अहो, राजे ना तुम्ही! मग त्याप्रमाणे वागा की जरा. आब राखून. बोटीत काय बसता. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक शोधायला काय जाता. परतल्यावर दिसलेच नाही असा आव काय आणता. संभाजी महाराज, नाही शोभत तुम्हाला हे. नागपूरचे ‘देवाभाऊ’ बरोबर बोलले यावर. दहा वर्षांपूर्वी शोधायला का गेला नाहीत म्हणून. अहो, तुमचा स्वराज्य पक्ष इटुकला. तरी प्रत्येक निवडणुकीत तो घेऊन तुम्ही इकडे तिकडे फिरत असता. राजवाड्यातील कुणाला उमेदवारी मिळाली की त्याला गुंडाळून ठेवता. आता किमान वडील आघाडीत तर तिकडे राहा ना सुखाने. कशाला तिसऱ्या आघाडीच्या उचापती करता. आता तुम्हाला स्मारक आठवले पण रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काय केले असे कुणी विचारले तर? पंचाईतच व्हायची की तुमची. एकेकाळी तुम्हीच म्हणत होते, स्मारके नको, किल्ले संवर्धन हवे. काय झाले त्याचे? असे ठिकठिकाणच्या तंबूत जाऊन पदे मिळत नाहीत हे कळत कसे नाही तुम्हाला? युतीच्या मदतीने तुम्ही राज्यसभेवर असताना स्मारकासाठी काय केले? पद गेले की स्मारकाची आठवण ही सर्वपक्षीय व्याधी आहे राज्याला लागलेली. उगाच कशाला ती अंगाला लावून घेता?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा