शूऽऽऽ अजिबात हसायचे नाही व राज ठाकरेंनी सध्या अंगी बाळगलेल्या दुर्दम्य आशावादाचे खुल्या दिलाने कौतुक करायचे. कशाचे तर ‘यावेळी आमच्या पक्षाची सत्ता येणार म्हणजे येणार’ या त्यांच्या ताज्या वक्तव्याचे. गेल्या वेळी फक्त एक आमदार निवडून आला, तोही अपघाताने. यंदा एकदम १४४ कसे येणार असा प्रश्न तर त्यांना कुणी विचारायचाच नाही. अशी उपटसुंभगिरी करणाऱ्या पत्रकारांनाच ते चूप बसवतात, मग इतरांची काय पत्रास? या विधानामागचा त्यांचा तर्कही साधा, सोपा व सरळ. युती व आघाडीत विभागले गेलेले सहा पक्ष कमी जागा लढवताहेत. त्या तुलनेत मनसे सर्वच्या सर्व. जो जास्त उमेदवार उतरवणार, त्याचाच विजय व त्यातून सत्ता हे समीकरण राजकीय पंडितांनी समजून घ्यायला हवे.

अहो, सत्ता मिळवणे म्हणजे कुंचला फिरवणे नाही. पानभर जाहिरात दिल्याने ती मिळत नाही. तुमची संघटनात्मक ताकद किती? तुम्ही अपेक्षा बाळगता किती? तुमच्याकडे जादूची कांडी आहे का? असले प्रश्न तर नकोच नको. ते हेही म्हणाले आहेत की निवडणुकीनंतर आम्ही सत्तेत असू. याचा अर्थ स्वबळ किंवा मित्रपक्षाच्या सहकार्याने असाही निघू शकतो. अजूनही टेबलाच्या खणातच असलेल्या विकासाच्या ब्ल्यूप्रिंटवर काळे डाग पडायला लागले म्हणून ठाकरे त्वेषाने लढण्यासाठी सज्ज झाले असे म्हणा हवे तर! सर्वांना पाठिंबा देऊन हात पोळून घेतल्यावर आता उपरती झाली असली तरी लोक स्वीकारणार कसे हा तर्कसुद्धा चूक. लोक फोडाफोडीला (पाठिंब्याला नाही) कंटाळले आहेत हे ठाकरेंच्या ‘दिव्य’ दृष्टीने अचूक हेरलेले. त्यांच्या अलीकडच्या व्यंगचित्रातील सामान्य माणूससुद्धा हेच त्यांच्या कानात सांगतो म्हणे. त्यामुळेच त्यांनी सत्तेचा ‘अचूक’ अंदाज वर्तवला. तो खरा होणार म्हणजे होणार. एकाचे दीडशे होतील म्हणजे होतील. या पाच वर्षांत सगळे ‘फुटलेत’ पण त्यांचा एकमेव आमदार फुटला नाही म्हणून पक्ष शाबूत राहिला. ही जमेची बाजू मतदारांनी पक्की लक्षात ठेवलेली. त्यामुळे राजसत्ता येणारच! – श्री.फ. टाके