सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांची काहीही गरज नसून हे विभाग बंद केले पाहिजेत, असे मत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मांडले आहे. त्यांनी इंडिया आघाडीसमोरही हा प्रस्ताव मांडणार असल्याचे म्हटले आहे. द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अखिलेश यादव म्हणाले, “सीबीआय आणि ईडी बंद व्हायला हवेत. जर तुम्ही आर्थिक फसवणूक केली असेल, तर त्यासाठी आयकर विभाग आहे. मग सीबीआयची गरजच काय? प्रत्येक राज्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. गरज भासल्यास त्याचा वापर करता येतो.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सीबीआय-ईडीची गरजच नाही”

पुढे ते म्हणाले की, या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजपाविरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केला जात आहे. “सरकार आणण्यासाठी वा सरकार पाडण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. नोटबंदीमध्ये नेमका काय घोटाळा झाला, याचा तपास या केंद्रीय तपास यंत्रणा का करीत नाहीत? काही लोकांनी त्यांचा काळा पैसा कसा पांढरा करून घेतला?”., असे यादव यांनी विचारले. मात्र, इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास इतके दूरगामी पाऊल उचलण्यास तयार होईल का, या प्रश्नावर ते म्हणाले, “हा माझा प्रस्ताव असून, मी तो इंडिया आघाडीसमोर ठेवणार आहे.”

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेस एकत्र लढत आहेत. आपल्या आघाडीबाबत ते म्हणाले, “ही आघाडी कार्यरत राहील. आम्ही ती कार्यरत ठेवू. येणारी कोणतीही निवडणूक असो; आम्ही एकत्र लढू. मात्र, सध्या देशात आमचे सरकार यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.” उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ गांधी-नेहरू घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ मानले जातात. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस युतीमध्ये असो वा नसो; समाजवादी पार्टीने हे दोन मतदारसंघ नेहमीच काँग्रेससाठी सोडले आहेत. अर्थातच, या निवडणुकीतही या दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचेच उमेदवार आहेत.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत किती मुस्लीम उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांनी दिली उमेदवारी?

“इंडिया आघाडी कायम कार्यरत ठेवू”


“२०१९ मध्ये अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा स्मृती इराणींकडून पराभव झाला होता. या निवडणुकीत अमेठीमधून गांधी घराण्याचे निष्ठावंत किशोरी लाल शर्मा; तर रायबरेलीतून राहुल गांधी लढत आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती.” त्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, “प्रत्येक निवडणूक नवीन परिस्थिती निर्माण करीत असते. परंतु, आमची आघाडी कायम राहील, असा आमचा प्रयत्न असेल. राष्ट्रीय स्तरावरही इंडिया आघाडी कार्यरत राहील.”

अखिलेश यादव यांनी अमेठी आणि रायबरेलीमध्ये रॅली घेतल्यामुळे किमान अखिलेश यांचा या आघाडीवर पुरेसा विश्वास आहे, हे अधोरेखित होते. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र येत घेतलेल्या या सभांनाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. सध्या प्रत्यक्ष मैदानात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगले संबंध असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये यादव समाजातील मतदारांची संख्या ३.५ लाख आहे. यादव हा समाजवादी पार्टीचा पारंपरिक मतदार मानला जातो. अखिलेश यादव म्हणाले, “आमच्या मदतीशिवाय काँग्रेसलाही चांगली कामगिरी करणं शक्य नाही.” २०१९ मध्ये रायबरेली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये सपाने विजय मिळवला आहे. अखिलेश यादव म्हणाले, “यावेळी आमच्या युतीमध्ये एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला जाणवेल; जी मागील युतीमध्ये नव्हती. ‘पीडीए व्होट’ (पिछडा, दलित व अल्पसंख्याक मतदार) आमच्या बाजूने असल्यामुळे आम्हीच इथे जिंकणार आहोत. काँग्रेसही आमच्याबरोबर आहे.”

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये उच्चवर्णीय, दलित आणि मुस्लिमांचा समावेश होतो. त्याबाबत अखिलेश यादव म्हणाले की, “यावेळी फार मोठा बदल होणार आहे. कारण- पक्षाने जातनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा लावून धरला आहे. मात्र, काँग्रेसला ओबीसींचा विश्वास जिंकण्यात यश मिळेल की नाही, हे त्यांच्यावरच अवलंबून असेल.” काँग्रेसमधील बदल राहुलच करीत आहेत का, या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले, “काँग्रेसची रणनीती या बदलास कारणीभूत आहे.”

समाजवादी पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार?

इंडिया आघाडीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याबाबत ममता बॅनर्जींनी वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव म्हणाले, “आमच्यात काही अंतर जरूर राहिले आहे. मात्र, त्यांनाही इंडिया आघाडी सत्तेत यावी, असेच वाटते.” इंडिया आघाडी सत्तेत आली, तर समाजवादी पार्टी या सरकारमध्ये सामील होईल की बाहेरून पाठिंबा देईल, या प्रश्नावर ते म्हणाले, “आतून की बाहेरून पाठिंबा, हे आम्ही लोकसभा निवडणूक झाल्यावर ठरवू. मात्र, आम्ही आमचे सरकार सत्तेत नक्की आणू. त्यासाठीची आमची रणनीती काहीही असू शकेल.”

हेही वाचा : दोन मुली निवडणूक रिंगणात, पण चर्चा लालू प्रसाद यादवांना ‘किडनी देनेवाली बेटी’ चीच!

येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते, असे विचारले असता, अखिलेश यादव म्हणाले, “प्रादेशिक पक्ष त्यांच्या आहे त्या मजबूत स्थितीत राहतील आणि काँग्रेसला ताकद देण्याचे काम करतील. जेव्हा जेव्हा काँग्रेस कमकुवत झाली आहे, तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहिलो आहोत. त्यांच्याजवळ जाऊन असो वा दूर राहून असो; आम्हाला तर भाजपाशीच लढायचे आहे. जेव्हा नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी सोडून भाजपाबरोबर जाणे पसंत केले, तेव्हा मी तातडीने काँग्रेसबरोबर जागावाटप करणार असल्याचे जाहीर केले. आम्ही आमची युती मजबूत केली. बाकीचे आमच्याबरोबर येत गेले.” मात्र, समाजवादी पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होईल का, या प्रश्नावर ते म्हणाले, “समाजवादी पार्टी काँग्रेसमध्ये कधीही विलीन होणार नाही.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2024 cbi ed should be shut akhilesh yadav india alliance vsh
Show comments