२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला त्याच ३०३ जागांपैकी २०८ जागांवर पुन्हा विजय मिळाला; परंतु उर्वरित ९५ पैकी ९२ जागांवर पराभव पत्करावा लागला आणि सहकारी पक्षांना म्हणजेच संयुक्त जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल व राष्ट्रीय लोक दल यांना देण्यात आलेली प्रत्येकी एक जागा त्यांनी जिंकली. यावेळी भाजपाने नव्या ३२ मतदारसंघांमध्ये विजय संपादित केला आहे. अशी भाजपाची एकूण सदस्यसंख्या २४० वर आली आहे. भाजपाने यावेळी ‘चारसौपार’ जाण्याचे लक्ष्य ठेवले असले तरीही ते दिवास्वप्नच ठरले आणि त्यांच्या आहे त्या जागांमध्येही कमालीची घट झाली आहे. एकूण एनडीए आघाडीलाही २९३ जागा प्राप्त झाल्या असून, तीनशेपारही जाता आलेले नाही.
हेही वाचा : कंगना रणौत, हेमा मालिनी ते अरुण गोविल! लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या सेलिब्रिटींचं काय झालं?
भाजपाचा ज्या ९२ जागांवर पराभव झाला आहे, त्यांचे विश्लेषण काय सांगते?
अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असलेल्या २९ मतदारसंघांमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला सर्वाधिक फटका बसला असून, एकूण ९२ पराभूत जागांपैकी २९ जागा एकट्या उत्तर प्रदेशमध्ये गमवाव्या लागल्या आहेत. उत्तर प्रदेशसमवेत ज्या इतर दोन राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांचा समावेश होतो. भाजपाला महाराष्ट्रात १६, तर राजस्थानमध्ये १० जागी पराभूत व्हावे लागले आहे. त्याशिवाय भाजपाला कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी आठ जागा गमवाव्या लागल्या आहेत.
हरियाणामध्ये भाजपाने अर्ध्या म्हणजेच पाच जागा गमावल्या आहेत. त्याबरोबरच भाजपाने बिहार- ५, झारखंड- ३, पंजाबमध्ये २ आणि आसाम, चंदिगड, दीव आणि दमण, गुजरात, लडाख व मणिपूर या राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा गमावली आहे. एकुणात भाजपाने १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून ९२ जागा गमावल्या आहेत. भाजपाने राखीव जागांसोबतच सामान्य प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या जागांवरही पराभव पत्करला आहे. भाजपाने गमावलेल्या ९२ जागांपैकी १८ जागा अनुसूचित जातींसाठी; तर ११ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव होत्या. उर्वरित ६३ जागा सामान्य प्रवर्गासाठी खुल्या होत्या. या पराभूत जागांमध्ये बहुतांश जागा ग्रामीण भागातल्या असल्या तरीही त्यामध्ये काही शहरी मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबई उत्तर मध्य व मुंबई ईशान्य या शहरी मतदारसंघांमध्ये इंडिया आघाडीने भाजपा उमेदवारांचा पराभव केला आहे. भाजपा जेथे पराभूत झाला त्या ९२ पैकी औरंगाबाद, दुमका, लोहरदगा, गुलबर्गा, रायचूर, गडचिरोली-चिमूर, बारमेर, करौली-धोलपूर, बांदा, चांदौली व फतेहपूर हे ११ मतदारसंघ देशातील सर्वाधिक गरीब जिल्ह्यांमध्ये मोडतात.
या ११ पैकी काँग्रेसने सहा; तर समाजवादी पार्टीने तीन मतदारसंघांमध्ये भाजपाला पराभूत केले आहे. भाजपा पराभूत ठरलेल्या ९२ पैकी ४२ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ, राजस्थानमधील आठ व उत्तर प्रदेशमधील चार जागांचा समावेश आहे. भाजपा पराभूत ठरलेल्या मतदारसंघांपैकी २५ ठिकाणी समाजवादी पार्टीने विजय मिळवला आहे. तर, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाने आठ आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गटाने पाच जागा जिंकल्या आहेत. भाजपाला ९२ जागी पराभूत केलेल्या इतर पक्षांमध्ये आम आदमी पार्टी, भारत आदिवासी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनिस्ट), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये भाजपाने विजय संपादन केलेल्या ३०३ जागांमधील ७७ जागा या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असलेल्या होत्या. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये या ७७ पैकी फक्त ४८ जागांवर भाजपाला पुन्हा विजय प्राप्त करता आला आहे. उर्वरित २९ जागा विरोधकांनी भाजपाकडून हिरावून घेतल्या आहेत.
भाजपाने ९२ जागा गमावल्या असल्या तरीही ३२ नव्या मतदारसंघांमध्ये विजयी पताका फडकवली आहे. या नव्या ३२ जागा ११ राज्यांमध्ये मिळाल्या आहेत. या जागांच्या जोरावरच भाजपाला २४० चा आकडा गाठता आला. या ३२ पैकी सर्वाधिक १२ जागा ओडिशा या राज्याने दिल्या आहेत. तेलंगणा- चार, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यात प्रत्येकी तीन, पश्चिम बंगाल- दोन; तर बिहार, दादरा व नगर हवेली, छत्तीसगड, अंदमान व निकोबार द्वीप, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांत प्रत्येकी एक अशा एकूण ३२ नव्या जागी भाजपा विजयी ठरली आहे. या ३२ पैकी फक्त तीन जागा अनुसूचित जातींसाठी; तर पाच जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव होत्या.