वाशीम : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील महाले व शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी राहिली नाही. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष देत प्रतिष्ठा पणाला लावली आहे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपला गड ताब्यात घेण्यासाठी आधीपासूनचं राण उठविले.
ऐनवेळी शिंदे गटाने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी व यवतमाळ माहेर असलेल्या राजश्री पाटील महाले यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला. प्रचारासाठी कमी वेळ असताना देखील त्यांनी पायाला भींगरी लावून मतदारसंघ पिंजून काढला. त्यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार वेळा आले. उदयोगमंत्री उदय सामंत यांनीही जोर लावला तर अर्जुन खोतकर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. तसेच भाजपमधील देखील बड्या नेत्यांनी गाठी भेटी घेतल्या. मंगरुळपीर शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच जाहीर सभा पार पडली. गावागावात गाठीभेटीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत असल्या तरी त्यांची मदार सहकारी पक्षावर अवलंबून आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक वाशीम शहरात बाईक रॅली काढून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री शिंदे यांची मतदारसंघात चौथी भेट असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हेही वाचा – TMC पेक्षा १ जागा जास्त जिंकलो तरी ममता सरकार पडेल; बंगाल भाजपा प्रमुखांचा दावा
यापूर्वी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होत होती. परंतु राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होताना दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील महाले, शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख, बसपाकडून हरिभाऊ राठोड, वंचित पुरस्कृत समनक पार्टीचे प्रा. राठोड यांच्यासह अपक्ष उमेदवार लोकसभेच्या रिंगणत असले तरी खरी लढत ही राजश्री पाटील महाले व संजय देशमुख यांच्यातच होणार आहे.
यवतमाळ वाशीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मागील २५ वर्षांपासून येथे शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मात्र राज्यात शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेना शिंदे व शिवसेना ठाकरे असे दोन गट उदयाला आले. विद्यमान खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या. मात्र शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर राहिल्याने पुन्हा यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक यांना दिले. माजी मंत्री संजय देशमुख यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले.
हेही वाचा – मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित
दलित, मुस्लिम व आदिवासी यांचे बळ कुणाला?
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात दलित, आदिवासी व मुस्लिम यांची निर्णायक मते आहेत. यावेळी येथून वंचितचा उमेदवार बाद झाल्याने वंचितने समनक जनता पार्टीच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे ही मते कुणाच्या पारड्यात पडणार यावरून विजय ठरणार असा कयास आहे.