नवी दिल्ली : कायदेमंडळांमध्ये होणारा गोंधळ तसेच, सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाढत असलेली कटुता ही चिंतेची बाब आहे. कायदेमंडळांमध्ये सरकारच्या धोरणांवर व कार्यक्रमांवर सदनाची प्रतिष्ठा सांभाळून सभ्यपणे चर्चा झाली पाहिजे, असे विचार लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी १० व्या राष्ट्रकुल संसदीय संघाच्या (सीपीए) भारत परिक्षेत्र परिषदेच्या सांगता समारंभात व्यक्त केले. बिर्ला भारत परिक्षेत्राचे अध्यक्ष आहेत.

कायदेमंडळाचे कामकाज पीठासीन अधिकाऱ्यांनी सन्मानाने, सभ्यतेने आणि भारतीय मूल्ये व मानकांना अनुसरून चालवले पाहिजे. सदनाच्या परंपरा व व्यवस्था भारतीय असल्या पाहिजेत. भारतीयत्वाची भावना दृढ होईल अशी कायदेमंडळाची धोरणे व कायदे असले पाहिजेत. त्याद्वारे ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ हे ध्येय गाठता येईल, असेही मत बिर्ला यांनी मांडले. पीठासीन अधिकाऱ्यांनी विविध राजकीय पक्षांशी सातत्याने संवाद साधला पाहिजे व त्याद्वारे राजकारणाचे नवे मापदंड प्रस्थापित केले पाहिजेत, अशी सूचनाही बिर्ला यांनी केली.

हेही वाचा >>>Siddaramaiah : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना MUDA प्रकरण भोवणार? राज्यपालांचा आदेश न्यायालयाने कायम ठेवल्याने सिद्धरामय्या अडचणीत

एक देश, एक डिजिटल व्यासपीठ!

विधिमंडळांच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया वेगाने होत असून देशातील सर्व विधिमंडळे ‘डिजिटल संसद’ पोर्टलशी जोडली जातील. या ‘एक देश, एक डिजिटल व्यासपीठा’वरून देशातील विधिमंडळांतील कामकाजांची माहिती लोकांना उपलब्ध होऊ शकेल. डिजिटलायझेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधिमंडळांच्या अधिवेशनांचे थेट प्रक्षेपणही लोकांना या पोर्टलवरून पाहता येईल, अशी माहिती बिर्ला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा >>>धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘आघाडी’

विधिमंडळांमधील प्रयोगांवर चर्चा

राज्याच्या अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विविध पक्षांच्या आमदारांची चर्चा करणे वगैरे अनेक प्रयोग वेगवेगळ्या विधिमंडळांमध्ये होत आहेत. अशा प्रयोगांची चर्चा दोन दिवसांच्या विधिमंडळातील पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत झाली. या बैठकांमध्ये २५ विधानसभाध्यक्ष, ४ विधान परिषदेचे सभापती, ४२ पीठासीन अधिकारी सहभागी झाले होते.