ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत एनडीएबरोबर जाणे पसंत केल्याने बिहारमधील राजकारणामध्ये वेगळीच रंगत आली आहे. यामुळे भल्याभल्यांची पंचाईत झाली आहे. त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे जेडीयूचे माजी अध्यक्ष राजीव रंजन सिंग ऊर्फ लालन होय.
चार महिन्यांपूर्वी मुंगेरमध्ये झालेल्या एका सभेमध्ये राजीव रंजन सिंग यांनी जोरदार भाषण केले होते. या भाषणामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. मोदींच्या ‘विदाई’ची सुरुवात बिहारमधूनच सुरू होईल, अशा आशयाचे तडफदार भाषण त्यांनी केले होते. पश्चिम बंगाल, बिहार आणि इतर राज्यांमध्ये भाजपाच्या किती किती जागा कमी होतील, याची गणतीही त्यांनी केली होती. आता हेच राजीव रंजन सिंग गेल्या शुक्रवारी (२६ एप्रिल) पंतप्रधान मोदींसमवेत प्रचारसभेला संबोधित करताना दिसून आले. मुंगेर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागतही केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. मोदींचे कौतुक करताना ते म्हणाले की, “देवी चंडीने मोदींना चारशेपार जाण्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी आता भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवायला हवा.” मात्र, या भाषणात राष्ट्रीय जनता दलाचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये काही प्रश्नांची उत्तरे ते टाळताना दिसून आले. राजदच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल विचारले असता त्या प्रश्नाला बगल देऊन ते म्हणाले की, मी फक्त माझ्या कामाबद्दलच बोलेन.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या मुस्लिमांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर भाजपातील नेत्याचाच घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?
जानेवारीमध्ये नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाबरोबरची युती तोडून भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजीव रंजन सिंह यांनाही धक्का बसला होता. याबाबत बोलताना त्यांच्या मतदारसंघातील एका मतदाराने म्हटले की, “आता प्रचार कसा करायचा हेच लालन बाबूंना समजत नसेल. कालपर्यंत ते लालू प्रसाद यादव यांचे कौतुक करत होते आणि पंतप्रधान मोदींना शिव्या देत होते; आता नेमके याउलट करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.”
मुंगेरमध्ये गेल्या पाच वर्षांत त्यांनी केलेल्या कामगिरीवर मात्र मतदार खूश नाहीत. मात्र, तरीही जेडीयू एनडीएचा घटक पक्ष असल्याने ते भाजपाच्या पाठिंब्याने निवडून येऊ शकतात. त्यांच्याबाबत बोलताना हलवाई (ओबीसी) समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कालू कुमार या चहावाल्याने म्हटले की, “या मतदारसंघासाठी लालन बाबू यांनी काहीही केलेले नाही. भागलपूर आणि बेगूसरायकडे पाहा. दोन्ही मतदारसंघांचा चांगला विकास झाला आहे. मुंगेर हे इतके जुने शहर असूनही इथे काहीही विकास झालेला नाही. लालन बाबू चंडी माँबद्दल बोलत असतात; मात्र चंडीस्थानच्या विकासासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. जर जेडीयू भाजपाबरोबर गेली नसती तर आम्ही त्यांना मत दिले नसते.”
दीपक चौरसिया (ओबीसी) या पानवाल्याचे मतही तसेच होते. ते म्हणाले की, “लालन बाबू यांनी थोडे जरी काम मतदारसंघात केले असते तर ते आज विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले असते. गेल्या पाच वर्षांत नितीशबाबूंनी जे सुरू आहे ते बंद करायचे काम केले आहे. नव्याने काही सुरू मात्र केलेले नाही. इथे असलेली एक बंदुकीची फॅक्टरीही बंद झाली आहे, पण मनात नसले तरीही आम्ही लालन बाबू यांनाच मत देऊ.”
२०१४ मध्ये जेडीयूने स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवली होती, तेव्हा राजीव रंजन सिंग यांचा पराभव झाला होता. या मतदारसंघामध्ये त्यांच्यासमोर अनिता देवी यांचे आव्हान आहे. त्या अशोक महतो या कुख्यात गुंडाच्या पत्नी आहेत. या मतदारसंघामधील मुस्लीम-यादवांवर राजदची भिस्त आहे. तसेच दलित आणि कुर्मी जातीच्या लोकांकडूनही त्यांना पाठिंब्याची अपेक्षा आहे. मुंगेर मतदारसंघामध्ये १८ लाख मतदार आहेत. त्यामध्ये यादव, कुर्मी, धनुक (ओबीसी), भूमिहार आणि वैश्य मते प्रत्येकी दोन-दोन लाख आहेत. एक लाख मुस्लीम तर दीड लाख राजपूत आहेत. उर्वरित मतदारांमध्ये दलित, ब्राह्मण आणि इतर जातींचे लोक आहेत. मुंगेर, जमलपूर आणि लखीसरायमधील यादव आणि मुस्लीम राजदच्या पाठिशी आहेत; तर भूमिहार आणि उच्च जातीचे इतर गट नरेंद्र मोदींसाठी राजीव रंजन सिंग यांच्या पाठिशी उभे राहतील. दलित आणि पासवानदेखील भाजपालाच मत देतील, अशी शक्यता आहे.
हेही वाचा : ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, काँग्रेसकडे देशाला देण्यासारखं काही राहिलेलं नाही
या मतदारसंघातील कुर्मी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार स्वत: कुर्मी जातीचे असल्याकारणाने काही कुर्मी जेडीयूचे उमेदवार म्हणून राजीव रंजन सिंग यांना मत देतील; तर राजदच्या उमेदवार कुर्मी समाजाच्या असल्याने काही त्यांना मत देतील. या मतदारसंघातील शांताकुमार मंडल (कुर्मी) यांनी म्हटले की, “महतो यांच्या पत्नीला मत देण्यात काय अर्थ आहे? महतो हे दोषी ठरलेले गुन्हेगार आहेत. कुर्मी मतांची विभागणी करण्यासाठीच त्यांना उमेदवारी दिली आहे. नितीश कुमार यांनी या गावाचा विकास केला आहे, काही लोकांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत.”
कुर्मी जातीच्या एका विद्यार्थ्याने म्हटले की, “मला राहुल गांधी आवडतात. गेली १० वर्षे आम्ही मोदींना दिली आहेत, पण बिहारमध्ये काही विशेष घडलेले नाही. इथे ना काही विकास झालेला आहे, ना कुणाल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. आता दुसऱ्या कुणाला तरी इथे संधी मिळायला हवी.”