नंदुरबार – लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गेल्या आठवड्याभरापासून त्यांनी अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात ठोकलेला तळ आणि त्यातच त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी याच मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटनाचा लावलेला धडाका, यामुळे या मतदारसंघात महायुतीकडील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावित यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेऊन काँग्रेसला या मतदारसंघातील शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) काही जणांनी मदत केली होती.

सलग दोनवेळा लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या डाॅ. हिना गावित यांना मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर डॉ. गावित या नंदुरबारच्या राजकारणात अधिकच सक्रिय झाल्या आहेत. अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. आठवड्यापासून त्यांनी मतदारसंघात ठाण मांडले आहे. त्यातच त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मतदारसंघातील अनेक विकास कामांना मंजुरी आणि उद्घाटनांची राळ उडवून दिली.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ?

या मतदारसंघात शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) इच्छुक विजयसिंग पराडके आणि किरसिंग वसावे यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे डॉ. हिना गावित यांच्या विरोधात प्रचार केला होता. काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी हे सलग ३५ वर्षांपासून अक्कलकुवा-अक्राणीचे आमदार आहेत. त्यांच्याच मुलाने डॉ. हिना गावित यांचा पराभव केला. त्यामुळे पाडवी पिता-पुत्रांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी डॉ. हिना गावित यांनी कंबर कसली असल्याचे म्हटले जाते. डाॅ. गावित यांच्या भूमिकेने शिंदे गटातील नेतेही धास्तावले आहेत.

लोकसभेच्या निकालाची आकडेवारी पाहता विरोधकांनी डॉ. हिना गावित यांच्याविरोधात मोट बांधल्याने पाडवी यांना एक लाख २५ हजार मते या मतदारसंघातून मिळाली होती. दुसरीकडे, गावित यांना सुमारे ८५ हजार मते मिळाली होती. आता गावित यांच्याविरुद्ध एकत्र येणारे सर्व विरोधक वेगवेगळे लढणार असल्याने त्यांच्या मताची विभागणी होऊन गावित यांना फायदा होऊ शकतो, असे गणित मांडले जात आहे. डॉ. हिना गावित यांनी मतदारसंघातील अक्कलकुवा शहरात एक तर, धडगाव शहरात एक घर वास्तव्यासाठी भाडेतत्वावर घेतली आहेत. त्यामुळे त्यांची विधानसभा निवडणूक लढण्याची संपूर्ण तयारी झाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – संजय राठोड यांना शह देण्यासाठी भाजपची खेळी? पोहरादेवीतील नाराजी दूर करण्यासाठी धर्मगुरूंना आमदारपद!

वरिष्ठांच्या आदेशानुसार काही दिवसांपासून अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात महायुतीसाठी सक्रिय झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप निर्णय घेतला नसला तरी वरिष्ठांचे आदेश आल्यास कोणत्याही मतदारसंघातून लढण्यास सज्ज आहे. अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातील आदिवासी बांधव आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या मतदारसंघातून महायुतीचा विजय निश्चित असून वर्षोनुवर्षे या मतदारसंघातून निवडूनही विकासाची कामे करु न शकणाऱ्या निष्क्रिय आणि मुंबईतच राहणाऱ्या आमदार के. सी. पाडवी यांना महायुतीच्या माध्यमातून पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. – डाॅ. हिना गावित (माजी खासदार, नंदुरबार)