सोलापूर: एकेकाळी काँग्रेस व राष्ट्रवादीचा मजबूत गड राहिलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या पाच-दहा वर्षात भाजपने स्वतःची ताकद वाढवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहात असताना भाजपने सोलापूर व माढ्याच्या दोन्ही लोकसभेच्या जागा कायम राखण्यासाठी साम, दंड, भेद नीतीचा अवलंब करत जोरदार तयारी चालविली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपला अनुकूल ठरणा-या संघ परिवारासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत हिंदू जन आक्रोशसारखे मोर्चे आणि त्यातून होणा-या दगडफेकींच्या घटनांमुळे सोलापुरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोकादायक बनू पाहात आहे. त्याबद्दल शांतताप्रेमी सोलापूरकरांना चिंता वाटत आहे. शांतता कायम राखताना समाजात अशांतता निर्माण करणा-या शक्ती कितीही मोठ्या असल्या तरी त्यांचा बिमोड करण्याची कायदेशीर जबाबदरी स्थानिक पोलीस प्रशासनावर येऊन पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील एक-दोन वर्षांपासून सोलापुरात हिंदुत्ववादी संघटना सक्रिय राहून आपला ‘अजेंडा’ राबवत आहेत. कधी ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनातून तर कधी लव्ह जिहाद, धर्मांतर, वक्फ बोर्ड कायदा असे विविध मुद्दे घेऊन हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. तसेच श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ होणारे आंदोलन अशा एका पाठोपाठ एक मालिकांमुळे कायदा व सुव्यवस्था राखताना स्थानिक पोलीस प्रशासनावरील ताण वाढला आहे. गेल्या आठवड्यात हिंदू जन आक्रोश मोर्च्याप्रसंगी कोंतम चौक परिसरात विशिष्ट समाजाच्या समाजाच्या दुकानांवर झालेली दगडफेक आणि मोर्चेक-यांच्या सभेत तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार राजासिंह ठाकूर आणि आमदार नितेश राणे आदी वाचाळवीरांनी केलेली प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषणे यामुळे शहरातील सामाजिक वातावरण गढूळ बनले होते. अर्थात पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता वेळीच नियंत्रणात आणली. आमदार राजासिंह ठाकूर आणि आमदार नितेश राणे यांच्यावर तात्काळ गुन्हाही दाखल करून तेवढ्यापुरती का होईना, स्वतःची कार्यक्षमता सिध्द केली.

हेही वाचा… नवनीत राणांसमोर उमेदवारीचे आव्हान तर विरोधक सक्षम चेहऱ्याच्या शोधात

ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा आणि येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणा-या श्रीरामलल्ला जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तोंडावर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायम राखणे ही प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. परंतु परवा शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला नख लावण्याचा प्रयत्न झाल्यामुळे व्यापारी, उद्योजक, कामगार, कष्टकरी अशा सर्व वर्गात अस्वस्थता दिसून आली. सहा महिन्यांपूर्वी संभाजी ऊर्फ मनोहर भिडे यांच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनात पोलिसांना वेठीस धरण्यात आले होते. विनापरवाना, कायदा हातात घेऊन आंदोलन होताना त्यात कायदेशीर हस्तक्षेप करून पोलिसांनी संबंधित संघटनेच्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी संबंधित पोलीस ठाण्यासमोर मोठा जनसमुदाय गोळा होऊन ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करण्याचा हट्ट धरू लागला. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे दिसताच पोलिसांना सौम्य लाठीमार करून जनसमुदायाला पांगवावे लागले होते. परंतु या घटनेचे पडसाद दुस-याच दिवशी विधिमंडळ अधिवेशनात उमटले आणि संबंधित पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांना उच्चस्तरीय चौकशीला सामोरे जावे लागले. हा अनुभव पाहता यापुढे कोणीही कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी कायदा हातात घेऊन समाजाला वेठीस धरणा-या मंडळींना काबूत आणताना दहावेळा फेरविचार करेल, अशीच काहीशी मानसिकता स्थानिक पोलीस प्रशासनाची झाली आहे. तरीही, परवाच्या हिंदू जन आक्रोश मोर्च्याप्रसंगी झालेला दगडफेकीचा प्रकार आणि भाजपच्या वादग्रस्त नेत्यांनी केलेली प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषणे, त्यामुळे धोक्यात आलेली शांतता व सुव्यवस्था पाहता पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता केलेली कारवाई आश्वासक ठरली.

यापूर्वीही, सोलापुरात आमदार राजासिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला तेव्हा रस्त्यावरील काही विशिष्ट व्यापा-यांच्या दुकानांवर दगडफेकीचे प्रकार घडले होते. तेव्हाही पोलिसांनी परिस्थिती निपटून काढली होती. गेल्या वर्ष-सहा महिन्यात असे प्रकार अधुनमधून घडत आहेत. धार्मिक ध्रुवीकरण व्हावे आणि त्याचा राजकीय लाभ आगामी सार्वत्रिक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये घेता यावा हाच हेतू यामागे असावा, अशी सार्वत्रिक चर्चा ऐकायला मिळत आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपने गेल्या पाच-दहा वर्षात मोठी ताकद वाढवली असून त्यासाठी अर्थातच पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला स्वतःची पकड मजबूत करणे शक्य झाले आहे. सोलापूर लोकसभेची जागा सलग दोनवेळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून सर करताना हिंदुत्वापेक्षा मोदीत्व महत्वाचे ठरले. तर शेजारच्या माढा लोकसभेची जागा पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या ताकदीमुळे भाजपला जिंकणे शक्य झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपअंतर्गत राजकारणात पुलाखालून पाणी वाहात असून गटबाजीला दररोज नवनवीन धुमारे फुटत आहेत. आजच्या घडीला जिल्ह्यात दोन्ही खासदार आणि अकरापैकी सात आमदार भाजपचे आणि जोडीला महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी आजित पवार गटाचे तीन आमदार म्हणजेच अकरापैकी महायुतीचे दहा आमदार असताना तसेच माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेल्या लगतच्या सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण-खटावच्या दोन विधानसभेच्या जागाही महायुतीच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे भाजपला सोलापूर व माढा लोकसभेसाठी जास्त कष्ट घेण्याची गरज उरलेली दिसत नाही. मात्र पक्षांतर्गत गटबाजीला आलेले उधाण थांबत नाही. यात कधी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याची भर पडते. तर कधी श्रेयवादातून पक्षातील धुसफूस पुनःपुन्हा डोके वर काढते. या पार्श्वभूमीवर ‘शत प्रतिशत’ स्वबळाच्या निर्मितीसाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न होतो की काय, अशी चर्चा सामिजिक आणि राजकीय वर्तुळात होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha elections 2024 maharashtra politics solapur religious polarization print politics news dvr
Show comments