लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. शनिवारी (१ जून) सातव्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता मंगळवारी (४ जून) निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. तत्पूर्वी शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर ‘एक्झिट पोल’चे (मतदानोत्तर चाचण्या) निष्कर्षही हाती आले आहेत. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणीत एनडीए आघाडीलाच बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतात आपले प्राबल्य असणाऱ्या भाजपाला आता दक्षिणेतही सूर गवसणार असल्याचे चित्र एक्झिट पोलमधून उभे राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिणेत वाढणार भाजपाचे प्राबल्य?

एक्झिट पोल्सनुसार, भाजपा कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करणार आहे; तर तेलंगणा व तमिळनाडूमध्ये आपले प्राबल्य वाढविण्यामध्ये भाजपाला यश येणार असल्याचे दिसत आहे. भाजपाला आजवर दक्षिणेत आपला जम बसविता आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा दक्षिणेत चांगली कामगिरी करीत असल्याचे चित्र विविध एक्झिट पोल्सनी उभे केले आहे.

हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वर्चस्व?

केरळ

दक्षिणेतील केरळ राज्यात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचाच (UDF) वरचष्मा राहणार असला तरीही इथे भाजपाला किमान दोन मतदारसंघांमध्ये विजय मिळविण्यात यश मिळेल, असे एक्झिट पोल्समधून सांगण्यात आले आहे. यापूर्वी भाजपाला कधीही केरळमध्ये आपले खाते उघडता आलेले नाही. २०१९ मध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने २० पैकी १९ लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. राहुल गांधींनी केरळमधील वायनाड मतदारसंघामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे UDF ला चांगले बहुमत प्राप्त झाले होते. दुसरीकडे राज्यात सत्तेवर असणाऱ्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये द्रमुक हा पक्ष इंडिया आघाडीचे नेतृत्व करतो आहे. एक्झिट पोल्सनुसार, तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला सर्वाधिक जागा प्राप्त होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकूण ३९ पैकी ३३ ते ३९ जागा इंडिया आघाडीला प्राप्त होतील; तर भाजपाला साधारण चार जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये तमिळनाडूमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नव्हती. द्रमुकने ३९ पैकी ३८ जागांवर विजय मिळविला होता. एक्झिट पोल्समध्ये वर्तविलेल्या अंदाजानुसार, तमिळनाडूमध्ये जर भाजपाला चार जागा मिळाल्या, तर के. अन्नामलाई यांच्या नेतृत्वावरही शिक्कामोर्तब होईल. एआयडीएमके पक्षांतर्गत झालेल्या अंतर्गत बंडाळीचा फायदाही भाजपाला होत असल्याचे यातून दिसून येईल.

कर्नाटक

कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे; तसेच प्रज्वल रेवण्णा प्रकरणामुळे एनडीए आघाडीला मोठा फटकाही बसला आहे. मात्र, तरीही कर्नाटकमध्ये २०१९ प्रमाणेच भाजपा दमदार कामगिरी करणार असल्याची शक्यता एक्झिट पोल्सनी वर्तवली आहे. २०१९ मध्ये भाजपाने २८ पैकी २७ जागांवर विजय मिळविला होता. सध्याच्या एक्झिट पोल्सनुसार, भाजपा २३ जागा जिंकेल, अशी शक्यता आहे.

तेलंगणा

तेलंगणामध्येही काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे. एक्झिट पोल्सने वर्तविलेली शक्यता सत्यात उतरली, तर तो भाजपासाठी सुखद धक्का असेल. तेलंगणामधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीला सध्या उतरती कळा लागली आहे. त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. २०१९ मध्ये १७ पैकी चार जागांवर एनडीए आघाडीला विजय मिळाला होता; तर उर्वरित जागा इंडिया आघाडीतील घटक पक्षांना प्राप्त झाल्या होत्या.

हेही वाचा : Exit Poll: २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये एक्झिट पोलचा अंदाज किती अचूक होता?

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे होत आहे. एक्झिट पोल्सनुसार, आंध्र प्रदेशमध्ये एनडीए आघाडीला निर्विवाद बहुमत देण्यात आले आहे. या राज्यात एनडीए आघाडीमध्ये भाजपाबरोबर टीडीपी आणि जनसेना पार्टी आहे. २०१९ मध्ये वायएसआरसीपी पक्षाला २५ पैकी २२ जागांवर विजय मिळाल होता. आताच्या एक्झिट पोल्सनुसार, एनडीए आघाडीला २२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आंध्र प्रदेशबाबत वर्तविण्यात आलेले अंदाज खरे ठरले, तर वायएसआरसीपी पक्षाला जनमतविरोधी कलाचा फटका बसल्याचे दिसून येईल. दुसरीकडे एनडीए आघाडीतील घटक पक्षांचे जागावाटप यशस्वी ठरल्याचे अधोरेखित होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2024 exit poll bjp dominance in south karnataka andhra pradesh vsh
First published on: 02-06-2024 at 12:06 IST