राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करण्याची स्पर्धा लागलेली असते. दोन्ही पक्ष आपलाच राष्ट्रवादी खरा, असा दावा करतात. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना झुकते माप दिले असले तरी लोकसभा निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात शरद पवार यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले. याउलट अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला होता.

शरद पवार गटाकडून शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे किल्ला लढवित असतात. संभाजी महाराजांची भूमिका साकार केल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात डॉ. कोल्हे यांचा चाहता वर्गही मोठा आहे. अजित पवार गटाने चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांना आपल्या पक्षात दाखल करून स्टार प्रचारकाची जबाबदारी आहे. ‘तुमचा अमोल कोल्हे तर आमचा सयाजी शिंदे’ असे प्रत्युत्तर देण्याचा अजित पवारांच्या पक्षाने प्रयत्न केला आहे. विविध ऐतिहासिक भूमिका पार पाडल्याने डॉ. अमोल कोल्हे हे घरोघरी पोहचले. सयाजी शिंदे मराठीपेक्षा तमिळ, तेलुगूमध्ये अधिक चमकले. यामुळे प्रचारात डॉ. कोल्हे यांचे नाणे अधिक चालेल, असे शरद पवार गटाचे गणित आहे. विधानसभा निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे की सयाजी शिंदे यांच्यापैकी कोणाचा अधिक प्रभाव पडतो हे आता बघायचे.