Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाची कामगिरी ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत घसरल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी २०२४ मध्ये भाजपाने ५ जागांवर ५० टक्क्यांपेक्षा अधिकच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने या फरकाने तीन जागा जिंकल्या होत्या. निवडणुक आयोगाने गुरुवारी यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये इतर कोणत्याही पक्षाने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी एकही जागा जिंकलेली नाही.
पाच जागा कोणत्या आहेत?
ज्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील अर्ध्यापेक्षा जास्त मते मिळवली त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर) आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील (नवसारी) या गुजरातमधील दोन जागा; माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (विदिशा) आणि शंकर लालवाणी (इंदौर) या मध्य प्रदेश; माजी मुख्यमंत्री बिप्लव देव (त्रिपुरा पश्चिम) या जागांचा समावेश आहे. या पाचपैकी त्रिपुरा पश्चिम सोडून इतर चार जागा या भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जातात.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळवत विजयी झालेले उमेदवार हे भाजपाच्या इंदौरचे खासदार लालवानी हे ठरले आहेत. त्यांना एकूण झालेल्या मतदानापैकी ९१.३२ टक्के मते मिळाली आहेत आणि त्यांनी त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला ७५ टक्के मतांनी पराभूत केले . मध्य प्रदेशमधील या जागेसाठीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, कारण येथे काँग्रेस उमेदवाराने मतदानाच्या काही दिवस आधी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. इतकेच नाही तर त्या उमेदवाराने भाजपामध्ये प्रवेश केला होता. मुख्य विरोधक बाजूला झाल्याने लालवानी यांच्यासमोर इतर उर्वरित उमेदवाराचे आव्हान होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा समावेश होता.
इतर चार भाजपा उमेदवारांनी ५० टक्के ते ६० टक्के यांच्यामध्ये मते घेत विजय मिळवला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकींमध्ये फक्त १९८ जागांवर विजयी मतांचा फरक ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता. १९८९ मध्ये जम्मू काश्मीरच्या अनंतनाग मतदारसंघातून दिवंगत स्वतंत्र सेनानी प्यारेलाल हंडू यांनी सर्वाधिक ९७.१९ टक्के इतकं विक्रमी मताधिक्य मिळवलं होतं.
स्वातंत्र्यानंतर ९० टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्य फक्त दोन जागांवर मिळाले आहे. ८० ते ९० टक्के मताधिक्य असलेल्या ६ जागा आहेत. तर ७० ते ८० टक्के मताधिक्य मिळालेल्या जागा या ४५ आहेत. ६० ते ७० टक्के मताधिक्य मिळालेल्या जागा ४५ आणि ५० ते ६० टक्के मताधिक्य मिळालेल्या जागा या १२९ आहेत.
आणीबाणीच्या काळानंतर झालेल्या १०७१ आणि १९७७ च्या निवडणुकींमध्ये प्रत्येकी ५४ पेक्षा जास्त जागा ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी जिंकल्या गेल्या. या दोन वर्षांचा अपवाद वगळता, ५० टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्य असलेल्या जागांची संख्या १३ पेक्षा जास्त नाही. १९९६ आणि १९९९ मध्ये सर्वात कमी म्हणजेच फक्त एक-एक जागा ५० टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकली गेली.
सर्वाधिक उमेदवार कोणत्या राज्यात?
राज्यानुसार ही आकडेवारी पाहीली तर उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक जागांवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने ४३ जागा जिंकल्या गेल्या आहेत. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर महाराष्ट्र असून येथे ३१ जागा अशा पद्धतीने जिंकल्या आहेत. महाराष्ट्र राज्य जेव्हा बॉम्बे म्हणून ओळखले जात होते तेव्हा येथे सहा जागा ५० टक्क्यांपेक्षा अधिकच्या मताधिक्याने जिंकल्या गेल्या होत्या. महाराष्ट्राखालोखाल बिहारचा क्रमांक लागतो येथे अशा २७ जागा इतक्या मताधिक्याने जिंकल्या गेल्या आहेत.
काँग्रेसने सर्वाधिक ५० टक्क्यापेक्षा अधिक मतांच्या फरकाने ११२ जागा जिंकल्या आहेत. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात उभ्या राहिलेल्या जनता पक्षाने (जेपी) काँग्रेस पाठोपाठ ४९ अशा फरकाने जिंकल्या आहेत. या यादीत भाजपा हा ११ जागांवर मिळालेल्या विजयासह तिसर्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा>> प्राजक्ता माळीबाबत प्रश्न विचारताच सुरेश धस म्हणाले, “जे काही…”…
निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?
फक्त काही मोजक्याच नेत्यांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत एकापेक्षा जास्त वेळा निवडणुकीत विजय मिळवला आहे. अशा १२ नेत्यांमध्ये मेघालयचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष पीए संगमा हे पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांनी चार वेळा तुरा (Tura ) मतदारसंघातील निवडणूक ५० टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकली आहे, जो एक विक्रम आहे. किमान दोनदा ५० टक्क्यांपेक्षा अधिकच्या फरकाने किमान दोनदा जागा जिंकलेल्या नेत्यांमध्ये अमेठीतून जिंकलेले माजी पंतप्रधान राजीव गांधी, साताऱ्यातून माजी उपपंतप्रधान वायबी चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हाजीपूरमधून , हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह महासू आणि मंडी येथून यासह ग्वाल्हेर राजघराण्यातील राजमाता विजयाराजे शिंदे गुना आणि ग्वाल्हेर येथून आणि रेवाचे शेवटचे महाराज मार्तंड सिंह याचा समावेश आहे.