पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी (१४ मे) वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करताना त्यांच्याबरोबर असलेले चार प्रस्तावक कोण होते, याबाबतची उत्सुकता अनेकांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उमेदवारी अर्ज भरला तेव्हा निवडण्यात आलेले चारही प्रस्तावक भाजपाकडून फार विचारपूर्वक निवडण्यात आले. त्यामधील एक ब्राह्मण, दोन ओबीसी आणि एक दलित समाजातील व्यक्ती असून भाजपाचा समाजाच्या विविध स्तरातील लोकांना सामावून घेण्याचा प्रयत्न दिसतो.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राज्य प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र चौधरी तसेच भाजपाचे तीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पुष्कर सिंह धामी आणि मोहन यादव देखील उपस्थित होते. एनडीए आघाडीचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जनसेना पार्टीचे प्रमुख पवन कल्याण आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू असे इतरही अनेक नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीला अनुमोदन देणारे चार प्रस्तावक नेमके कोण आहेत, याची माहिती घेऊयात.
हेही वाचा : भाजपाने स्वीकारले राहुल गांधींचे आव्हान; पंतप्रधान मोदी नव्हे तर ‘हा’ युवानेता चर्चेत सहभागी होणार
गणेश्वर शास्त्री द्रविड
गणेश्वर शास्री द्रविड (६६) हे वेदांचे प्रसिद्ध अभ्यासक असून ते वाराणसीच्या ते वाराणसीच्या राम घाट परिसरात राहतात. जानेवारीमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठीचा मुहूर्त त्यांनीच काढून दिला होता. तसेच ऑगस्ट २०२० मध्ये राम मंदिराच्या आणि फेब्रुवारी २०२२ मधील काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या भूमिपूजन समारंभाचा मुहूर्तही त्यांनीच काढलेला होता. भाजपातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, “त्यांना प्रतिष्ठापनेसाठी उत्तर आणि दक्षिण भारतातील हिंदूंमधील अंतर कमी करण्यास अनुकूल ठरेल असा मुहूर्त शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
तामिळनाडूतले थिरुविसनल्लूर हे द्रविड यांचे मूळ गाव आहे. द्रविड यांचे पूर्वज १९व्या शतकात वाराणसी इथे स्थायिक झाले होते. राम घाटात श्री वल्लभराम शालिग्राम संगवेद विद्यालयाच्या स्थापनेचे श्रेय त्यांचे वडील लक्ष्मण शास्त्री यांनाच जाते. ज्योतिषशास्त्रातील ज्ञानाव्यतिरिक्त गणेश्वर शास्त्री द्रविड हे कृष्ण यजुर्वेद, शुक्ल यजुर्वेद आणि न्याय शास्त्रातील निपुणतेसाठी ओळखले जातात.
संजय सोनकर
संजय सोनकर (५०) हे वाराणसी भाजपाचे जिल्हा महामंत्री आहेत. ते सोनकर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. हा समाज अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये मोडतो. २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींना भेटल्यानंतर ते अधिकच चर्चेत आले होते. संजय सोनकर वाराणसीचे रहिवासी असून भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत.
लालचंद कुशवाह
लालचंद कुशवाह यांचे स्वत:च्या मालकीचे कापड दुकान आहे. लालचंद कुशवाह (६५) हे कुशवाह (ओबीसी) समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. ते वाराणसीतील छावणी भागातील रहिवासी असून भाजपाच्या वाराणसी विभागाचे प्रभारी आहेत.
बैजनाथ पटेल
बैजनाथ पटेल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत जुने कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जनसंघापासून केली होती. वाराणसीच्या सेवापुरी भागातील रहिवासी असलेले पटेल हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. ते यापूर्वी हर्षोष गावचे सरपंच राहिलेले आहेत.
प्रस्तावक म्हणजे काय?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित उमेदवाराकडे एक प्रस्तावक असावा लागतो. ही प्रस्तावक व्यक्ती त्या मतदारसंघाची मतदार असावी लागते. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ नुसार, अपक्ष उमेदवाराला आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी १० प्रस्तावकांची गरज असते; तर मान्यताप्राप्त राष्ट्रीय अथवा प्रादेशिक पक्षाला फक्त एका प्रस्तावकाची गरज असते.