प्रथमेश गोडबोले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुळशी धरणाचे पाणी पुणे जिल्ह्यासाठी वळविण्याची जुनी मागणी आहे. मात्र, या मागणीने आता जोर धरला असून विद्यमान राज्य सरकार याबाबत अनुकूल आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, पुरंदर, इंदापूर आणि बारामती या तालुक्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच हे चारही तालुके बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने हा निर्णय घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचे भाजपचे मनसुबे आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २८ ऑक्टोबरला पुण्यातील सिंचन भवन येथे पुण्याच्या वाढीव पाण्याबाबत बैठक बोलावली असून त्यामध्येही हा विषय चर्चिला जाणार आहे.खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमधील पाण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींकडून सातत्याने तक्रारी करण्यात येतात. पुणे शहराला जास्त पाणी मिळत असल्याने ग्रामीण भागावर अन्याय होत असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. या पार्श्वभूमीवर मुळशी धरणाचे पाणी खडकवासला धरणसाखळीत आणण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : समाजवादी पार्टीच्या बड्या नेत्याचा बसपात प्रवेश; मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मायावतींचा मास्टरस्ट्रोक!

मात्र, याबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्काही बसू शकतो. मुळशीचे पाणी वळवण्यासाठी अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. हा निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे. हा निर्णय झाल्यास हवेली, दौंड, पुरंदर, इंदापूर आणि बारामती या तालुक्यांमधील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. या चारही तालुक्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही मुळशीच्या पाण्याचा मुद्दा चर्चेत आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधील जाहीर सभेत मुळशीच्या पाण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील मुळशीचे पाणी ग्रामीण भागाला देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. मात्र, याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही.

हेही वाचा : राजकीय पक्षांची कंदील लावण्यासाठी अहमहमिका

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. दौंड आणि खडकवासला या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे अनुक्रमे राहुल कुल आणि भीमराव तापकीर हे आमदार आहेत. मात्र, कुल आणि तापकीर या दोघांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतिशय कमी मताधिक्याने पराभूत झाले आहेत. पुरंदर तालुक्यात शिवसेनेचे विजय शिवतारे यांना पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी काँग्रेसच्या संजय जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला होता. इंदापुरात माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि बारामतीमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर भोर आणि पुरंदरमध्ये काँग्रेसचे अनुक्रमे संग्राम थोपटे आणि संजय जगताप हे आमदार आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. या पार्श्वभूमीवर मुळशीच्या पाण्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election bjp target baramati mulshi dam water ncp chandrkant patil pune print politics news tmb 01
Show comments