अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. अशातच गुरुवारी दिल्लीत भाजपा आणि जेडीएस यांच्यात जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही पक्षांनी परस्पर विश्वास आणि सहकार्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द इंडियन एक्सप्रेस’ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थांनी भाजपा आणि जेडीएस नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डी आणि जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी उपस्थित होते. या बैठकीत भाजपाने जेडीएससमोर तीन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.

हेही वाचा – ‘मोदी की गॅरंटी’ चा दहा वेळा उल्लेख करीत मोदी यांची मतदारांना सोलापूरमध्ये भावनिक साद

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपाने २५ जागांवर, तर जेडीएसने केवळ एका जागेवर विजय मिळवला होता. भाजपाने आता जेडीएसला हसन आणि मंड्या या दोन जागांचा प्रस्ताव दिला आहे. या दोन्ही जागांवर वोक्कलिगा कृषी समुदायाचा प्रभाव आहे. २०१९ मध्ये मंड्याच्या जागेवर अपक्ष उमेदवार सुमलता अंबरीश यांनी विजय मिळवला होता. तर तिसरी जागा म्हणून भाजपाने कोलार, बेंगळुरू ग्रामीण आणि तुमकूर यापैकी एका जागेचा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपाने प्रस्ताव दिलेल्या तिन्ही जागा दक्षिण कर्नाटकातील आहे. या जागांवर भाजपाचा प्रभाव कमी आहे.

भाजपाने तीन जागांचा प्रस्ताव दिला असला, तरी जेडीएसने पाच जागांची मागणी केली आहे. वरील तीन जागांव्यतिरिक्त जेडीएसने रायचूर आणि उत्तर कर्नाटकातील एक जागेची मागणी केली असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भात बोलताना, जेडीएस नेते कुमारस्वामी म्हणाले, “अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा होईल. यावेळी दोन्ही पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांना विश्वासात घेतलं जाईल. दोन्ही पक्ष एकमेकांच्या सहकार्याने काम करत आहेत. आमच्यात जागावाटपाबाबत कोणताही वाद नाही.”

दरम्यान, भाजपाने प्रस्ताव दिलेल्या दोन जागांपैकी हसनच्या जागेवर जेडीएसची स्थिती जरा नाजूक आहे. याठिकाणी देवेगौडा यांचे नातू आणि विद्यमान खासदार प्रज्वल रेवन्ना यांचे स्थानिक भाजप नेत्यांशी चांगले संबंध नाहीत. त्यामुळे हसनच्या जागेवर पर्यायी उमेदवारांवराबाबत जेडीएस भाजपाबरोबर चर्चा करत असल्याची माहिती आहे. मंड्या हा असा मतदारसंघ आहे. जिथून कुमारस्वामी स्वत: निवडणूक लढवू शकतात. यासंदर्भात बोलताना कुमारस्वामी म्हणाले, “निवडणूक लढवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव आहे. मात्र, या जागेबाबतचा निर्णय दोन्ही पक्ष मिळून घेतील.”

जेडीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने बेंगळुरू ग्रामीणची जागा जेडीएसला देऊ केली आहे. पण भाजप उमेदवार सीपी योगेश्वरा ही जागा लढवण्यासाठी इच्छूक आहेत. २०१३ पासून उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश यांनी तीन वेळा या जागेवर विजय मिळवला आहे. त्यापूर्वी २००९ मध्ये कुमारस्वामी या मतदारसंघातून विजयी झाले होते. याशिवाय जेडीएसकडून तिसरा जागेचा पर्याय म्हणून कोलार आणि तुमकूरबाबतही विचार सुरू आहे.

हेही वाचा – आत्रामांच्या दाव्यामुळे महायुतीत धूसफूस, भाजपमध्येही दुफळी ! महाविकासआघाडीचा उमेदवार जवळपास निश्चित

कोलार मतदारसंघात जेडीएसची स्थिती जरा चांगली आहे. शिवाय इथे भाजपाच्या विद्यमान खासदाराविरोधात रोष बघायला मिळतो आहे. तर तूमकूर जागेसाठी जेडीएस माजी मंत्री व्ही सोमन्ना यांना पाठिंबा देण्याच्या विचारात होते. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जेडीएस या जागेचासुद्धा विचार करत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election seat sharing of talks between bjp and jds for karnataka are taking place spb
Show comments