२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २०१९ च्या तुलनेत कमी मतदान होताना दिसत आहे. सात टप्प्यात पार पडत असलेल्या या निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. मात्र, आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये २०१९ च्या तुलनेत १.५५ टक्क्यांची घट झाली आहे. ६५ टक्के मतदारसंघांमध्ये मतटक्का प्रचंड घटला आहे; तर त्यातील २० टक्के मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्यादेखील घटली आहे. मंगळवारी (२८ मे) निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण सहा टप्प्यांमध्ये आतापर्यंत ६५.६३ टक्के मतदान पार पडले आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये याच मतदारसंघांमध्ये एकूण ६७.१८ टक्के मतदान झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या ५४३ मतदारसंघांपैकी ४८५ मतदारसंघात मतदान पार पडले आहे. २५ मे रोजी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यातील ५८ मतदारसंघांमध्ये एकूण ६३.३७ टक्के मतदान झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडणार आहे. सहा टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीमध्ये आसाममधील १४ आणि जम्मू आणि काश्मीरच्या पाच मतदारसंघाची आकडेवारी समाविष्ट नाही. तिथे पुनर्रचनेनंतर गेल्या निवडणुकीपासून मतदारसंघांच्या सीमा बदलल्या आहेत.

हेही वाचा : ‘या’ काँग्रेस नेत्याची पोस्टल बॅलेटद्वारे मतदनाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली; काय आहेत कारणं?

२०१९ मधील आकडेवारीशी तुलना करता, ४६६ पैकी ९४ मतदारसंघांमध्ये एकूण मतदारांच्या संख्येत घट झाली आहे. त्यापैकी नागालँडमध्ये मतदारांच्या संख्येत सर्वाधिक (२.४१ लाख) घट झाली आहे. मथुरा, सिधी, खजुराहो, पठाणमथिट्टा, बाघपत आणि जबलपूर मतदारसंघामध्ये जवळपास एक लाख मतदार घटले आहेत. २०१९ मधील आकडेवारीशी तुलना करता, ४६६ पैकी ३०१ मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी घटली आहे.

या निवडणुकीमध्ये एकूण पात्र मतदारांची संख्या वाढली असून ती ९१ कोटींवरून ९६.८ कोटींवर गेली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घटला याचा अर्थ २०१९ च्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान केले असे होत नाही. २०१९ शी तुलना करता, सहा टप्प्यातील मतदारसंघांमध्ये २.४ कोटींहून अधिक मतदारांनी मतदान केले आहे. असे असले तरीही, ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या विश्लेषणानुसार, ९४ मतदारसंघांमध्ये एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या घटली आहे.

यातील अर्ध्याहून अधिक मतदारसंघ हे तमिळनाडू (१८), उत्तर प्रदेश (१७), केरळ (१२) आणि राजस्थान (१२) या चार राज्यांमधील आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, केरळ आणि उत्तराखंडमध्ये मतदारांची संख्या कमी असलेल्या जागांचे सर्वाधिक प्रमाण होते. उत्तराखंडमध्ये पाच पैकी तीन मतदारसंघांमध्ये २०१९ च्या तुलनेत कमी मतदार दिसले; तर केरळमध्ये २० पैकी १२ मतदारसंघांमधील मतदारांच्या संख्येत घट झाली आहे. मतदारांची संख्या घटलेल्या मतदारसंघांमधील बहुतांश म्हणजे ५० लोकसभा मतदारसंघांवर भाजपाचे वर्चस्व आहे. त्यानंतर काँग्रेस (१४ जागा), द्रमुक (११ जागा), बसपा (४ जागा) आणि शिवसेना (३) यांचा क्रमांक लागतो. मतदारांची संख्या घटलेल्या या ९४ मतदारसंघांमधील घट ही कमीतकमी १,८३२ (सहारनपूर, उत्तर प्रदेश) तर जास्तीतजास्त २,४१,६३५ (नागालँड) इतकी आहे.

या ९४ जागांची सरासरी काढली तर ४१,८८० मतदारांची संख्या घटली आहे. नागालँडमध्ये लोकसभेचा एकच मतदारसंघ असून तिथे २०१९ शी तुलना करता मतदारांच्या संख्येमध्ये तब्बल २५ टक्क्यांनी घट झाली आहे. पात्र मतदारांच्या संख्येत १.०४ लाखांनी वाढ होऊनही एकूण मतदारांची संख्या २.४२ लाखांनी घसरली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीशी तुलना करता, तमिळनाडूतील एकूण ३९ जागांपैकी १८ जागांवर मतदार नोंदणीत वाढ होऊनही मतदारांची संख्या कमी झाली आहे. चेन्नईतील दोन्ही मतदारसंघांमध्ये (मध्य आणि उत्तर) मतदारांची घट झाली आहे. मध्य चेन्नईमध्ये ५४,०७२ तर उत्तर चेन्नईमध्ये ५३,४०३ मतदार घटले आहेत.

हेही वाचा : ओडिशातील आदिवासीबहुल भागात ‘द्रौपदी मुर्मू’ प्रचाराचा मुद्दा का झाल्या आहेत?

उत्तर प्रदेशमध्ये १७ जागांवर मतदारांच्या संख्येत सर्वात जास्त घट झाली. मथुरामध्ये पात्र मतदारांच्या संख्येत १.२२ लाखांनी वाढ होऊनही मतदारांची एकूण संख्या १.४५ लाखाने घटली आहे. या जागेवरील मतदानाची टक्केवारी ६०.७४ टक्क्यांवरून ४९.४१ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. मतदारांच्या संख्येत घट झालेल्या ९४ मतदारसंघांपैकी एका मतदारसंघामध्ये पात्र मतदारांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. राजस्थानमधील जयपूर ग्रामीण मतदारसंघामध्ये २.३२ लाख मतदार वाढले आहेत. मात्र, या ठिकाणचा मतटक्का ६४.७ टक्क्यांवरून ५६.७ टक्क्यांवर घसरला आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सिधी (मध्य प्रदेश), मथुरा (उत्तर प्रदेश), खजुराहो (मध्य प्रदेश), रेवा (मध्य प्रदेश), पठाणमथिट्टा (केरळ) या मतदारसंघांमध्ये दहा टक्क्यांहून अधिक घट झाली आहे; तर दुसरीकडे मेघालयमधील शिलाँग मतदारसंघात (८.४४) मतदारांचा टक्का सर्वाधिक वाढला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2024 voter count 94 seats see dip in vote count from 2019 vsh
Show comments