नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघात काँग्रेसची कोंडी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रथम त्या पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राची तक्रार केली. त्यात यश आल्यावर आता या पक्षाचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या समर्थकांवर दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामटेक लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाकडे आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस ही जागा लढवत आहे. खरे तर भाजपने ही जागा त्यांना मिळावी म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले. काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना पक्षात घेऊन त्यांना रामटेकची उमेदवारी देण्याचा बेत भाजपचा होता. पण पूर्व विदर्भातील ऐकमेव जागा लढवत असल्याने ती देण्यास शिंदे गटाने विरोध केला. त्यामुळे ही जागा शिंदे गटच लढवत आहे. असे असले तरी येथील उमेदवार ठरवण्यापासून तर प्रचाराची आखणी करण्यापर्यंत सर्व सुत्रे भाजपकडे आहे. ऐनवेळी राजू पारवे यांनी भाजपऐवजी शिंदेगटात प्रवेश केला व त्यांना विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना डावलून उमेदवारी देण्यात आली.

हेही वाचा >>> पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…

दुसरीकडे काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांनी जि.प.च्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे नाव एक वर्षापासून संभाव्य उमेदवार म्हणून निश्चित केले व तयारी सुरू केली. बर्वे यांच्या उमेदवारीमुळे लढत चुरशीची ठरेल याचा अंदाज आल्यावर महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रथम बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात आला. ऐनवेळी ही खेळी लक्षात आल्यावर काँग्रेसने बर्वे यांच्या अर्जासोबत जोडलेल्या बी फॉर्मवर त्यांच्या पतीचे श्यामकुमार बर्वे यांचे नाव टाकल्याने व त्यांचा अर्जही भरल्याने बर्वे यांचा अर्ज रद्द ठरल्यावर श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरले, अन्यथा या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच रिंगणात नसता. या मतदारसंघात काँग्रेस नेते सुनील केदार यांचा प्रभाव आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांचे समर्थक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. बर्वे या उमेदवारी अर्ज भरत असतानाच दुसरीकडे केदार यांचे कट्टर समर्थक व जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचा भाजप प्रवेश करण्यात आला. जि.प.वर केदार गटाची सत्ता आहे. तेथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे. एक तर पक्षात प्रवेश करा किंवा निवडणूक प्रचारापासून लांब राहा, असे सांगितले जात आहे. यात कामठी विधानसभा व हिंगणा मतदारसंघातील काही काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. याची कुणकुण केदार यांना लागल्याने त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : उमेदवारी बदलण्याच्या चर्चेनंतर खासदार हेमंत पाटील यांचे समर्थक मुंबईत

भाजपचे नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी मात्र केदार समर्थकांवर दबाव आणला जात असल्याच्या आरोपाचा इन्कार केला. ते म्हणाले, कोणावरही आम्ही दबाव टाकत नाही, ज्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे, त्यांचे आम्ही स्वागत करतो. ज्याला जेथे योग्य वाटते तेथे तो जातो, असे ते म्हणाले.

“ भाजप कधीही कोणावर दबाव टाकत नाही, ज्यांची इच्छा पक्षात येण्याची आहे, त्यांचे आम्ही स्वागत करतो, प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न असतो, ज्याची इच्छा असते तोच पक्ष प्रवेश करीत असतो.” –अरविंद गजभिये, अध्यक्ष, भाजप नागपूर जिल्हा

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 mahayuti leaders use pressure technique on supporters of former minister sunil kedar in ramtek print politics news zws