शिवसेना ठाकरे गटाची जिल्ह्यात ताकद नाही असे कागदोपत्री पुरावे पुढे करूनही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या नवख्या तरुणाने उमेदवारीच्या पटावर काँग्रेसला आस्मान दाखवलेच. महाविकास आघाडीच्या जागावाटपात अखेपर्यंत ही जागा काँग्रेसलाच मिळेल असा आशावाद उरी बाळगून असलेली काँग्रेस आक्रमक होईपर्यंत पैलवानाने चितपट करण्यात बाजी मारली. आता खरी कुस्ती पुढेच राहणार आहे. वसंतदादांच्या वारसांना दिल्ली तर राहोच पण गल्लीतही मानसन्मान मिळू नये यासाठी देव पाण्यात ठेवणारे कोण शुक्राचार्य आहेत याचा शोध पुढची एखादी निवडणुक येईपर्यंत तरी लागणार का हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सवाल आहे. केस असल्यावर कुणीही भांग पाडू शकतो, मात्र, ‘डोक्याचे विमानतळ झालेल्यांनी भांग कसा पाडावा’ हाच धडा यावरून काँग्रेसने घ्यावा.
रंजकता आणि मसाला
‘मन राजा मन प्रजा’ या म्हणीचा अर्थ हुकूम करणारेही आपले मन आणि ते तोडणारेही आपलेच मन. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्याच मनाची अशीच समजूत काढली आणि युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आमदार रवी राणा यांच्याकडे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तो रवी राणांनी हसत हसत स्वीकारला. कारण लगेच नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश होणार होता. पती एका पक्षाचे संस्थापक, पत्नी कार्याध्यक्ष. पत्नीला दुसऱ्या पक्षाची उमेदवारी जाहीर. पत्नीचा आपल्याच पक्षाला रामराम. नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश. खरे तर पती-पत्नीची ताटातूट. पण, प्रसंग कार्यकर्त्यांसाठी सुखावणारा. सारे काही नाटय़पूर्ण. नवनीत राणा या पुर्वाश्रमीच्या सिनेअभिनेत्री असल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीत ‘सन्पेन्स’, ‘अॅक्शन’ आली तर बिघडले कुठे? नवनीत राणा यांचा राजकीय प्रवास एखाद्या चित्रपटासारखा. त्यात रंजकता आहे, सर्व काही मसाला आहे.
घडय़ाळ तेच पण..
शिरुर मतदारसंघातील उमेदवारीसाठी शिवाजीराव आढळराव- पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. वास्तविक आढळराव हे मूळचे राष्ट्रवादीचेच. पण दिलीप वळसे-पाटील आणि आढळराव पाटील यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. राष्ट्रवादीत आपल्याला राजकीय भवितव्य नाही हे लक्षात आल्याने २००४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आढळराव पाटील यांनी शिवसेनेचा मार्ग पत्करला. शिवसेनेच्या वतीने तत्कालीन खेड मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झाले होते. पुढे २००९ आणि २०१४ मध्येही शिवसेनेच्या वतीने निवडून आले. २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी आढळराव यांचा पराभव केला. गेली पाच वर्षे आढळराव मतदारसंघात सक्रिय होते. महायुतीत मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्ला गेला. त्यामुळे आढळराव यांची पंचाईत झाली. अजित पवार गटाकडेही तेवढा ताकदीचा उमेदवार नव्हता. मग उद्योगपती असलेले आढळराव यांना अजितदादांनी स्वीकारले. आता आढळराव घडय़ाळ या चिन्हावर लढणार आहेत. गेल्या वेशी घडय़ाळ चिन्हावर अमोल कोल्हे निवडून आले होते. घडय़ाळ तेच पण उमेदवार बदलला, असे शिरुर मतदारसंघातील चित्र असेल.
(संकलन- मोहन अटाळकर, संतोष प्रधान, दिगंबर शिंदे)