सांगलीतील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत एक अधिकारी गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. तोंडात खडीसाखर आणि डोक्यावर बर्फाची लादी. यामुळे कुणालाही हे अधिकारी वावगे असतील असे वाटणारच नाही. कधी या विभागात तर कधी त्या विभागात स्थानांतर तेवढे होते. मात्र, जिल्ह्याबाहेर जाण्याचे नाव घेत नाहीत. यामुळे राबता तर वाढलाच. पण कधीकाळी राज्यमंत्री महोदयांचे स्वीय सहायक म्हणून केल्याच्या कामाचा अनुभव गाठीशी असल्याने ‘वेटोळे’ मारण्यात हे अधिकारी सरसच ठरत आहेत. असे हे अधिकारी जिल्ह्यात भलतेच ‘पॉवरफूल’ ठरले आहेत.
मला थांबवू नका
दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने माजी वस्त्रोद्याोग मंत्री प्रकाश आवाडे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुखांची उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना प्रकाश आवाडे यांनी सुरुवातीलाच चांगलीच फटकेबाजी सुरू केली. ते म्हणाले, मी थांबायचे म्हणून मला जीवनगौरव पुरस्कार देण्याचा विचार यामागे कोणाचा असला तरी या निवृत्तीच्या मानसिकतेत पडू नका. सत्कार करून सार्वजनिक कार्यातून मला टाटा बाय-बाय करायचा प्रयत्न असेल तर विसरून जा बरे. कारण मी कोणाला समजलो नाही म्हणून कळलो नाही. आताही पुन्हा पाय रोवून उभा राहणार आहे, असे म्हणत आवाडे यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले. काँग्रेस, अपक्ष ते भाजप अशा विविध मांडवात गेली ४० वर्षे प्रवास करणारे आवाडे नवा कोणता पवित्रा घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
सोमय्यांमुळे महसूल अधिकारी वैतागले
महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. अकोला व अमरावती जिल्ह्याकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर महसूल प्रशासनाने प्रमाणपत्र दिलेल्यांची पडताळणी सुरू केली. अगोदरच विविध योजनांची अंमलबजावणी व कामाच्या व्यापाखाली दबलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जन्म प्रमाणपत्राच्या पडताळणीची नवी जबाबदारी आली. या संदर्भात महसूल अधिकाऱ्यांनी, ‘किरीट सोमय्यांमुळे नसती कामे मागे लागली….’ अशा उद्विग्न भावना व्यक्त केल्या.
(संकलन : दिगंबर शिंदे, प्रबोध देशपांडे, दयानंद लिपारे)