केरळ हे देशातील असे एकमेव राज्य आहे, जिथे डाव्या पक्षाची सत्ता आहे. एकेकाळी पश्चिम बंगालमध्येही डाव्यांचे प्राबल्य अधिक होते. मात्र, आता तृणमूल काँग्रेस पक्ष गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे सत्तेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अल्पसंख्याकांची मुस्कटदाबी करत असून ममता बॅनर्जी त्यांना मदत करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांनी केला आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालच्या खऱ्या प्रश्नांना भिडतच नसून ते तस्करी आणि इतर बेकायदेशीर कृत्यांमधून पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. माकपचे राज्य सचिव एम. डी. सलीम यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ममता बॅनर्जी अल्पसंख्याकांच्या विरोधात”

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, “अल्पसंख्याकांना विकासापासून दूर ठेवण्याचे काम मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच केले आहे. त्यासाठी त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदतही करतात. विशेषत: CAA आणि NRC कायद्यासाठी तृणमूल काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला होता. स्वतःला आणि पुतण्याला वाचवण्यासाठी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे”, असे ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून मुर्शीदाबाद लोकसभा मतदारसंघातून एम. डी. सलीम उभे आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अबू ताहीर खान यांचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. सलीम हे २०१४ साली रायगंज मतदारसंघातून खासदार झाले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मुर्शीदाबाद हा कोणे एके काळी माकपचा बालेकिल्ला होता. त्याआधी काँग्रेसनेही इथे अनेकदा विजय मिळवला होता.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये मुस्लीम फक्त मतदानासाठी; उमेदवारी कुणालाच नाही, का झालं असं?

माकपकडून तरुणांना उमेदवारी देण्याचा निर्णय अद्यापतरी प्रभावी ठरलेला नाही. या निवडणुकीत तो कितपत प्रभावी ठरेल, या प्रश्नावर एम. डी. सलीम म्हणाले की, “निवडणूक अद्याप सुरू असल्याने भूतकाळाविषयी बोलणे योग्य नाही. वर्तमानाचा विचार करून राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलले पाहिजे. उमेदवारांबद्दल नाही तर मतदारांबद्दल बोला. केंद्रातील आणि राज्यातील सरकारे तरुणांच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यात सपशेल अयशस्वी ठरली असल्याने राज्यातील तरुणांना डाव्या पक्षांकडून अपेक्षा आहेत. याचा निवडणुकीच्या निकालावर नक्कीच परिणाम होईल.”
पुढे एम. डी. सलीम म्हणाले की, “तुम्ही २०२३ च्या पंचायत निवडणुकीचे निकाल काढून पाहा. २०२१ च्या विधानसभेचे निकाल सांगू नका, तेव्हा एनआरसी आणि सीएएच्या मुद्द्यांमुळे कोणती तरी एक बाजू घेण्यास मतदारांना भाग पाडले गेले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही बालाकोटचा मुद्दा प्रमुख झाला होता.”

“पोटापाण्याचा आणि महागाईचा प्रश्न महत्त्वाचा”

डाव्या आणि काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीसाठीचा अजेंडा काय आहे, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “गेले वर्षभर एकीकडे भाजपा पक्ष समान नागरी कायदा आणि राम मंदिरावर बोलत राहिला आहे, तर दुसरीकडे आम्ही पोटापाण्याच्या प्रश्नांवर आणि महागाईवर बोलत आहोत. तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालच्या खऱ्या प्रश्नांना भिडतच नाही. ते तस्करी आणि इतर बेकायदेशीर कृत्यांमधून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणूनच ते आता एकटे पडले आहेत”, असा आरोप त्यांनी केला.

बंगालमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेसला आता राजकीय अवकाश राहिला आहे का, या प्रश्नावर एम. डी. सलीम म्हणाले की, “गेल्या दोन निवडणुकांपासून तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्येच लढत असल्याचे चुकीचे चित्र जाणीवपूर्वक तयार करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेस पक्षदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच अजेंडा राबवणार असल्याचे लोकांना लक्षात आले आहे.” पुढे ते म्हणाले की, “राज्यातील मार्क्सवादी पक्षांचा नायनाट करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तृणमूल काँग्रेसची निर्मिती केली होती. लोकांना आता डावे आणि काँग्रेसच्या रुपाने आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत होत आहे.” काँग्रेसची मते डाव्यांना आणि डाव्यांची मते काँग्रेसला मिळतील का, या प्रश्नावर ते म्हणाले की, “हो, मते मिळतील, म्हणूनच आम्ही युती केली आहे. विरोधकांनी एकत्र येऊ नये यासाठी हा दुष्प्रचार केला जातो आहे की, आमची मते एकमेकांना मिळणार नाहीत. यावेळी नेते नव्हे तर कार्यकर्ते, मतदार आणि सामान्य लोकच एकत्र आले आहेत.”

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहे. तिथे काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी युती केली असून भाजपाचे आव्हानही समोर आहे. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी आकारास का आली नाही, या प्रश्नावर ते म्हणाले की, “सुरुवातीपासूनच आम्ही हे सांगत आहोत की, ही फक्त निवडणुकीपुरती युती नाही. भारताच्या विविधतेतील एकतेचे रक्षण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक राज्यात असलेले वेगवेगळे वास्तव मान्य करावे लागेल आणि आपल्या दृष्टिकोनामध्येही विविधता आणावी लागेल, याची जाणीव आम्हाला झाली; म्हणूनच पश्चिम बंगालमधील सध्याचे वास्तव पाहता आम्ही भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांशी लढत आहोत.”

“स्वतःला आणि पुतण्याला वाचवण्यासाठी ममतांची भाजपाशी हातमिळवणी”

अल्पसंख्याकांची मते ममता बॅनर्जींना यावेळी मिळतील का, या प्रश्नावर एम. डी. सलीम म्हणाले की, “कोणताही धार्मिक गट कोणत्याही राजकीय पक्षाचा कायमस्वरूपी मतदार नाही. ममता बॅनर्जी यांनी असे गृहीत धरले आहे की, पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याकांची मते त्यांनाच मिळतील. मात्र, जर तुम्ही उत्तर बंगालपासून ते दक्षिण बंगालमधील मुस्लिमांशी संवाद साधलात तर तुम्हाला वास्तव लक्षात येईल. आपण भाजपाशी लढत असल्याचा आभास निर्माण करत ममता बॅनर्जींनीच त्यांना राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठीची वाट मोकळी करून दिली आहे, हे वास्तव आता या मुस्लिमांच्याही लक्षात आलेले आहे.” पुढे ते म्हणाले की, “एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अल्पसंख्याकांची मुस्कटदाबी करत आहे, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी त्यांना मदत करत आहेत. अल्पसंख्याकांना विकासापासून दूर ठेवण्याचे काम ममता बॅनर्जी यांनीच केले आहे. विशेषत: CAA आणि NRC कायद्यासाठी तृणमूल काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला होता. स्वतःला आणि पुतण्याला वाचवण्यासाठी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे.”

हेही वाचा : मुस्लिमांनी मतदान केले म्हणूनच योगी आदित्यनाथ दोनदा मुख्यमंत्री; टीडीपीच्या उमेदवाराचे वक्तव्य

मुर्शीदाबादमध्ये तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर प्रचार करत आहात, या प्रश्नावर ते म्हणाले की, “आम्ही पोटापाण्याच्या प्रश्नांवर बोलत आहोत. सुवेंदू अधिकारी आणि अभिषेक बॅनर्जी हे दोघेही मुर्शीदाबाद जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक होते. आधी अधिकारी आणि नंतर बॅनर्जींच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांनी यशस्वीपणे मुर्शीदाबादची लूट केली आहे. लोकांचे हक्क हिरावून घेणे हा ममता बॅनर्जींचा उद्देश आहे. त्यांनी फक्त मतांचीच नाही; तर पैसा, नोकरी आणि मनरेगाचे पैसेही हडपले आहेत. मुर्शीदाबादमधील रस्ते, शाळा आणि आरोग्य केंद्र अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. हा सगळा पैसा कुठे गेला? उद्योग, रस्ते आणि विकास कुठे गेला? लोकांना त्यांचा आवाज संसदेत हवा आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2024 cpim trinamool congress west bengal rss vsh