आहे. मात्र असा तयार असलेला कोणीही उमेदवार सध्यातरी पक्षाकडे नसल्याचे सांगितले जाते. कुणबी, बंजारा आणि आदिवासी समाजातील उमेदवार देण्यावरच सर्व पक्षांचा जोर आहे. काँग्रेसकडून ऐनवेळी पुन्हा माणिकराव ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (ठाकरे गट) यांनीही या मतदारसंघात दावा सांगितला आहे. पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज आणि कॅप्टन प्रशांत सुर्वे हे शिवसेना (ठाकरे गट) कडून इच्छुक आहेत. याशिवाय या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी हा तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा पक्ष आहे. मात्र हा पक्ष ऐनवेळी उमेदवार देतो. वंचितमुळे या मतदारसंघात काँग्रेसला कायम पराभवाला सामोरे जावे लागल्याची चर्चा असते.

२०१९ मधील लोकसभा निवडणूक निकाल

१. भावना गवळी (शिवसेना) ५ लाख ४२ हजार ९८ मते

२. माणिकराव ठाकरे (काँग्रेस) चार लाख २४ हजार १५९ मते

३. प्रवीण पवार (वंचित बहुजन आघाडी) ९४ हजार २२८ मते

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review yavatmal washim dilemma arisen between the mahayuti and india alliance over selection of candidate for yavatmal washim lok sabha constituency print politics news ssb
Show comments