सांगली : ‘ताई, माई, अक्का ××××च्यावर मारा शिक्का’ ही घोषणा देणारी जीप गावात आली की, निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याचे निश्‍चित होते. गावातील पडक्या घराच्या भींती चुन्याने रंगू लागल्या की उमेदवाराचा प्रचार जोमात सुरू होतो. मात्र आताच्या डिजिटल युगात प्रचाराची धुरा मोबाईलने घेतली असतानाही ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा कमळासह भाजपच्या प्रचारासाठी भिंती बोलक्या होत आहेत. निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपासूनच हा कार्यक्रम सुरु आहे. यावर उमेदवाराचे नाव धसले तरी अबकी बार चारसो पार साठी ही आगाऊपणाची भक्तगणांची उसाबर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक आयोगाने प्रचाराला मर्यादित वेळ दिला जात असताना आपले बॅनर, पोस्टर लावण्यासाठी अधिकृत परवानगी, संबंधित जागा मालकाची ना हरकत आणि यासाठी करण्यात आलेल्या खर्चाची नोंद या बाबी आचारसंहितेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र निवडणूकच जाहीर होण्यापुर्वीच चार भिंतीच्या आतील छोटा पडदा आणि घराबाहेरील भिंतीही मोदी सरकारच्या प्रचारार्थ रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा : इंडिया आघाडीतील जागावाटपाचा गोंधळ कायम, पश्चिम बंगालमधील नेत्यांची नाराजी

गावपातळीवरील राजकारण हे वेगळ्या पध्दतीचे असते. गावात पक्षीय तटबंदीऐवजी भावकी, गावकी, गल्ली यांच्यातील वादात तू त्या उमेदवाराचा तर मी या उमेदवाराचा या पातळीवरूनच चालते. खालची आळी, वरची आळी याला शेताच्या बांधावरची कारणेही महत्वाची ठरतात. यातूनच निवडणूकीची माहोल तयार होतो. प्रचार कार्यालयाच्या निमित्ताने ध्वनीवर्धकावरून केले जाणारे आवाहन, पदयात्रा, मतदार भेटी, सभा, रॅली यांचे नियोजन तर होतेच, पण या निमित्ताने चहासाठी गिर्‍हायकाची वाट पाहत बसलेल्या खोकेवाल्याचाही चांगला धंदा होण्याची संधी उपलब्ध होते. प्रचार कार्यालय अजून थाटायची असली तरी भाजपच्या गोटातून महिलांच्या हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने, तर कधी होम मिनीस्टर सारख्या महिला वर्गात लोकप्रिय असलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांने संक्रातीपासूनच दोन्ही आघाड्याकडून प्रचाराचा धुरळा उडालेला आहेच. मतदाराला भेटवस्तू देणे आचारसंहिता भंग ठरण्यापुर्वीच संक्रांतीच लवाण महिलांच्या पदरात टाकून मताचि जोगवा मागितला आहे.

हेही वाचा : निवडणूक आयोगाचा महाराष्ट्राला एक तर हरयाणाला दुसरा न्याय

चावडीवर निवडणुक चर्चेसाठी जमा होणारे कार्यकर्ते आता सांगलीच्या आखाड्यात भाजपचा मल्ल ठरला असला तरी आघाडीचा ठरना झालाय. पाटलाच्या वाड्यातला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार की वसंतदादांचा नातू विशालदादा यावर पैजेचे विडे निश्‍चित केले जात आहेत. पैज तर कशाची रात्रीची नाईंटी आणि ढाब्यावरचं जेवण.

हेही वाचा : जागावाटपावरील नाराजीनाट्यानंतर अखेर ‘इंडिया’ आघाडी एकत्र; पण पुढे काय?

महायुती आणि महाआघाडी अशी लढतीत भाजपने सांगलीसाठी विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीतील उमेदवारी शिवसेनेला की काँग्रेसला यावर काथ्याकूट सुरू आहे. यामुळे विरोधक नेमका कोण हे अस्पष्ट असताना भाजपचा प्रचाराचा धडाका आस्ते कदम सुरू झाला आहे. भाजपचे उमेदवारही गावोगावी जाउन “राजा, औंदाही लक्ष द्यायला लागतयं” असे खांद्यावर हात ठेऊन सांगत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election campaign at village level print politics news css