पुणे : सुमारे तीन लाख मुस्लीम मतदार असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) हा पक्ष सध्या थांबा आणि वाट पाहा या भूमिकेत आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा केला असताना ‘एमआयएम’चे कार्यकर्ते हे उमेदवार उभा करायचा की नाही, याबाबत प्रदेश पातळीवरून येणाऱ्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात जातनिहाय मतदार संख्या पाहता इतर मागासवर्गाचे (ओबीसी) प्राबल्य आहे. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर मराठा मतदारांची संख्या आहे. मतदार संख्येत तिसऱ्या स्थानावर मुस्लिम मतदार आहेत. त्यापैकी बहुतांश मतदार हे ‘एमआयएम’शी जोडले गेले आहेत. या मतदारांची मते ही निकालामध्ये निर्णयक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न असणार आहे, तर महायुतीकडून या मतांचे ध्रुवीकरण करण्याच्यादृष्टीने डावपेच आखण्यात येत आहेत. ‘एमआयएम’चा उमेदवार उभा राहिल्यास मुस्लिम मतांचे विभाजन होऊन ते भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पथ्यावर पडणार आहे. मात्र, उमेदवार उभा न केल्यास काँग्रेसला ही मते मिळविण्यासाठी हातमिळवणी करावी लागणार आहे. या मतांचा पाठिंबा मिळाल्यास काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना फायदा होणार आहे. मात्र, ‘एमआयएम’ने पुण्यातून उमेदवार उभा करण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. याबाबत प्रदेश पातळीवरून आदेश येणार असल्याने या पक्षाचे कार्यकर्ते तटस्थ भूमिकेत आहेत. उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला गेल्यास कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत ‘एमआयएम’चे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

हेही वाचा – “पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

पुण्यात मतदारांची संख्या २० लाख तीन हजार ३१६ झाली आहे. सर्वाधिक मतदार हे ओबीसी प्रवर्गातील आहेत. त्यांचे प्रमाण ३५.५९ टक्के म्हणजे ७ लाख १२ हजार ९८० आहे. त्या खालोखाल मराठा समाजाचे मतदार आहेत. त्यांचे प्रमाण १७.८५ टक्के म्हणजे ३ लाख ५७ हजार ५९२ आहे. आजवर ओबीसी आणि मराठा या समाजाच्या मतदारांनंतर ब्राह्मण समाजाची मते होती. मात्र, या वेळच्या निवडणुकीत ब्राह्मण मतांऐवजी मुस्लिम मतदारांची संख्या ही जास्त झाली आहे. सद्य:स्थितीत ब्राह्मण समाजाची १३.५७ टक्के म्हणजे दोन लाख ७१ हजार ८५० आहेत. या मतदारांपेक्षा मुस्लिम मतदारांची संख्या वाढली आहे. मुस्लिम मतदारांचे प्रमाण १४.४३ टक्के म्हणजे दोन लाख ८९ हजार ७८ एवढी झाली आहे. त्यामुळे ही मते मिळविण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे. मात्र, काँग्रेसकडून याबाबत कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही.

हेही वाचा – आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंहांना “इतिहास न्याय देईल?”

पुण्यात उमेदवार उभा करायचा की नाही, याबाबत प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील हे निर्णय घेणार आहेत. तोपर्यंत आम्ही ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने छुप्या पाठिंब्याची मागणी केली होती. मात्र, त्यास नकार देण्यात आला होता. पक्षाचा उमेदवार नसेल, तर काँग्रेसने उघड पाठिंब्याचा प्रस्ताव ठेवावा. काँग्रेसच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा दिला जाणार नाही. – अखिल मुजावर, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, एमआयएम

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha pune what role will aimim play in pune print politics news ssb 93