हुश्शऽऽऽ सुटलो बुवा एकदाचा! ठाकरेंच्या तावडीतून, तेही मुंबईत राहून सुटणे किती कठीण असते याची नव्याने जाणीव झाली असेल सदा सरवणकर तुम्हाला. तीही याच शब्दात. याआधी तुम्ही ‘त्या’ ठाकरेंच्या मगरमिठीतून सुटका करून घेतली, तीही आधुनिक ‘धर्मवीर’ शिंदेंचे बोट धरून. यावेळी ‘हे’ ठाकरे तुमच्या उमेदवारीच्या आड आले. त्यातून बाहेर पडायला काय काय नाही करावे लागले तुम्हाला. अगदी दमून जाईपर्यंत बोलावे लागले. ‘मी रिंगणात असलो तरच अमित ठाकरेंना निवडणूक सोपी, अन्यथा कठीण’ हे तुमचे वाक्य तर खासच. पडलो तरी चालेल पण राहू द्या हो रिंगणात, असे कुणी बोलते का हो सदाभाऊ! लोक उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेली उमेदवारी टिकवण्यासाठी जंगजंग पछाडणारे तुम्ही राज्यातले एकमेव. तुमची ही धावपळ बघून ‘ते’ ठाकरे खुदुखुदु हसत होते म्हणे! शेवटचा प्रयत्न म्हणून तुमचे ‘या’ ठाकरेंच्या भेटीसाठी कॅमेऱ्याच्या साक्षीने जाणे एखाद्या चित्रपटात शोभेल असेच. शेवटी दिलीच नाही त्यांनी वेळ पण तुमची विनवणी‘वारी’ मात्र यशस्वी झाली. किती कष्ट उपसावे लागले तुम्हाला गेले आठ दिवस? उमेदवारी टिकावी म्हणून रोज नवा युक्तिवाद करणे हे तसे कठीण काम हो! पण लढवला तुम्ही किल्ला शिंदेंच्या ‘मूकसंमती’च्या बळावर. बिचारे भाजपवाले बसले चरफडत. शेवटी पावला एकदाचा सिद्धिविनायक. मात्र धोका अजून टळला नाही बरं का सदाभाऊ! कुठून कळ फिरेल व काय होईल हे सांगता येत नाही. भाजपचे लोक वस्ताद आहेत यात. शिवाय गेल्यावेळी तुम्हाला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे महेश सावंत आहेतच की मैदानात. त्यामुळे तुम्हाला निवडून यायचे की तुमच्या असण्यामुळे ‘ठाकरे’ निवडून येणार यातला गोंधळ दूर करून टाका एकदाचा. नाही तर ‘तेलही गेले व तूपही गेले’सारखी अवस्था होईल तुमची!

श्री.फ. टाके

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta aptibar raj thackeray avoided meeting candidate sada saravankar amy